कंधार येथिल राष्ट्रीय लोकन्यायालयात तब्बल ३४५ प्रकरणे सामोपचाराने निकाली.!
कंधार ; प्रतिनिधी
येथील न्यायालयात पार पडलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात विविध प्रकरणांत एकूण ६ कोटी ५६ लाख ३ हजार २१७ रुपयांची तडजोड करण्यात आली असून दिवाणी, फौजदारी व इतर विविध प्रलंबित असे एकूण ३४५ प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार तालुका विधी सेवा समितीच्या वतीने कंधार आस्थापनेवर न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयात कंधार न्यायालयातील दिवाणी २८ व फौजदारी १६ अशा एकूण ४४ प्रकरणांत एकूण ६ कोटी २६ लाख ४३ हजार ६४९ रुपये वसूल करण्यात आले.
तर ३०१ प्रलंबित प्रकरणांत एकूण २९ लाख ५९ हजार ५६८ रुपये वसूल करण्यात आले आहेत. अशा प्रकारे एकूण ६ कोटी ५६ लाख ३ हजार २१७ रुपयांची तडजोड करण्यात आली असून एकूण ३४५ प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आले आहेत.
या राष्ट्रीय लोकन्यायालयात स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कंधार, ग्रामपंचायत, नगरपरिषद, कंधार, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कंधार यांनी सहभाग घेतला. अशा लोकअदालतीमुळे पक्षकार आणि ६ कोटी ५६ लाखांची वसुली प्रशासनाचा वेळ व आर्थिक बचत होत आहे. यापुढेही जास्तीत जास्त पक्षकारांनी आणि वकील मंडळींनी प्रकरणे लोकअदालतीत ठेवून सामोपचाराने निपटारा करावा. ज्यामुळे समाजात सौहर्दता निर्माण होईल असे आवाहन जिल्हा न्यायाधीश ए. एस. सलगर यांनी केले.
या लोकअदालतीत जिल्हा न्यायाधीश ए. एस. सलगर, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आर. आर. राऊत, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती आर. ए. खतीब, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पी. डी. आझादे यांच्या न्यायालयातील प्रकरणे निकाली निघाली आहेत.
अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. के. एस. क्षीरसागर व उपाध्यक्ष अॅड. के. एस. अन्सारी यांनी ही राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.
यावेळी तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी मुधोळकर, कु.एन. के. जाधव, आर. एस. मगरे, ए. बी. कुलकर्णी, एच. के. वाडेकर यांनी व्यवस्थापन केले. तसेच पॅनल तज्ञ म्हणून अॅड. आर. जी. ढवळे, अॅड. रवी केंद्रे, अॅड. जोंधळे मॅडम यांनी काम पाहिले. तर पॅनल सदस्य म्हणून मगदूम कुरेशी, राजू ढवळे, पोलीस पाटील लाडेकर व तंटामुक्ती अध्यक्ष पांडूरंग कंधारे यांनी काम पाहिले.