मनकर्णिका माने या विद्यार्थिनीची ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये नोंद

मनकर्णिका माने या विद्यार्थिनीची ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये नोंद


जयसिंगपूर (जिल्हा – कोल्हापूर);


आजच्या या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या २१व्या शतकात ‘चमत्कार’ या शब्दावर कोणी विश्वास ठेवेल का? पण एक अनोखा चमत्कार करणारी एक चिमुरडी कुमारी मनकर्णिका अभिजीत माने (जन्म २८ ऑक्टोबर २०१०) ही कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर शहरातील जयप्रभा इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये इयत्ता चौथीत शिकत असून; या १० वर्षे वयाच्या मनकर्णिकेने आपल्या कलेने चमत्कार करून दाखवला असून सर्वांना आश्चर्याने तोंडात बोटे घालायला लावली आहेत.
चतुरंग (बुद्धिबळ) हा खेळ खूप अवघड आहे. अगदी सहजासहजी हा खेळ लोकांना समजत नाही. तो खेळ कुमारी मनकर्णिका डोळ्यावर पट्टी बांधून अगदी सफाईदारपणे खेळते. समोरच्या व्यक्तीची चाल ओळखून जशी आपण प्रतिचाल करतो अगदी तशीच ती डोळ्यावर पट्टी बांधूनसुद्धा प्रतिचाल करते. डोळे बंद करून ती कॅरम आणि पत्ते  खेळू शकते. डोळे बंद करून चित्र काढते, वर्तमानपत्रे आणि पुस्तके वाचते, नोटा ओळखते, वहीतील कोणत्याही ओळीवर नाव लिहायला सांगितल्यास त्याच अचूक ओळीवर नाव लिहिते.
मनकर्णिका केवळ डोळे बंद करून सगळे ओळखण्यात पटाईत आहे असे नाही; तर तिच्या ठायी बुद्धिमत्ता, वाक्चातुर्य आणि अभिनय या गुणांचाही समावेश आहे. लहानपणापासूनच तिची आकलन क्षमता आणि स्मरणशक्ती खूप चांगली आहे. एकपाठी असल्याने तिने अनेक राज्यस्तरीय वक्तृत्त्व स्पर्धा गाजवल्या असून तिला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. मनकर्णिका हिच्या नावातच एक आत्मविश्वास, जिद्द, धाडस आणि करारीपणा आहे. तिच्या नावातच एकप्रकारचे वलय आहे. कारण ‘मनकर्णिका’ म्हणजे ‘झाशीची राणी’ तशीच ही मनकर्णिकासुद्धा असल्या या विशिष्ट, दुर्मिळ आणि कोणासही सहज प्राप्त करता येणार नाही अशा कलेचे-शक्तीचे सादरीकरण अतिशय नम्रपणे व चौफेर करते.
कुमारी मनकर्णिका अभिजीत माने या विद्यार्थिनीच्या विक्रमाची नोंद ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये करण्यात आली आहे.  अशी माहिती महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् चे मुख्य संपादक आणि प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. मनकर्णिका अभिजीत माने या विद्यार्थिनीच्या नावावर नोंदवल्या गेलेल्या या विशेष राष्ट्रीय विक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *