माणसाने माणसाला छळू नये!


स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचे सुंदर स्वप्न आम्ही पाहिले;परंतु ते फारसे प्रत्यक्षात उतरलेले दिसत नाही. विषमतेची बिळेअद्याप पूर्णपणे बुजलेली नाहीत. तसे सभोवती जयघोष करणारे खूप आहेत. त्यात स्वार्थ आणि दंभ कुरवाळणारे कमी नाहीत. अशा परिस्थितीत समाजात फोफावत जाणारी विषमता उखडून टाकण्यासाठी नव्याने कोणीतरी पुढे येण्याची गरज आहे. ही गरज नेमकेपणाने अधोरेखित करणारी कविता वामनदादा लिहितात.
‘मी भीमयुगाचा बेटामी भीमयुगाचा रेटाविषमतेला थारातेथे जातो माझा मारामी वादळवारा’
अशी गर्जना करणारे वामनदादा कर्डक हे खऱ्या अर्थाने लोककवी होते. आपल्या इथे अन्याय अत्याचाराची दीर्घ परंपरा आहे. अन्याय,अत्याचार हे एका मर्यादेपर्यंतच सहन केले जाऊ शकतात.अन्याय करणारा जेवढा गुन्हेगार तेवढाच अन्याय सहन करणाराही असतो,याचे भान आलेली,अस्मितेने पेटून उठलेली तरुणांची फळी अन्यायाच्या विरोधात दंड थोपटत आहे.माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठित करणे,त्याचे एकूणच जगणे अर्थपूर्ण होणे या बाबी वामनदादांना महत्त्वाच्या वाटतात.
माणसाने माणसाला छळू नयेएवढे का माणसाला कळू नयेमाणसांचा देश असताना उपाशीमाणसाने तुपात रोटी तळू नये
हा मानवमुक्तीचा लढा आहे. गरीब,कष्टकरी माणसाचे शोषण थांबले पाहिजे. समता आणि स्वातंत्र्य या मूल्यांची रूजवणूक झाली पाहिजे. हा कवी मनाचा ध्यास आहे. त्यातूनच दादांची लोकांच्या काळजाला सहज हात घालणारी, विलक्षण प्रत्ययकारी गीतरचना साकारली आहे. फुले-आंबेडकर यांची विचारधारा वाडी तांड्यापर्यंत पोचवणाऱ्या लोककवी स्मृतिशेष वामनदादा कर्डक यांचा आज जन्मदिवस.
विनम्र अभिवादन!

डॉ. जगदीश कदम, नांदेड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *