देशासाठी प्रत्येक नागरिकांनी कटिबद्ध होऊन आपले योगदान देण्याची अत्यावश्यकता – पालकमंत्री अशोक चव्हाण


नांदेड; दि.१५/०८/२०२०

अनेक ज्ञात, अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या सारख्या असंख्य सेनांनीने भारतीय स्वातंत्र्याचा लढा चालविला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला घटना दिली आणि या घटनेच्या माध्यमातून देशाला लोकशाही मिळाली. याची आपण सदैव जाणीव ठेवून देशाच्या विकासासाठी आपण प्रामाणिकपणे कटिबद्ध होत नागरिक म्हणून आपआपली कर्तव्य सुद्धा पार पाडली पाहिजेत, अशी अपेक्षा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.  
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 73 वा वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री श्री चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी शुभेच्छा संदेश देतांना ते बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, महापौर श्रीमती दिक्षा धबाले, आमदार सर्वश्री अमर राजूरकर, मोहन हंबर्डे, बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, निमंत्रित गुणवंत विद्यार्थी, नागरिक यांची उपस्थिती होती.
देशाची एकता, सदृढ एकोपा, सलोखा राखण्याची मोठी जाबदारी आजच्या नवीन पिढीवर आहे. ही जबाबदारी पार पाडत असतांना आज विशेषत: कोरोना सारख्या महामारीला समोर जात असतांना याचा खंबीरपणे मुकाबला आपण सर्वजन करीत आहोत. डॉक्टर, नर्सेस, वार्ड बॉइज, पोलीस, महसूल प्रशासनासह जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदाचा त्यांनी गौरव केला. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कोरोना सारख्या या प्रसंगाला अतिशय संयमाने आपण सर्व समोर जात आहोत. कोरोनातून अनेक जण मृत्यू पडले असले तरी त्यातून बरे होण्याचे प्रमाणही मोठे आहे. आगामी काळात आपण या कोरोनाच्या महामारीवर मात करुन पुन्हा एकदा आपले जनजीवन नियमित व सुरळीतपणे पार पाडू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 
 नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी माझा कायम प्रयत्न राहिला आहे. परंतू कोरोनामुळे या सुविधेसाठी निधी देण्यासाठी कमतरता आली असली तरी या निधीतून आरोग्या सुविधा बळकट करुन सामान्य नागरिकांना गरजूला विनामुल्य दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. यात विविध रुग्णालयाचे अद्यावतीकरण करण्यावर आमचा भर आहे.  जिल्हा न्यायालयाची नवीन अद्यावत इमारत उभारण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. यासह जिल्ह्यातील विविध विकास कामांना निधी उपलब्ध करुन देण्याचा माझा प्रयत्न असून यामुळे अनेक कामांना गती मिळेल. यंदाचा पाऊस चांगला झाल्यामुळे विविध प्रकल्पातील पाणीसाठा वाढला आहे त्यामुळे पाण्याचा प्रश्न तेवढा चिंतेचा राहिलेला नाही. बळीराजासह आपल्या सर्वांना ईश्वराने शक्ती देवो आणि या कोरोना सारख्या कठीन प्रसंगाला सामोरे जातांना आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण यशस्वी होवो, या शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या. 
जिल्ह्यातील गुणवंतांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कारराष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा दहावीसाठी जिल्ह्यातून सन 2018-19 या वर्षी राष्ट्रीय स्तर परीक्षेत 19 विद्यार्थ्यांची निवड शिष्यवृत्तीसाठी झाली आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव विचारात घेता यातील 5 विद्यार्थ्यांचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला. यात नागार्जुना इंग्लीश स्कूल नांदेडचा तेजस विद्यासागर चेके, महात्मा फुले हायस्कुल नांदेडचा आदित्य गंगाधर बेळगे, ऑक्सफोर्ड इंटर नॅशनल स्कूल नांदेडचा आनंद विश्वनाथ मठपती, ग्यानमाता विद्या विहार नांदेडचा हर्षवर्धन संजय जाजू, जिज्ञासा विद्यालय पुयणी नांदेडचा धीरजकुमार सदाशित पचलिंग या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. 
उद्योग घटकांना पुरस्काराचे वितरण 
जिल्हा उद्योग केंद्र नांदेडच्यावतीने जिल्ह्यातील प्रगतशील उद्योजकांना चालना देण्याच्या उद्देशाने थकबाकीदार नसलेल्या यशस्वी उद्योजकांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावर्षीचा प्रथम पुरस्कार मे. साईकृष्णा फुडस एमआयडीसी नांदेड यांना देण्यात आला. याचे स्वरुप 15 हजार रुपये धनादेश स्मृती चिन्ह, शाल, श्रीफळ असे आहे. द्वितीय पुरस्कार मे. जनता इंडस्ट्रीज धर्माबाद यांना देण्यात आला. या पुरस्काराचे स्वरुप 10 हजार रुपये धनादेश, स्मृती चिन्ह, शाल श्रीफळ असे  आहे. 
कोरोना योद्धांचा सन्मान 
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून औषध विभागाच्या डॉ. स्वरुपा अरगडे, ईएनटी विभागातील डॉ. प्रशांत झाडे, कोरोना आजारावर मात करुन प्लाझ्मा दान केल्याबद्दल सामान्य रुग्णालयातील रेडीओलॉजिस्ट डॉ. राम मुसांडे, भगवान तुकाराम खिल्लारे, कोरोना आजारावर मात केलेले रुग्ण उपचार श्री गुरुगोविंद सिंघजी स्मारक रुग्णालयातील अशोक बच्चेवार, श्रीमती भाग्यश्री भालेराव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *