कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील मौजे गऊळ येथे मध्यरात्री अज्ञातांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली. कोणतीही परवानगी न घेताच हा पुतळा बसविल्याने पोलिसांनी तो हटविण्याचा आदेश दिला.मात्र ग्रामस्थांनी त्याला विरोध केल्याने सायंकाळी पोलीस बंदोबस्तात पुतळा हटविण्यात आला.यामुळे तणाव निर्माण होऊन पोलिसांनी लाठीमार करत १३ व इतर २०-२५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
गऊळ येथे बसस्थानका शेजारी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकासाठी नियोजित जागा आहे.सकाळी हा पुतळा दिसताच ग्रामस्थही अवाक् झाले.पोलिसांना कोणताही थांगपत्ता न लागू देता अज्ञातांनी पुतळा बसवला,मात्र सकाळी पोलिसांना पुतळा दिसल्यानंतर गावात वाद सुरू झाला. कोणतीही परवानगी न घेता पुतळा बसविल्याने तो हटवा अशी भूमिका पोलिसांनी घेतली. पुतळा बसविण्यास विरोध नाही.पण रितसर परवानगी घेऊन तो बसवावा अशी सूचना पोलिसांनी केली.पण त्याला ग्रामस्थांनी विरोध केला.
अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा हटवू नये, आम्ही संरक्षण करू अशी भूमिका त्यांनी मांडली.ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रितसर परवानगीसाठी पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल.तोपर्यंत हा पुतळा हटवू नये असे ग्रामस्थांनी पोलिसांना सांगितले.
गुन्हा दाखल झाला तरी चालेल पण पुतळा हटवू देणार नाही.अशी भूमिका गावातील काही ग्रामस्थांनी घेतली आहे.
उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर,तहसीलदार व्यंकटेश मुंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे यांच्या उपस्थिती पुतळ्याची संरक्षण समिती स्थापणा करण्यात आली. २ सप्टेंबर रोजी पोलिसांनी मोठा फौजफाटा नेत लाठीमार करत पुतळा हटवल्याने गऊळ मोठा तणाव निर्माण झाला.
याप्रकरणी ग्रामसेवक यांच्या तक्रारीवरून कलम ३५३,३३२,१४५,१४७, ३३६,१४८,१४९,१८८,५०४,३०५ नुसार १३ जणांसह इतर २०-२५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सदरील प्रकरणाचा पुढील तपास एपीआय लोणीकर करीत आहेत.