कुटुंबप्रमुख ….आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ,
आपणास क्रांतीकारी जयभीम……
नेता असावा तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांसारखा असे मला नेहमीच वाटत आलेले आहे. त्याची एक प्रचिती मला स्वत:ला अगदी परवाच म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आली.
शुक्रवारी, दि 14 /08/2020 रोजी दुपारी एक सव्वा एकच्या दरम्यान आदरणीय बाळासाहेबांचा मला फोन आला,”किसनराव कुठे आहात?” मी म्हणालो, साहेब मी शेवगावला आहे. “तुम्ही 5 वाजेपर्यंत सुप्याला पोहचा मी आता देऊळगाव राजा सोडलंय, मला 5 तास लागतील तिथे पोहचायला. तिथे एका आदिवासी पारधी समाजातील महिलेवर अत्याचार करुन तिच्या मुलीला अंगावर पेट्रोल टाकून पेटवलय! तुम्ही पोहचा मी येतोय…” बाळासाहेब.
मी हो म्हणालो आणि सुप्याच्या दिशेने निघालो. शेवगाव पासून सूपा साधारणपणे 90 किमीचं अंतर. साहेबांनी त्या महिलेचा मोबाईल नंबर दिला. मीही बोललो त्या महिलेशी आणि साधारण साडेचारच्या दरम्यान मी तिकडे पोहचलो. जाताना नगरमधून आमचा योगेश गुंजाळ हा कार्यकर्ता सोबत घेतला. सुप्याच्या पुढे एका पेट्रोल पंपावर तीन महिला व सुप्यातील अशोक जाधव आणि त्यांचे तीन चार कार्यकर्ते रस्त्याच्या कडेला आमची वाट पाहत होतेच! शेजारच्या हॉटेल मध्ये बसायला जागा होती, तिथे जाऊन बसलो.
ती पीड़ित महिला बोलायला लागली, ‘ती तिच्या तीन लेकरांसोबत वाघुंडे शिवारातील गायरन जमिनीत खोपी करुण राहते. शेजारच्या पळवे गावातील दोघांनी फेब्रूवारी महिन्यात संध्याकाळी तिच्या घरी जाऊन, शेतात ओढ़त नेऊन अत्याचार केला. कुणाजवळ वाच्यता केली तर जीवंत पेटवून देऊ अशी धमकी दिली. महिला पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी गेली तर तिला हाकलून लावले. कारण अत्याचार करणारे बड़े बाप की औलाद! जमीनी midc मधे गेल्याने करोड़ो रु मिळालेले… त्याच्या जोरावर पोलिसही खिशात घातलेले… पीड़ित महिलेने विष घेऊन मरण्याची धमकी दिल्यानंतर पोलिसांनी फिर्याद दाखल करुन घेतली. सहा महिने झाले तरी एक आरोपी सापडत नाही आणि दूसरा काही दिवसांतच पैशाच्या जोरावर बाहेर आला. कोर्टातून मिटवून घे… पैसे देतो …. महिला तयार होत नाही! मग जातीचा, संपत्तीचा माज वर उफाळुन येतो. हिला जीवेच मारून टाकू… आपलं कोण काय वाकडं करणार? या इराद्याने काल तिच्या झोपडीवर गेले आणि दम देऊ लागले. केस मागे घे. किती पैसे लागतात ते ते सांग पण ती महिला तयार होत नाही. यांना राग येतो. ते दारु प्यायलेले… मग सोबत बाटलीभरून आणलेले पेट्रोल तिच्या अंगावर फेकतात… पण ते तिच्या 11 वर्षाच्या मुलीच्या अंगावर पडते. ते नराधम आगपेटीची काडी पेटूवून तिच्या अंगावर टाकतात आणि आल्या मार्गाने घाईघाईने निघून जातात. मुलगी पेटते…ती महिला आरडाओरड करते… लोक जमतात…मुलीला लागलेली आग विझवतात आणि दवाखान्यात घेऊन जातात.
दोन दिवसांपासून सुप्याच्या खाजगी दवाखान्यात ती मुलगी मरणयातना भोगतेय. आई दोन दिवसांपासून पोलिस स्टेशनमध्ये चकरा मारून मारुन दमून गेलीय ,पण तिथला पोलिस इस्पेक्टर मैनेज झाल्याने तो मिटवा मिटवी ची भाषा करतोय. दवाखान्याचा खर्च द्यायला लावतो. कशाला हे प्रकरण वाढवते? ते खुप पैसेवाले आहेत. तू पालातली… तू त्यांना काय पुरणार… मिटवून घे! तिची फिर्याद पोलिस घेत नव्हते. तिला कोणी मदतही करत नव्हते. ती खानदानी बाई! तिला माहित आहे एक माणूस आहे. जो वंचितांसाठी अहोरात्र झटतो आहे.
ती आदरणीय बाळासाहेबांचा मोबाईल नंबर मिळवते… साहेबांशी बोलते. …सगळी कैफियत फोनवर मांडते आणि साहेबही ती ऐकतात. मग मला फोन करुन सुप्याला पठावतात. सगळं ऐकून मला खूप संताप येतो. तासाभरात साहेबही येतात. पुन्हा सगळा भोगवटा ती साहेबांना ऐकवते. साहेब नगरच्या एस.पी.ला फोन करतात….सगळी माहिती देतात. तिथल्या पोलिस इंस्पेक्टरला फोन करतात…एफआयआर का घेतली नाही? ते सांगा अगोदर म्हणून खूप झापतात. तो इन्स्पेक्टर म्हणतो, ‘आता पाठवून द्या साहेब, लगेच घेतो.’ त्या महिलांना बाळासाहेब धीर देतात…आम्ही सगळे पाठीशी आहोत… घाबरु नका… स्वतःचा मोबाईल नंबर त्यांना देतात. “कधीही फोन करा आता तुमच्या सोबत किसनराव येतील. आता त्याचा बाप फिर्याद घेईल!” असा कुटुंब प्रमुखा सारखा धीर देतात आणि माझ्यावर जबादारी टाकून साहेब पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होतात … मी त्यांना घेऊन पोलिस स्टेशनला जातो श. तर हे प्रकरण मिटवण्याची भाषा करणारा पोलिस इन्स्पेक्टर गाडी आणि गाडीत पाच पोलिस घेऊन या महिलेला शोधायला निघाला होता. मी गेटवरच भेटलो तर सुतासारखा सरळ झालेला ..’स्पॉटला जातो पंचनामा करतो आणि लगेच फिर्याद दाखल करुन घेतो, असं म्हणताच ती महिला ओक्साबोक्सी रडायला लागते. ‘साहेब आले म्हणून हे फिर्याद घ्यायला लागले दोन दिवसांपासून यांनी माझी दशा दशा केली..ओ ..सर ….!’
आम्ही सर्वजण तिला समजावतो आणि स्पॉट पंचनाम्यासाठी पोलसाच्या गाडीत बसवून देतो ….आदरणीय बाळासाहेब आम्ही खूप नेते पाहिलेत …अजूनही पाहतोय .. उंटावरुन शेळया हाकणारे… साहेब आपण जमिनीवर येऊन वंचिताना आधार देताहात.. एक कुटुंबप्रमुख या नात्याने… साहेब, आपणास क्रांतीकारी जयभीम!!!
प्रा. किसन चव्हाण, शेवगाव.
मो. 9850291936