शहरातील मूलभूत प्रश्नांवर आ.राजूरकर यांनी घेतली मनपा प्रशासनाची झाडाझडती आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा; अनाधिकृत टॉवर काढणार; दिवाबत्तीची व्यवस्था

नांदेड,दि.१४ (प्रतिनिधी)- विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण जलाशय तुडूंब भरलेला असताना नांदेड शहराला आठ-आठ दिवस पिण्याचे पाणी का मिळत नाही? असा खडा सवाल करत आ. अमरनाथ राजूरकर यांनी मनपा प्रशासनाची आज दि. १४ रोजी चांगली झाडाझडती घेतली. अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्यानंतर दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यासोबतच शहराच्या अनेक भागात चुकीच्या ठिकाणी मोबाईल टॉवर्स उभारण्यात आले आहेत. ते तात्काळ काढण्यात येतील. त्यासोबतच ज्या ठिकाणी दिवाबत्ती नाही अशा नगरांमध्ये दिवाबत्तीची सोय करण्यात येईल असे आश्वासन आ. अमरनाथ राजूरकर यांनी प्रशासनाकडून घेतले.

मागील काही दिवसांपासून शहरालगत असलेली गोदावरी नदी तुडूंब भरुन वाहत असताना शहरात मात्र आठ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यासोबतच शहरातील अनेक भागातील विद्युत लाईट बंद पडले होते. चुकीच्या ठिकाणी मोबाईल टॉवरर्सना परवानगी देण्यात आली होती. या विषयांवर आ. अमरनाथ राजूरकर यांनी मनपा पदाधिकारी, अधिकारी व नगरसेवकांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीस महापौर सौ. मोहिनीताई येवनकर, उपमहापौर मसूद खान, स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे, पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, नगररचनाकार मनोज गर्जे, विद्युत उपअभियंता सतिश ढवळे यांच्यासह सर्व नगरसेवकांची उपस्थिती होती.

उपरोक्त तीन विषयातील शहराचा पाणीपुरवठा हा महत्त्वाचा विषय असून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी विशेष बाब म्हणून २० कोटी रुपये दिले आहेत. गोदावरी नदी तुडूंब भरुन वाहत आहे. मग पाणीपुरवठा सुरळीत का होत नाही? असा सवाल आ. राजूरकर यांच्यासह माजी महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर मसूद खान, स्थायी समितीचे माजी सभापती शमीम अब्दुल्ला यांनी केला. या संदर्भात प्रशासनाकडून दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले. तर विशेष बाब म्हणून मनपाला मिळालेल्या २० कोटींच्या वापरानंतर दररोज पाणीपुरवठा करण्यात येईल असे प्रशासनाने पदाधिकाऱ्यांना आश्वासित केले.

केवळ हैड्रालिक रायडर बंद असल्यामुळे अनेक भागातील लाईटच्या खांबावरील दिवे बदलले नाहीत. परंतु येणाऱ्या चार दिवसात या संदर्भातील यंत्रणा सक्षम करुन गरजेनुसार शहरातील दिवाबत्तीची व्यवस्था करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले, इदगाह मैदानसह शहराच्या अनेक ठिकाणी मोबाईल टॉवरला चुकीच्या पध्दतीने परवानगी देण्यात आली आहे. यासाठी नगरसेवकांनी नगररचना अधिकाऱ्यास धारेवर धरले. चुकीच्या ठिकाणी दिलेल्या परवानग्या तात्काळ रद्द करण्यात येतील असेही सांगितले.

एकूणच आ.अमरनाथ राजूरकर यांनी घेतलेल्या आजच्या बैठकीत त्यांच्यासह मनपाच्या नगरसेवकांनी प्रशासनाची चांगली झाडाझडती घेतली. यावेळी माजी उपमहापौर आनंद चव्हाण, माजी सभापती अमित तेहरा, किशोर स्वामी, उमेश पवळे, विजय येवनकर, सुभाष रायबोले, शोएब, विठ्ठल पाटील, रमेश गोडबोले, नागनाथ गडम, अथरभाई, दुष्यंत सोनाळे, शेर अली, संदीप सोनकांबळे, भालचंद्र पवळे, हबीब मौलाना, रशिदभाई, नासेर, लतीफ, दयानंद वाघमारे, लक्ष्मीकांत गोणे, अलीमभाई, राजू यन्नम, हाफीजभाई, फारुख बदवेल,सुरेश हटकर, चांदपाशा यांच्यासह सर्व प्रभागातील नगरसेवकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *