लसीकरणाच्या अभूतपूर्व यशाबद्दल पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून गौरव

नांदेड :- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्याने दिनांक 17 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात 75 हजार कोविड-19 लसीकरणाचा संकल्प जिल्हा प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला होता. मराठवाडा मुक्ती दिनाच्या दिवशी जिल्ह्यात 55 हजार 33 व्यक्तींनी लस घेऊन कोरोना लसीकरणाच्या साक्षरतेत आपले योगदान दिले. या यशाबद्दल पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाच्या या अभिनव उपक्रमाचे कौतूक करून ही मोहिम अधिक सर्वसमावेशक व व्यापक करण्याच्या प्रयत्नांना व नांदेड जिल्हावासीयांना शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त सुनिल लहाने, आरोग्य विभाग, महसूल विभाग, महानगरपालिका, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, विविध सेवाभावी संस्था यांच्या योगदानातून साकारलेल्या या भव्य लसीकरण मोहिमेला नागरीकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

दिनांक 17 सप्टेंबर रोजी झालेल्या या लसीकरण मोहिमेत नांदेड मनपा क्षेत्रात 5 हजार 102, ग्रामीणमध्ये 39 हजार 778, नगरपालिका क्षेत्रात 10 हजार 153 असे एकुण 55 हजार 33 लसीकरण झाले. लसीकरणासाठी आरोग्य खात्याशी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी, नर्स यांनी विशेष परीश्रम घेतले. या सर्वांचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी अभिनंदन करुन लसीकरण करून घेतलेल्या नागरीकांचेही त्यांनी आभार मानले. यापुढच्या काळातही असे उपक्रम राबवले जाणार आहेत. अशा समाजउपयोगी उपक्रमामध्ये सर्व नांदेड जिल्हावासीयांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *