दुतोंडी सापांचे धर्म..!

दुतोंडी सापांचे धर्म..!

धर्म कोणताही असो, त्याला कोणतंही नाव द्या, कोणताही शब्द वापरा, मानव कल्याण हाच त्याचा गाभा असतो. असायलाच हवा. घमेंड, दांभिकपणा, मुजोरी, खोटारडेपणा, कारस्थान, विकृती किंवा द्वेष जिथे असेल, तिथे धर्म असूच शकत नाही. जिथं दुटप्पीपणा असेल, तिथं धर्म कसा काय असू शकतो ? बाप किंवा आई आपल्याच मुलामध्ये भेदभाव करत असतात का ? एका मुलाला दुसऱ्याचा काटा काढण्याची सुपारी आईवडील कधी देतील का ? असे जगात एकूण किती बाप असतील ? आणि जे काही मोजके असतील त्यांना जगात कुणी मान देईल का, की पागल, विकृत समजले जाईल ?


जे कुणी देवाचं अस्तित्व मानतात, त्यांच्या मनात देव म्हणजे सर्वांचा जन्मदाता, जगाचा पालनकर्ता, कर्ता – करविता, सर्वांची समान काळजी घेणारा, संकटसमयी धाऊन जाणारा, सर्व ठिकाणी व्यापून असणारा, सर्व शक्तिमान अशीच आहे. म्हणजेच देव आपल्या आईवडिलापेक्षा महान आहे. ताकदवान आहे. तो तर विश्वव्यापी आहे. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी तोच व्यापला आहे. हेच सर्व संत सांगतात ! म्हणजे त्याची नजर तर सर्वत्र असते. त्याला अखिल ब्रम्हांडात या क्षणी कुठे काय सुरू आहे, याची बारीसारीक माहिती असते. असायलाच हवी ना ? म्हणजे मग एखाद्या आश्रमामध्ये, एखाद्या प्रार्थना स्थळामध्ये, जर बलात्कार होतो, तेव्हा देवाला दिसत नसेल का ? त्याला ते कळायला नको का ? त्यानं त्याचा विरोध करायला नको का ?  की त्या देवापेक्षा या आसाराम – घासाराम छाप बोगस लोकांची ताकद देवापेक्षा मोठी पडत असावी ? किंवा समजा ते निर्दोष असतील, तर देवानं त्यांना का वाचवू नये ? खोटे पुरावे उघडे पाडण्याचा देवानं प्रयत्न का करू नये ? की कोर्टाचं कामकाज इंग्रजी भाषेत चालते म्हणून देवाला त्यातलं काही कळत नसेल ? 


एखाद्या कोवळ्या मुलीवर, असहाय तरुणीवर, विवाहित महिलेवर बाहेर देखील बलात्कार होतात, त्यांचे खून होतात, तेव्हा ती गोष्ट देवाला का माहीत होतं नसेल का ? अशावेळी तरी त्यानं का धावून जावू नये ? बरं, समजा मुख्यतः देव फार बिझी असेल, तरी इतर देव काय करतात ? किंवा देवी लोकांना ते महिला डिपार्टमेंट सोपवून द्यायला काय हरकत आहे ? देवींची संख्या देखील तर फार मोठी म्हणजेच ५० टक्के आहे ना ? त्या का नाही धावून येत अशावेळी ? एकातरी मुलीला एखाद्या देवीनं वाचवल्याचं कुणी कधी ऐकलं आहे का ? पाहिलं आहे का ? हुंड्यासाठी घरात आलेल्या सुनेला निर्दयपणे छळणारी सासू या देवी लोकांना दिसत नाही का ? निदान विद्येची देवता असलेल्या सरस्वतीनं तरी अशा बिनडोक आणि निर्दय सासू गॅंगचं कौंसिलिंग करायला नको का ? अशावेळी दुर्गा, अंबा, चंडिका, महिषासुर मर्दिनी यासारख्या देवी नेमक्या कुठं बिझी असतात ? आमच्या पोरी रोज घरातल्या घरात पेटवून दिल्या जात असताना, त्यांना त्यांच्या किंकाळ्या ऐकू येत नसतील का ? किंवा ही समस्त देवी मंडळी कुठल्या तरी किटी पार्टीमध्ये बिझी असतात का ? एवढीही फुरसत त्यांना मिळू नये का ? मग त्यांची भक्ती कशासाठी करायची ? तो मूर्खपणा नाही का ? याचा जाब त्यांच्या दलालांना आपण का विचारू नये ? -बरं, संख्याबळाचं काही म्हणावं, तर आपल्या देशातले सारे पोलीस, सारी मिल्ट्री, सारे होमगार्ड या सर्वांच्या संख्येपेक्षा देवांची संख्या तर कितीतरी पटीनं जास्त आहे ! म्हणजे बघा, देशाची लोकसंख्या १३५ कोटी. देवांची संख्या ३३ कोटी. साधारणपणे एका कुटुंबात पाच लोक.

.म्हणजे एकूण कुटुंब होतात २७ कोटी. याचा अर्थ एका कुटुंबाची जबाबदारी एका एका देवाला जरी स्वतंत्रपणे वाटून दिली तरी सहा कोटी देव पुन्हा मोकळे राहतात..! कारण एकूण कुटुंब २७ कोटी.. आणि एकूण देव तेहतीस कोटी ! आता बोला !-बरं, तुम्ही आम्ही समजा पापी आहोत ! पण त्यांच्या कट्टर भक्तांचं काय ? पुजाऱ्यांचं  काय ? देवानं निदान त्यांची तर काळजी घ्यावी ना ? ते तर त्याचे मुख्य एजंट आहेत ! एजंट लोकच सुरक्षित नसतील तर कंपनी कशी चालेल ? बरं, हे मागच्या जन्माचे वगैरे पुण्यवान लोक असतात म्हणे, मग देव यांना असले फालतू धंदे करायला कशाला लावतो ? दानपेटी मध्ये घोटाळे करण्याची पाळी यांच्यावर का येते ? खोटं बोलण्याची, लोकांना मूर्ख बनवण्याची पाळी यांच्यावर देवानं का आणावी ? यांना तरी कोरोनाची लागण का व्हावी ? एखाद्याचा गुडघा दुखत असेल, तर हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची गरज का पडावी ? विशेष म्हणजे यांना गाड्या, मोबाईल, एसी वगैरे सारखी फालतू गोष्टी वापरण्याची गरज का पडावी ? हे तर धर्माचे ठेकेदार आहेत ना ? हे तर पवित्र आत्मे आहेत ना ? देवाचे डायरेक्ट एजंट आहेत ना ? मग यांच्यातल्या सर्वात मोठ्या माणसाची तरी देवानं स्वतः सुरक्षा का करू नये ? त्याला सुद्धा झेड प्लस सिक्युरिटी घेण्याची गरज का पडावी ? सरकार देत असेल, तरी या लोकांनी ती नाकारण्याचा मर्दापणा दाखवायला नको का ? तो जर दाखवला, तर देवावरील आणि स्वतः त्यांच्या प्रामाणिक पणाबद्दल जो संशय लोकांच्या मनात आहे, तो दूर व्हायला मदत होणार नाही का ? की ह्या धर्माच्या दलालांची पापंच जास्त आहेत ? किंवा प्रत्यक्षात देवाची ताकदच नाही या दुतोंडी सापांना वाचवण्याची ? 

शांतपणे विचार करा ! खऱ्या संतांची शिकवण समजून घ्या ! ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करा ! कोणत्याही धर्माचा कोणताही ठेकेदार असो, तो लोकांना जे सांगतो ते तत्वज्ञान आणि स्वतः त्याची कृती, आचरण तपासून बघा, एका क्षणात त्याचा नागडेपणा लक्षात येईल ! लक्षात ठेवा, असल्या दुतोंडी सापांचा कुठलाही धर्म नसतो ! हे सारे छुपे आतंकवादी असतात !-असल्या दुतोंडी सापापासून मुक्त होऊ या ! समाजाला मुक्त करू या ! धर्माला मुक्त करू या ! आपण स्वतः माणूस होऊ या ! समतावादी होऊ या !
तूर्तास एवढंच..


( ‘समतावादी हिंदू धर्म आणि नवा भारत..’ या आगामी पुस्तकातून संकलित.. )
ज्ञानेश वाकुडकरअध्यक्षलोकजागर अभियान

संपर्क – 9822278988 /  9325589603 /  8055502228 / 9004397917 / 9545025189

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *