दहावी परीक्षेचा बुधवारी निकाल


दहावी परीक्षेचा बुधवारी निकाल

नांदेड ;

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल बुधवार, दिनांक 29 जुलै, 2020 रोजी दुपारी 1 वा. जाहीर केला जाणार आहे. खाली दिलेल्या संकेतस्थळावर मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार हा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येईल.

मार्च 2020 मध्ये दहावी परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील संकेतस्थळावरुन उपलब्ध होतील. सदर माहितीची प्रत / प्रिंट घेता येईल. www.mahresult.nic.in, www.sscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com, www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

या निकालाबाबत अन्य तपशील पुढीलप्रमाणे आहे. ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून दहावी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन http://verification.mh-ssc.ac.in/ स्वत: किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय या परीक्षेपासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक अटी, शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी गुरुवार 30 जुलै 2020 ते शनिवार 8 ऑगस्ट 2020 पर्यंत व छायाप्रतीसाठी गुरुवार 30 जुलै 2020 ते मंगळवार 18 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क डेबिट कार्ड, क्रिडेट कार्ड, युपीएल, नेटबँकिंगद्वारे भरता येईल.

मार्च 2020 परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असे त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

मार्च 2020 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेस सर्व विषयासह प्रविष्ठ होऊ उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी / गुणसुधार योजनेंतर्गत उपलब्ध राहतील, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *