फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील फुलवळ येथे जि. प. ची केंद्रीय प्राथमिक शाळा असून या केंद्राअंतर्गत एकूण १७ शाळा असून येत्या चार ऑक्टोबर पासून शाळा नियमित चालू होणार असल्याने आज ता. ३० सप्टेंबर रोजी इयत्ता ५ वी ते ८ वी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी शासनातर्फे मोफत पुस्तक पुरवठा करण्यात आला खरा परंतु फुलवळ येथील शाळेला जाणाऱ्या रस्त्यात खड्डा असल्या कारणाने ती पुस्तक घेऊन आलेली गाडी येथील शाळेत जात नसल्यामुळे नाविलाजने फुलवळ पासून ४ की मी अंतरावर असलेल्या कंधारेवाडी येथील जि. प. शाळेत या तब्बल १७ ही शाळांचे पुस्तक उतरून घेतल्याचे केंद्रीय मुख्याध्यापक बालाजी केंद्रे यांनी सकाळशी बोलताना सांगितले आहे.
हाच जीवघेणा खड्डा कधी कोणाच्या जीवावर बेतेल हे जरी आज सांगणे कठीण असले तरी अन्य अनेक कामांच्या वाहतुकीसाठी हा रस्ता आणि तो खड्डा खूपच अडगळीचा बनला आहे. सदरच्या खड्याकडे व रस्त्याकडे ना प्रशासन लक्ष घालतेय ना ही ग्राम पंचायत त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला असून या नाकर्तेपणा ला ग्रामस्थ पार वैतागून जाऊन संताप व्यक्त करत आहेत. कालच एका महिलेची प्रसूती याच खड्यामुळे व रस्त्यामुळे वाहन आरोग्य उपकेंद्रात वेळेवर न पोहचल्यामुळे प्रसूतीकळा अनावर झाल्याने त्या महिलेची प्रसूती वाटेतच झाली ही या प्रशासन व ग्राम पंचायत च्या नाकर्तेपणासाठी शर्मनाक बाब घडली आहे तर आज शालेय पुस्तक फुलवळ ऐवजी कंधारेवाडी येथे उतरून घ्यावे लागेल ही खेदजनक बाब म्हटले तर वावगे ठरणार नाही.
फुलवळ संकुलाअंतर्गत एकूण १७ शाळा येतात त्यात फुलवळ जि . प. शाळेसह श्री बसवेश्वर विद्यालय , कंधारेवाडी , सोमासवाडी , मुंडेवाडी , वाखरड , वाखरडवाडी , पानशेवाडी , दैठणा , सोमठाण , दैठणा , दैठणावाडी सह तांडे , वाड्या येथील जि. प. शाळा व संस्थेच्या शाळांचा सामावेश आहे. याच एकूण १७ शाळेतील इयत्ता ५ वी ते इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शासनातर्फे मोफत पुस्तक वाटप करण्यासाठी आज पुस्तके आली परंतु फुलवळ च्या शाळेला जाणारा रस्ता त्या खड्यामुळे बंद असल्याने आज नाविलाजने कंधारेवाडी येथे ते उतरून घ्यावे लागेल परंतु अंतर्गत शाळेंच्या शिक्षकांना नाहक त्रास सहन करत ४ की मी चा अंतर पार करून पुस्तकं घ्यायला जावे लागेल असेही केंद्रीय मुख्याध्यापक बालाजी केंद्रे यांनी बोलून दाखवले .
तसेच येत्या ४ ऑक्टोबर पासून शाळा नियमितपणे चालू होणार आहेत तेंव्हा कोणाच्याही लेकराला कसलाही नाहक त्रास होऊ नये यासाठी संबंधित यंत्रणेने सदर चा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली . पाहू या गंभीर बाबीकडे कोणकोण लक्ष घालेल आणि तो खड्डा तात्काळ बुजवून तो रस्ता सुरळीत चालू करण्यासाठी प्रयत्न करेन याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.