निकष बाजूला ठेवून तिप्पट मदत द्यावी -शंकरअण्णा धोंडगे : अतिवृष्टीग्रस्तांच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा

नांदेड : अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होवून खरिपातील पिकांसह भाजीपाला व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे राज्य शासनाने निकष बाजूला ठेवून पश्‍चिम महाराष्ट्रानुसार सरसकट तिप्पट मदत देण्याची मागणी राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी केली.

राष्ट्रवादी किसान सभेच्यावतीने सोमवारी दि.४ रोजी महात्मा फुले पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकर्‍यांच्या उपस्थितीत धडक मोर्चा काढण्यात
आला. यावेळी ते बोलत होते.

मोर्चात राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ता पवार, कल्पना डोंगळीकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, माजी सभापती संजय कर्‍हाळे, दिलीप धोंडगे, मनोहर भोसीकर, शिवराज पाटील धोंडगे डा. सुनील धोंडगे, प्रल्हाद फाजगे, शिवदास धर्मापूरीकर, वसंत सुगावे, ॲड. विजय
धोंडगे, कंधार युवक राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजकुमार केकाटे, प्रभाकर आढाव, संभाजी पाटील कुदळकर, फुलाजी ताटे रामदास मोरे स नारायण शरद पाटील सचिन शिंदे घोरबांड, राजू पांगरेकर यांच्यासह जिल्ह्यातून आलेले शेतकरी उपस्थित
होते.

नैसर्गीक आपत्तीमुळे पिकांसह जमिन, घरांचे नुकसा झाले आहे. तसेच अनेकांना जीव गमवावा लागला. यात जनावरेही दगावली. यातून सावरण्यासाठी तातडीची मदत आवश्यक आहे. या परिस्थितीकडे शासनाचे लक्ष आहेच पण यावेळची परिस्थिती गंभीर असल्यामुळे निकष बाजूला सारुन विशेष बाब म्हणून पंचनामे न करता सर्व नुकसानग्रस्तांना कोल्हापूर, सांगली प्रमाणे तिप्पट मदत द्यावी,

पिकविमा योजनेतील जाचक अटी रद्द करुन विमाधारकांना शंभर टक्के भरपाई द्यावी, शेतकर्‍यांचे कर्ज माफ करावे, कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे, ओला दुष्काळ जाहीर करुन रब्बीसाठी बियाणे व खत मोफत द्यावे, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी यावेळी धोंडगे यांनी केली.

मोर्चानंतर पदाधिकार्‍यांनी निवासी उपजिल्हाधिकारी
प्रदीप कुलकर्णी यांना निवेदन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *