‘कोरोना योध्दा’ म्हणून पत्रकार विश्वांभर बसवंते यांना भारतीय जनता पार्टीकडून मिळाला सन्मान
कंधारः-
कोरोना विषाणूच्या महामारीमध्ये सामाजिक बांधिलकी जोपासत केलेल्या कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या वतीने फुलवळ ता.कंधार येथील भूमीपुत्र तथा दै.एकमतचे तालुका प्रतिनिधी पत्रकार विश्वांभर बसवंते यांना प्रमाणपत्र देऊन ‘कोरोना योध्दा’ म्हणून सन्मानित करण्यात आले.
संपूर्ण जगासह देशात व राज्यात कोरोना विषाणू या महामारीने थैमान घातले आहे. मार्च महिन्यापासून आजपर्यंत कोरोना विषाणूचे रूग्ण वाढतच आहेत. यामुळे शासन युध्द पातळीवर प्रयत्न करीत असून ही महामारी रोखण्यासाठी सर्वच ठिकाणी मोठे प्रयत्न होत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नका, घरीच रहा, सुरक्षित रहा, अशा आवाहनाबरोबर सर्वच ठिकाणी लाॅकडाऊन करण्यात आले आहे. विशेषतः फुलवळ सारख्या खेडेगावात गेले काही दिवसात कोरोना बाधित रूग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. याच काळात आपल्या कामाबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासत फुलवळचे भूमीपुत्र तथा दै.एकमतचे तालुका प्रतिनिधी पत्रकार विश्वांभर बसवंते यांनी आपल्या सहकारी पत्रकारांना सोबत घेऊन कोरोना संबंधित सकारात्मक जनजागृती करत शासकीय कोविड वैद्यकीय यंत्रणेला मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने पत्रकार विश्वांभर बसवंते यांना प्रमाणपत्र देऊन ‘कोरोना योध्दा’ म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी अनेक पत्रकार, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनिस, आशा वर्कर व सफाई कामगार यांचाही ‘कोरोना योध्दा’ म्हणून सन्मान करण्यात आला.
रक्षाबंधन निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या नांदेड जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. चित्ररेखाताई गोरे यांनी राखी बांधून भावबंध वृद्धिंगत केले, तर कंधार न.प.चे उपनगराध्यक्ष जफर बहोद्दीन यांच्या वतीने मास्क व सॅनिटायझर देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाबुरावजी केंद्रे उमरगेकर, भाजपा शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार, ॲड.सागर डोंगरजकर, राजहंस शहापुरे, नगरसेवक सुनील कांबळे, रजत शहापूरे, सौ.वंदना डुमणे, सौ.सुनंदा वंजे यांच्यासह चिखलीकर परिवारातील अनेक मान्यवरांची शासन नियमांचे पालन करत सामाजिक अंतर ठेवून उपस्थिती होती.