कंधारः- (विश्वांभर बसवंते)
कोरोना विषाणू या संसर्गाचा शिरकाव वाडी-तांड्यापर्यंत पोहोचला असून या आजाराशी दोन हात करण्यासाठी आपली, आपल्या कुटुंबाची व गावाची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून किमान दोन मीटरचे शारीरिक अंतर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आता साजरे होणारे सण पोळा, मोहरम व गणेशोत्सव हे वाजंत्रीच्या गजरात मिरवणूक काढून साजरे न करता विना वाद्य, विनासाऊंड, जमाव एकत्र येऊन मिरवणूक न काढता साधेपणाने साजरे करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन कंधार तहसिलचे तहसिलदार सखाराम मांडवगडे यांनी केले आहे.
सोमवार दि.१७ ऑगस्ट २०२० रोजी तहसिल कार्यालयामध्ये शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कंधार तहसिलचे तहसिलदार सखाराम मांडवगडे, कंधार पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास जाधव, कंधार न.प.चे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, नायब तहसिलदार एस.व्ही.ताडेवाड यांची उपस्थिती होती.
आता साजरे होणारे पोळा सण, गणेश उत्सव व मोहर्रम यासारखे सण व उत्सव साधेपणाने साजरे करावे आणि या कालावधीत अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर गणेशमूर्ती ही ४ फुट उंचीपेक्षा जास्त नसावी. आज होत असलेला पोळा हा सण, त्यात बैलांची मिरवणूक एकाच वेळी न काढता सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत टप्प्या-टप्याने सुरक्षित अंतर ठेवून बैल फिरवावेत. आरतीच्या ठिकाणी गर्दी न करता शासन नियमांचे पालन करून शक्यतो अॉनलाईन आरतीचा लाभ घेण्याचे आवाहन करावे. तसेच मोहर्रम आदी सणांमध्ये प्रत्येकवेळी मास्क, सॕनिटायजर वापरुन सामाजिक अंतर पाळावे असे पो.नि.विकास जाधव यांनी संबोधित केले.
यावेळी भाजपा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा चित्ररेखा गोरे, बाबाराव पाटील शिंदे, भाजपा शहराध्यक्ष ॲड.गंगाप्रसाद यन्नावार, नगरसेवक कुरेशी, मन्ना चौधरी, हमीद सुलेमान यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी, विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.