लहुजी साळवे निराधार बालकाश्रमात फटाके व मिठाई वाटून यावर्षी लायन्स क्लब ची आगळ्या वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी

नांदेड : प्रतिनिधी


एक दीपावली की शाम,अनाथ बच्चों के नाम या उपक्रमांतर्गत लायन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या वतीने धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व अरुणकुमार काबरा यांच्या हस्ते
लहुजी साळवे निराधार बालकाश्रमात फटाके व मिठाई वाटून यावर्षी आगळ्या वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली .

बुधवारी संध्याकाळी धनगरवाडी तालुका नांदेड येथील लहुजी साळवे बालकाश्रमात लायन्स परिवारातील सदस्य जमा झाले. या वेळी घेण्यात आलेल्या दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रोजेक्ट चेअरमन ला. बिरबल यादव यांनी केले.

दिलीप ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना दिवाळीचे महत्व मुलांना सांगून एका वर्षासाठी मुलांनी नवीन संकल्प घेण्याची शिकवण दिली. संस्थेचे अध्यक्ष लालबा घाटे यांनी संस्थेबद्दलची माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या लेखाधिकारी कीर्ती सुस्तरवार यांनी आपल्या भाषणातून दिलीप ठाकूर व त्यांच्या टीमचे सतत समाजसेवा करत असल्याबद्दल कौतुक केले. यानंतर मुलांना सुरसुरी, रॉकेट, लक्ष्मी बॉम्ब ,भुईचक्र, रस्सी, नाग, अनार, पेन्सिल, टिकल्या, बंदूक प्रत्येकी एक एक बॉक्स दिल्यामुळे मुले खुश झाली. मिक्स मिठाईचे पॉकिट प्रत्येकाला देण्यात आले. मुलांनी देशभक्तीपर गीत सादर करून सर्वांची मने जिंकली.

लायन्स परिवाराने बालगृहाच्या इमारतीत सर्वत्र दिवे लावण्यात आल्यामुळे परिसर उजळून निघाला. बालाजी मंदिराचे महंत कैलास महाराज वैष्णव यांच्या हस्ते फटाक्यांची मोठी लड लावून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिव अरुणकुमार काबरा यांनी तर आभार सहसचिव सुरेश शर्मा यांनी मानले.

यावेळी चंद्रप्रकाश तिवाडी, विद्या पाटील, पुष्पा गायकवाड, मीनाक्षी पाटील, व्यंकटेश वाकोडीकर ,श्रीराम मोटरगे हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेखा घाटे, सविता कल्याणकर, राहुल सूर्यवंशी, सावंत मॅडम यांनी परिश्रम घेतले. मुबलक फटाके व मनसोक्त मिठाई मिळाल्यामुळे अनाथाश्रमातील बालकांनी झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर नाचून आपला जल्लोष व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *