डॉ.विठ्ठलराव लहाने : माणसातील देवत्व जपणारे व्यक्तिमत्व

( दि.०७ नोव्हेंबर २०२१ रोजी लोकनेते स्व.आ. गोविंदरावजी राठोड साहेब यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून प्राचार्य गंगाधरराव राठोड मित्र मंडळाने सन्मान प्रतिष्ठीतांचा व डॉ. विठ्ठलराव लहाने यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने लिहिलेला हा प्रासंगिक लेख)

मा.डॉ.विठ्ठल लहाने साहेबांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात आई अंजनाबाई व वडील पुंडलिकराव यांच्या पोटी माकेगाव ता.रेणापुर जि.लातुर येथे झाला. लहानपणची गरिबी त्यांनी जवळून पाहिली व वेळोवेळी अनुभवली.त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आपल्या गावी माकेगाव ता. रेणापूर जि. लातूर येथून पूर्ण केले.नंतर विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथून पूर्ण केले. बारावीला चांगले गुण प्राप्त झाल्यामुळे त्यांचा नंबर एम.बी.बी.एस.साठी मराठवाड्याची त्या काळात विद्यानगरी समजल्या जाणाऱ्या अंबाजोगाई जि. बीड येथे लागला व तेथून त्यांनी १९९३ ला एम.बी.बी.एस.ची पदवी प्राप्त केली.

महत्त्वाची बाब म्हणजे या परीक्षेत ते सर्वप्रथम आले. त्यासाठी ठेवलेली अनेक पारितोषिके त्यांनी प्राप्त केली.एम.एस.सर्जरीचे शिक्षण त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथून १९९६ ला पूर्ण केले. त्यानंतर एम.सी.एच. प्लास्टिक सर्जरी ही सर्वोच्च पदवी ग्रँट मेडिकल कॉलेज व सर जे.जे. ग्रुप हॉस्पिटल्स मुंबई येथून जानेवारी २००० ला पूर्ण केली.


त्या नंतर त्यांनी Resident in Gen.Surgery,सिनीयर रेसिडेन्ट इन प्लास्टीक सर्जरी लेक्चरर,असोसिएट प्रोफेसर म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद,ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई, एम.आय.एम.एस.आर. मेडिकल कॉलेज लातूर येथे काम केले. त्यांनी मेट्रोपॉलिटन सिटीज मधील सुवर्ण संधी नाकारून लातूर सारख्या ग्रामीण भागात ५० बेडच्या लहाने हॉस्पिटलचे उद्घाटन आपल्या मायी अण्णांच्या म्हणजेच आई-वडिलांच्या हस्ते करून आई-वडिलांच्या संस्काराची प्रचिती जगासमोर ठेवली. या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी प्रसिद्ध समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे, डॉ. विकास आमटे, आपले वडीलबंधू प्रसिद्ध नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने या सर्वांची उपस्थिती लाभली होती.


कितीही बिकट परिस्थिती असली तरीही आई-वडिलांचे योग्य संस्कार व आपल्या मनाची जिद्द असेल तर माणूस किती मोठा होऊ शकतो हे डॉ. विठ्ठल लहाने सरांकडे बघून लक्षात येऊ शकते. वैद्यकीय क्षेत्रात स्थिरस्थावर झाल्यावर ही त्यांनी या क्षेत्रातले संशोधन सुरूच ठेवले. त्यांनी अनेक संशोधन पेपर विविध वैद्यकीय परिषदांमधुन आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर सादर केले. त्यांचे आडनाव जरी लहाने असले तरी कार्य मात्र महान आहे. विशेष म्हणजे जगातील बारा पुरस्कार प्राप्त प्लास्टिक सर्जन पैकी एक लहाने साहेब आहेत.त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अमेरिकेचा ‘द स्माईल ट्रेन हिरो आवार्ड’ हा अत्यंत मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार त्यांना २७ ऑक्टोबर २००७ रोजी प्राप्त झाला. त्यामध्ये त्यांनी लहान मुलांच्या मदतीसाठी केलेले योगदान लक्षात घेतले आहे. हा पुरस्कार आतापर्यंत जगातल्या बारा प्लास्टिक सर्जनना प्राप्त झाला आहे. यात यांचे नाव अग्रभागी आहे.टाटा मोटर्स स्माईल ट्रेन यांचेकडून त्यांच्या कार्याबद्दल त्यांना नॅनो कार भेट दिली आहे.सध्या ते स्माईल ट्रेन प्रोजेक्ट अमेरिकेचे डायरेक्टर आहेत.

मागील तेरा वर्षापासून त्यांनी मीक मायक्रो ग्राफ्टिंग टेक्निकद्वारे महाराष्ट्रात २००० पेक्षा जास्त जळीत रुग्णांवर उपचार करून त्यांना वाचविले आहे. या बध्दलचा आमचा एक अनुभव आहे.मागील काही वर्षांपूर्वी आमच्या ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड येथील एक विद्यार्थी लातूर येथे युवक महोत्सवात आदिवासी नृत्य सादर करताना बराच जळाला होता. वाटले होते आता तो वाचू शकणार नाही परंतु वेळीच डॉक्टर साहेबांकडे त्याला नेण्यात आले साहेबांनी त्याच्यावर विनामूल्य उपचार करून त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले व आज त्याचा चेहरा अत्यंत सुंदर बनला आहे.

तो जळाला होता हे ही सकृतदर्शनी लक्षात येत नाही. असे किती तरी रूग्ण त्यांनी वाचवले आहेत.चेन्नई येथून प्रकाशित डॉ. मथांगी रामकृष्णन यांनी लिहिलेल्या पेडियाट्रिक बर्न मॅनेजमेंट या विषयावरील पुस्तकाचे त्यांनी सह लेखन केले आहे.

महाराष्ट्रात दुभंगलेले ओठ आणि टाळूवर तसेच बर्न केसवर सर्वाधिक शस्त्रक्रिया करण्याचा विक्रमही त्यांनी केला आहे.आजपर्यंत त्यांनी ५०,००० पेक्षा अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. या शस्त्रक्रिया पैकी बऱ्याच शस्त्रक्रिया त्यांनी मोफत केल्या आहेत.आजही ते दर दिवशी दोन-तीन शस्त्रक्रीया मोफत करतात. खरे तर प्लास्टिक सर्जरी ही अत्यंत श्रीमंत लोकांची ब्रँच परंतु तिला गरिबांपर्यंत पोहचवण्याचे काम गेल्या वीस वर्षापासून डॉ. विठ्ठल लहाने सर करताना दिसतात.


ते वैद्यकीय क्षेत्रातील विविध संघटनेचे कार्य पार पाडतात.ज्यात प्लास्टिक सर्जन असोसिएशन, नॅशनल बर्नस अकॅडेमी ऑफ इंडिया व इंडियन मेडिकल असोसिएशन सर्जन्स असोसिएशन, हॅंड सर्जरी असोसिएशन,रूरल सर्जन असोसिएशन या सर्वांचे ते आजीवन सभासद आहेत. तसेच २००३ते २००७ या कालावधीत ते आय.एम.ए.लातूरचे अध्यक्ष राहिले आहेत.


त्यांनी व त्यांचे मोठे बंधू डॉ. तात्याराव लहाने यांनी जो आजपर्यंत केलेला प्रवास आहे तो अनेकांना प्रेरणा देणारा आहे म्हणूनच त्यांची अनेक भाषणे ‘मी कसा घडलो’ या शिर्षकाने महाराष्ट्रभर गाजताना दिसतात.युट्युब वर ही त्यांची अनेक भाषणे लाखो लोकांना प्रेरणा देणारी ठरत आहेत.


आपल्या मातृभूमीवर व माता पित्यावर कसे जीवापाड प्रेम करावे याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे दोन्ही लहाने बंधू आहेत. त्यांच्या ठिकाणी असलेली उत्कृष्टतेची ओढ अनुकरणीय आहे.जे करायचे ते उत्तम नव्हे तर अतिउत्तम. यासाठी दोघेही आपापल्या क्षेत्रात उच्चांकी कार्य करताना दिसतात. आपल्या परिवारावर जसे त्यांचे जिवापाड प्रेम आहे तसेच प्रेम समाजाच्या शेवटच्या माणसावर ही करताना दिसतात. त्यांच्या या वैद्यकीय व सामाजिक कार्यात त्यांना कार्य करण्याची प्रेरणा ही वडील बंधु पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांच्या कडून मिळाल्याचे ते सांगतात.तसेच या कामात त्यांना याच वैद्यक क्षेत्रात कार्यरत असलेल्या त्यांच्या सौभाग्यवती डॉ.कल्पना लहाने यांचे ही मोलाचे सहकार्य लाभते.खरे तर त्यांच्याबद्दल असे म्हणता येईल की ‘देवदूत कोणी खोदत बसला सुंदरतेची लेणी ‘ असे चेहऱ्याने व ओठाने कुरुप असलेल्या कितीतरी लोकांना सौंदर्य प्रदान करण्याचे काम ते करत आहेत. माणसांना प्लास्टिक सर्जरीच्या माध्यमातून बाहेरून सुंदर बनवतात तर आपल्या विचार व आचारातून आतून सुंदर बनवण्याचे काम करत आहेत.या माध्यमातून अनेक विद्रुपांना सुंदरता प्रदान केली आहे.अशा तनाने आणि मनाने समाज सुंदर बनविणा-या महनीय व्यक्तींचा सहवास परीसासारखा आहे. त्यांच्या स्पर्शाने सन्मान मुर्ती सोन्यासारखे झळकतील यात नवल नाही.


अशा या खऱ्या अर्थाने देवदूत असणाऱ्या व माणसातील देवत्व जपणार्‍या डॉक्टर साहेबांना दीर्घायुष्य व आरोग्य लाभो अशी अपेक्षा व्यक्त करतो व शिवकुमार बंडे व त्यांचे सर्वच वयोगटातील मित्र हे मानवतावादी विचार मंचाच्या माध्यमातून असो की प्राचार्य गंगाधरराव राठोड मित्र मंडळाच्या माध्यमातून असो अत्यंत देखणे व समाजोपयोगी कार्यक्रम घेत आहेत.

याचा आपणा सर्वांना अभिमान आहे. ज्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त हा कार्यक्रम होतो आहे ते लोकनेते स्व.आ. गोविंदरावजी राठोड साहेब हे खऱ्या अर्थाने गरिबांचे कैवारी होते. त्यांनी आपला देह चंदनाप्रमाणे झीजवला.त्यांच्या पुण्यस्मरणाला तशाच प्रकारचे काम करणारे डॉ. विठ्ठलराव लहाने उपस्थित झालेत त्याबध्दल मी त्यांचे मनापासून स्वागत करतो. अत्यंत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सम्मान हे मित्रमंडळ करत आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो व मोहनावतीकरांना भविष्यात असेच समाजोपयोगी कार्यक्रम द्यावेत या अपेक्षेसह माझा शब्द प्रपंच थांबवतो.

           प्रा.डॉ.रामकृष्ण बदने 
 ग्रामीण महाविद्यालय,वसंतनगर
        ता.मुखेड जि.नांदेड
  भ्रमणध्वनी - ९४२३४३७२१५






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *