फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील फुलवळ ग्राम पंचायत चा कारभार हा रामभरोसे झाला असून जबाबदारीची जाणीव ग्राम पंचायत मध्ये कोणालाही नसल्याचे चित्र पहावयास मिळत असून एकीकडे कोणत्या न कोणत्या कारणाने आठ आठ दिवस पाणी पुरवठा खंडित असतांना दुसरीकडे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होताना दिसतो आहे , त्यामुळेच फुलवळ ग्राम पंचायत ने बेजबाबदारपणाचा कळस गाठला अशी बोलकी प्रतिक्रिया गावकऱ्यातून ऐकायला मिळत आहे.
अकरा सदस्यीय असलेल्या फुलवळ ग्राम पंचायत अंतर्गत फुलवळ सह सोमासवाडी , महादेव तांडा , केवळा नाईक तांडा यांचा समावेश असून सहा हजाराच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या या ग्राम पंचायत अंतर्गत रस्ते , नाल्या , पाणी पुरवठा आदींना बकाल अवस्था प्राप्त झाली असून शासन नियमानुसार गाव विकासासाठी येणारा पैसा नेमका कुठे खर्च केला जात आहे याबद्दल गावकऱ्यांना तसूभरही कसलीच कल्पना मिळत नसून कोरोना नंतर सध्याची परिस्थिती सुरळीत झाली असतांना ही अद्याप एकही ग्रामसभा या ग्राम पंचायत ने आयोजित केली नसल्याने ग्राम पंचायत मध्ये नेमकं काय चाललंय हेच कोणाला कळेनासे झाले असून आंधळं दळतय अन कुत्र पीठ खातय अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जातो आहे.
येथील ग्राम पंचायत ला जाणाऱ्या मुख्य रस्त्या लगत नवी आबादी ( बेघर वस्ती ) साठी नियमित पाणी पुरवठा साठी पाईप लाईन करण्यात आली होती. त्या पाईप लाईन मधून नेमका किती दिवस पाणी पुरवठा झाला देव जाणे पण वारंवार बसस्टँड शेजारीच ग्राम पंचायत व जि.प. शाळेला जाणाऱ्या रस्त्यात गेली चार महिन्यांपूर्वी खोदून ठेवलेल्या खड्यामुळे तेंव्हापासून ती पाणी पुरवठा ची पाईपलाईन फुटून विस्कळीत झाली आहे . ती पाईपलाईन अद्यापही जोडली नसल्याने पाणी पुरवठा तर बंदच आहे परंतु सदर पाईप उघडा असल्याने दररोज हजारो लिटर पाण्याचा विनाकारण सांडवा होताना पाहायला मिळतो आहे आणि त्याच जीवघेण्या खड्यात पाणी साचून त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त होते आहे.