कंधार;(युगसाक्षी )
वार्षिक सभेत सभासदांनी ठराव घेण्यास आक्षेप नोंदवताच गंगापुत्र मत्स्य व्यवसायिक सहकारी संस्थेच्या चेअरमनने प्रोसिडिंग घेऊन पळ काढल्याची तक्रार संस्थेच्या सभासदांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) नांदेड, यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नियमाचे उल्लंघन करून घेण्यात आलेली वार्षिक सभा रद्द करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नवरंगपुरा (ता.कंधार) येथील गंगापुत्र मत्स्य व्यवसायिक संस्थेने शुक्रवारी (ता.१४) कोरोना काळात वार्षिक सभा ठेऊन कायद्याचे उल्लंघन केले आहे. सभा रद्द करण्यासाठी लेखी निवेदन देऊनही चेअरमन कोंडीबा फुलवळे यांनी त्याकडे दुर्लक्ष करून नियमबाह्य सभा बोलावली. सभेत ठराव घेण्यास सभासदांनी विरोध केला असता बाचाबाची झाली. सभासदांना दमदाटी व शिवीगाळ करून चेअरमनने प्रोसिडिंग घेऊन पळ काढला.
सभा झाली नसल्याने चेअरमनकडून काही मोजक्या सभासदांची दिशाभूल करण्याची शक्यता आहे. प्रोसिडिंगवर स्वाक्षऱ्या घेऊन कोरम पूर्ण झाल्याचा देखावाही चेरमनकडून उभा केला जाऊ शकतो. याची दखल घेऊन सहाय्यक निबंधकांनी गंगापुत्र मत्स्य व्यवसायिक संस्थेची सभा रद्द ठरवावी, असेही निवेदनात पुढे म्हटले आहे.
निवेदनावर संभाजी कुरुळेकर, सरवरशाह, शेख अन्वर, व्यंकटी नागलगावे, शेख जावेद, राहिमखान, शेख मुख्तार, आनंदा फुलवळे, गोविंद बामनवाड, माणिक पंदीलवाड, शंकर बामनवाड, बालाजी दिगंबर, गोपाळ फुलवळे, बाबू पोचीराम, देविदास सखाराम, शंकर बाबा यांच्यासह आदी सभासदांच्या स्वाक्षऱ्या आहेत.