सोलापूर : – डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील समतावादी समाज निर्माण करण्यासाठी शोषित, पीडित समाजाला त्याचे मुलभूत अधिकार मिळणे गरजेचे असून आजपर्यंत कोणत्याही सरकारने कमजोर व असंघटित असलेल्या समुहाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला नाही. पुढारी, लोकप्रतिनिधी स्वतःच्या स्वार्थासाठी वेळोवेळी समाज पक्षाच्या दावणीला बांधला त्यामुळे बोटावर मोजता येतील अशी माणसे मोठी झाली अन् समाज देशोधडीला लागला.
आता यापुढे याचक म्हणून मागायचे नाही तर माणूस म्हणून हक्काची लढाई लढली पाहीजे.तेंव्हा स्वाभिमानी युवकांनी पुढे यावे असे आवाहन लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा रामचंद्र भरांडे यांनी केले.
जांभूड ता माळशिरस येथे आयोजित महत्वपूर्ण बैठकीत प्रा रामचंद्र भरांडे हे बोलत होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कार्याध्यक्ष दत्ताभाऊ नाईकनवरे हे होते तर यावेळी जेष्ठ समाजसेवक रामतात्या साठे अकलूज, तानाजी नाना नाईकनवरे, अॅड दत्तराज गायकवाड यांची उपस्थिती होती.
बार्टी अर्थात डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यात मातंग,मादगी, बुरुड, होलार तत्सम उपजातीवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असल्याचे रामतात्या साठे यांनी नमूद केले.
हक्काची लढाई जोखीम घेण्याची तयारी असणारा तरूणच लढू शकतो असा विश्वास दत्ताभाऊ नाईकनवरे यांनी व्यक्त केला.तर तानाजी नाना यांनी या लढ्यात दानत असलेल्या घटकांनी आपले योगदान दिले पाहिजे असे मत नोंदवले.