अकोला – (युगसाक्षी )
जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत सर्व शाळांमध्ये शिक्षकांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष अध्यापन करण्यासाठी जिल्हा परिषदेने आदेशित केले आहे. ज्या शाळांची पटसंख्या १ ते १० च्या दरम्यान आहे अशा शाळा नियमित सुरु करण्यात याव्यात याबाबतचे लेखी पत्र सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना धाडले आहे.
तसेच ज्या शाळांची पटसंख्या १० पेक्षा जास्त आहे व ज्या विद्यार्थ्यांचे आॅनलाईन पद्धतीने शिक्षण होऊ शकत नाही, ज्यांना प्रत्यक्ष अध्यापनाची आवश्यकता आहे अशा विद्यार्थ्यांसाठी शालेय परिसरातील वर्गखोल्या, मोकळ्या जागेत, क्रीडांगण अथवा तत्सम ठिकाणी ५-१० विद्यार्थ्यांच्या गटाने सामुदायिक वर्ग भरवून नियोजनाप्रमाणे अध्यापन करण्याबाबत सुचविले आहे.
इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येऊन कार्यवाही करावी असेही सांगण्यात आले आहे. शाळेतील कोणतेही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत तसेच कुणाची तक्रार येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने ठरवून दिलेल्या लाॅकडाऊन काळातील सर्व नियम पाळून सर्व माध्यमांच्या व आस्थापनाच्या शाळा सुरु करण्यात येऊन त्याचा दर आठवड्याला आढावा घेण्यात यावा असेही शिक्षणाधिकारी यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे.