खून करणाऱ्यास जन्मठेप व पाच हजार रुपये दंड : कंधार जिल्हा न्यायालयाचा निकाल

प्रतिनिधी, कंधार

लोहा येथे पाच वर्षापूर्वी दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून एका ५० वर्षीय व्यक्तीचा खून करणाऱ्या आरोपीस कंधारचे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायाधीश अतुल सलगर यांनी जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा गुरुवार दि. 18 नोव्हेबर ठोठावली आहे.

चिखलभोसी ता. कंधार येथील ज्ञानोबा वामनराव वरपडे (५०) हे दि. ६ एप्रिल २०१६ रोजी सायंकाळी ७ वाजता लोहा येथील सराफा बाजारातील मारोती मंदिराच्या शेजारी बसलेले असताना पेनूर ता. लोहा येथील नंदकुमार राजाराम खर्जुले (५२) यांनी ज्ञानोबा वरपडे ला दारु पिण्यासाठी पैसे मागितले.

ज्ञानोबा वरपडेने यास नकार दिला. तेंव्हा आपल्याजवळील लोखंडी तिक्ष्ण हत्याराने नंदकुमार खर्जुलेने ज्ञानोबा वरपडे च्या गळ्यावर आणि शरीरावर अनेक वार केले.

ज्ञानोबा वरपडेला जखमी करुन पळून जाणाऱ्या नंदकुमार खर्जुलेला जनतेतील लोकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

लोहा पोलीस ठाण्यात जानकीराम वामनराव वरपडे यांनी आपले भाऊ ज्ञानोबा वामनराव वरपडेचा खून करणारा आरोपी नंदकुमार राजाराम खर्जुलेविरुध्द

तक्रार दिली. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला. तत्पूर्वी जखमी अवस्थेत ज्ञानोबा वरपडे यांना लोहा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देवून पुढील उपचारासाठी नांदेडच्या सरकारी रुग्णालय, विष्णूपुरी येथे पाठविले.

पण दुर्देवाने ६ एप्रिल २०१६ च्या रात्री ज्ञानोबा वरपडे यांचा मृत्यू झाला. लोहा येथील तत्कालीन पोलीस निरीक्षक आर. आर. काथवटे यांनी खून करणाऱ्या नंदकुमार खर्जुलेला अटक करून सखोल तपास केला. आणि त्याच्याविरुध्द लोहा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पुढे हे प्रकरण कंधार न्यायालयाकडे वर्ग झाले. न्यायालयात या प्रकरणी १३ साक्षीदारांनी आपले जबाब नोंदविले.

न्यायालयासमक्ष आलेला तोंडी आणि वैद्यकीय पुरावा ग्राह्य मानून न्यायाधीश अतुल सलगर यांनी ज्ञानोबा वरपडेचा खून करणाऱ्या नंदकुमार राजाराम खर्जुलेला जन्मठेप आणि पाच हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली.

या खटल्यात सरकार पक्षाची बाजू अॅड. महेश कागणे यांनी बाजू मांडली. लोहाचे पोलीस अंमलदार एस. एस. वरपडे यांनी पैरवी अधिकारी म्हणून या खटल्यात भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *