नांदेड (गंगाधर गच्चे) :
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मुंबई येथील पाच स्वयंसेवी संस्थांनी सातत्याने सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा कोरोनाच्या बिकट परिस्थितीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन ऑनलाईन गौरव केला.
मुंबई येथील श्री स्वामी समर्थ कृपा सिंधू सामाजिक संस्था तसेच हेल्प सामाजिक संस्था, शिवशाही मित्र मंडळ, सनवे मीडिया या पाच सेवाभावी संस्थांतर्फे ॲड. दिलीप ठाकूर यांचा पंधरा ऑगस्ट रोजी ऑनलाईन गौरव करण्यात आला. यावेळी हेल्प सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनील मांजरेकर यांनी शुभेच्छा देताना ॲड. दिलीप ठाकूर यांचे कोरोनाच्या कठीण परिस्थितीत नांदेड येथे बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी सतत बावन्न दिवस घरपोच जेवणाचे डबे पुरवण्याचे अविस्मरणीय कार्य केल्याबद्दल कौतुक केले.
सनवे मीडियाचे अध्यक्ष शरदसिंह ठाकूर यांनी बोलताना असे सांगितले की,आपल्या आगळ्यावेगळ्या सामाजिक कार्यक्रमातून सतत पस्तीस वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या ॲड. ठाकूर यांनी आपल्या सेवेतून मानवतेचे एक नवीन उदाहरण ठेवले आहे. शिवशाही संस्थेचे अध्यक्ष अरुण गोळवणकर यांनी प्रतिपादन केले की ,ॲड. ठाकूर यांना आम्ही प्रत्यक्ष ओळखत नसलो तरी त्यांचे सामाजिक कार्य सोशल मीडियात नेहमी चर्चेत असल्यामुळे त्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
ॲड. ठाकूर यांना यापूर्वी “धर्मभूषण” ही उपाधी, मराठवाडा भूषण पुरस्कार,आदर्श शिवसैनिक पुरस्कार,राजपूत भूषण पुरस्कार,माँ जिजाऊ रत्न पुरस्कार, समाज विभूषण पुरस्कार,राजे छत्रपती शिवाजी सेवाभाई पुरस्कार ,मातोश्री गंगूताई पुरस्कार,जीवन साधना पुरस्कार, भगत नामदेव लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्ड, शान ए नांदेड, अन्नपूर्णा प्रेरणा रत्न पुरस्कार, कानडा राजा पंढरीचा राष्ट्रीय कृपा पुरस्कार, तिरंगा गौरव पुरस्कार, लॉयन्स बेस्ट प्रोजेक्ट इंटरनॅशनल अवार्ड देऊन देशभरातील विविध संस्थातर्फे गौरविण्यात आले आहे. मुंबईच्या पाच सामाजिक संस्थांनी एकाच दिवशी दिलीपभाऊ ठाकूर यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मान केल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.