नांदेड –
जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी दोन भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक जिल्ह्यातील निवडक शाळांना भेटी देऊन आॅनलाईन तथा आॅफलाईन पद्धतीने घेण्यात येत असलेल्या अध्यापन पद्धतीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची निवड करुन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांना या विशेष मोहिमेवर पाठविले आहे.
कोव्हिड – १९ च्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील शाळा बंद आहेत. या शैक्षणिक वर्षात आॅगस्ट अखेर शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सप्टेंबर पासून शाळा सुरु करण्याचा मानस असल्याबाबत भूमिका स्पष्ट करणाऱ्या दस्तुरखुद्द शिक्षणमंत्री ना. वर्षाताई गायकवाड यांनी आता केंद्र सरकारच्या निर्देशानुसार शाळा सुरु होतील असे म्हटले आहे. परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १७ आॅगस्ट रोजीच्या आदेशानुसार दोन भरारी पथकाची नियुक्ती करुन त्यांनी शाळा चालू करण्याच्या अनुषंगाने दोन तालुक्यातील निवडक शाळांना भेटी देऊन शिक्षक, पालक, शालेय व्यवस्थापन समिती यांच्याशी चर्चा करावयाची आहे.
दोन तालुक्यातील सोयीचे ठिकाण निश्चित करुन संबंधित गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्या बैठकांचे आयोजन करुन त्यात भेटी दरम्यान झालेल्या चर्चेच्या मुद्द्यांवर आढावा घेऊन जिल्हा परिषदेला सादर करावयाचा आहे असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. आर. कुंडगीर यांच्या नेतृत्वाखाली उपशिक्षणाधिकारी माधव सलगर, शिक्षण विस्तार अधिकारी शिरीष आळंदे, गटशिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के, शिक्षण विस्तार अधिकारी संजय येरमे, हनुमंत पोकळे यांची तर प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्या नेतृत्वाखाली मनपाचे शिक्षणाधिकारी दिलिप बनसोडे, शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी नाईकवाडे, उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय मठपती, उपशिक्षणाधिकारी जगदिश भरकर, निरंतरचे शिक्षणविस्तार अधिकारी प्रदिप सुकाळे यांचा समावेश आहे. माध्यमिक आणि प्राथमिकविभागाचे पथक १९ आॅगस्ट रोजी अनुक्रमे बिलोली, धर्माबाद या तालुक्यात, २० रोजी मुदखेड, अर्धापूर मध्ये, २१ रोजी भोकर आणि उमरी, २४ ला कंधार – लोहा, २५ रोजी देगलूर – मुखेड, माहूर व किनवटमध्ये २८ रोजी तर ३१ रोजी नांदेड, नायगाव या तालुक्यातील शाळांना भेटी देणार आहेत.
१८ आॅगस्ट रोजी पोळा असल्यामुळे सदरील पथकांनी हदगाव, हिमायतनगर या तालुक्यांच्या भेटी स्थगित करण्यात आल्याचे समजते, त्या आता पुढील नियोजनाप्रमाणे होतील. दि. २६ व २७ या तारखा ज्येष्ठा गौरी पुजनामुळे व २८ रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन असल्यामुळे या तारखा वगळण्यात आल्या आहेत. १सप्टेंबरला शाळा सुरू झाल्या तर पूर्वतयारी म्हणून शाळा भेटीदरम्यान पथक काय काय पाहणार आहेत याबाबत शाळास्तरीय भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांची पूर्वतयारी चालली आहे.शा.व्य.स.व मुअ नियोजनाप्रमाणे शिक्षक शाळेत आहेत का? कार्यदिनी शाळा कार्यालय सुरू आहे का? पहिलीला प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे १००% प्रवेश झालेत का?प्रवेशफॉर्म पूर्ण भरून सह्या, शिक्के पूर्ण आहेत का?प्रवेश निर्गम रजिस्टरवर सर्व पहिलीची नावे आहेत का? सर्व वर्गांच्या विद्यार्थी हजेऱ्या ऑगस्टपर्यंत नावे लिहून पूर्ण आहेत का? मागील वर्षीच्या मार्च,एप्रिल हजेऱ्या पूर्ण आहेत का? गोषवारे पूर्ण आहेत का?
शाळेच्या शेवटच्या वर्गाच्या मुलांच्या सर्व टी.सी.,गुणपत्रिका, संचिका वाटप झाल्यात का? शिक्षकांना लॉकडाऊन मध्ये हजेरी साठी(२४जून जीआरनुसार) दिवस वाटप, वर्ग व विषयवाटप नियोजन आहे का ?तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या मोबाईल क्रमांकाची वर्गनिहाय यादी आहे का? मुलांचे वॉटसअप ग्रुप केलेत का? मुलांना दररोज अभ्यास टाकता का?वॉटस नसणाऱ्यांना,साधे मोबाईल असणाऱ्यांना कोव्हिड खबरदारी घेऊन गृहभेटी दिल्यात/देता का? मुले टीव्ही वर कार्यक्रम पाहतात का? गावात निवडक मुलांच्या घरी अधिकारी भेट देतील. दैनिक निरीक्षण नोंदवही, गुणनोंद रजिस्टर (३०एप्रिल२०२०) पूर्ण आहे का? एक मूल, एक झाड लावणे, मागील वृक्ष संगोपन,शा.व्य.स.बैठक रजिस्टर ठराव इ.पाहिले जाईल.
वरील सर्व अभिलेखे शाळेतच पाहण्यासाठी उपलब्ध ठेवावेत. कुणीही अभिलेखे घरी राहिले म्हणू नये. शाळेत सर्वजण मास्क/नाक- मुखावरण वापरतील. ६फूट शारीरिक अंतर पाळतील. सँनिटायझरचा वापर असेल. उघड्यावर कुणीही थुंकणार नाही. मास्क शिवाय कुणाला शाळेत प्रवेश असणार नाही.(कोव्हिड१९आचारसंहिता) स्वच्छता संकुलात टॉवेल, साबण,पाणी व्यवस्था; हात धुण्यासाठी साबण,पाणी व्यवस्था आहे का? अशा प्रश्नांची सरबत्ती पथक करणार आहे.