नांदेड – भारतीय संविधान हे भारतातील तमाम नागरिकांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या चतुसुत्रीवर आधारलेली सर्वमानवहितैषी भूमिका घेते. भारतीयांच्या सर्वांगीण विकासाची सूत्रे संविधानातच आहेत. त्याचे छोटे प्रारुप म्हणजे संविधानाची उद्देशिका आहे. परंतु खंत याची वाटते की केवळ प्रास्ताविकेचे वाचन करून चालणार नाही, तर मोठ्या प्रमाणात जी संवैधानिक मूल्यांची पडझड होत आहे; ती रोखणे गरजेचे आहे असे प्रतिपादन येथील साहित्यिक समीक्षक गंगाधर ढवळे यांनी केले.
ते जवळा देशमुख येथे संविधान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सरपंच प्रतिनिधी साहेबराव शिखरे, ग्रामसेवक अंबुलगेकर, मुख्याध्यापक ढवळे जी. एस., माजी सरपंच कैलास गोडबोले, आनंद गोडबोले, मारोती चक्रधर, हरिदास पांचाळ, भारत गवळी, हैदर शेख, पांडूरंग गच्चे, संतोष घटकार, सुलोचना गच्चे, राजू शिखरे, रत्नदीप गच्चे, इंदिरा पांचाळ आदींची उपस्थिती होती.
भारतीय संविधान दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच बुद्ध विहारात प्रास्ताविकेचे वाचन संपन्न झाले. शाळेत झालेल्या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना ढवळे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, देशभरात भ्रष्टाचार, हिंसा, धार्मिक कट्टरतावाद, अन्याय अत्याचाराची प्रकरणे, शोषण, काळा पैसा, वाढती गुन्हेगारी, मानवी हक्कांचे उल्लंघन, पर्यावरणाचा ऱ्हास, सामाजिक असुरक्षितता अशा घटनांनी असंवैधानिक मूल्यांचा ऱ्हास होत चालला आहे. संविधानासमोर निर्माण होत असलेले अडथळे दूर केले तरच आपण सर्वांगीण विकासाची वाटचाल करु. ही जबाबदारी प्रामुख्याने संविधान संस्कृतीच्या रक्षकांनी स्विकारायला हवी असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच संविधानाच्या प्रतीचे मान्यवरांच्या हस्ते पुष्प पूजन करण्यात आले. त्यानंतर गावातील मुख्य रस्त्यावरुन विद्यार्थ्यांची संविधान रॅली काढण्यात आली.
बुद्ध विहारात आल्यावर भंते धम्मपाल यांनी रॅलीचे स्वागत केले. बुद्ध वंदनेसह प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. रॅलीदरम्यान लक्ष्मीबाई गच्चे आणि कमलबाई गच्चे यांनी पुष्प वाहून अभिवादन केले. जिल्हा परिषद शाळेतच रॅलीची सांगता करण्यात आली.