पेटलेली माणसे हा कविता संग्रह विद्रोहाचे प्रतिबिंब -प्रसिध्द विचारवंत प्रा.डॉ.अनंत राऊत यांचे प्रतिपादन

नांदेड – पेटलेली माणसे हा कविता संग्रह विद्रोहाचे प्रतिबिंब आहे. परिवर्तनवादी साहित्य चळवळीच्या निखळ प्रवाहात या साहित्यकृतीचे मौल्यवान असे योगदान ठरेल असे प्रतिपादन प्रसिध्द विचारवंत प्रा.डॉ.अनंत राऊत यांनी रविवारी येथे बोलतांना केले.
नांदेडचे भूमिपूत्र व हैद्राबाद येथील प्रसिध्द ऱ्हृदयरोग तज्ज्ञ डॉ.सिध्दार्थ सोनकांबळे यांच्या पेटलेली माणसे या काव्य संग्रहाचे प्रकाशन रविवारी सिडको येथील आंबेडकरवादी मिशनच्या सभागृहात एका शानदार सोहळ्यात करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.


यावेळी प्रसिध्द ऱ्हृदयरोग तज्ज्ञ तथा माजी खासदार डॉ.व्यंकटेश काब्दे, शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.पी.टी.जमदाडे, प्रसिध्द बालरोग तज्ज्ञ डॉ.संग्राम जोंधळे, आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम, प्रा.डॉ.आदिनाथ इंगोले, कोषागार विभागाचे सहसंचालक उत्तम सोनकांबळे, डॉ.धम्मसंगीनी रमागोरख, डॉ.यशवंत चव्हाण, व्यंकटेश रोकडे पाटील, डॉ.अशोक धबाले, डॉ.दिलीप फुगारे, डॉ.सुर्यकांत लोणीकर, डॉ.अनंत सूर्यवंशी, डॉ.विद्याधर केळकर, डॉ.विठ्ठल भुरके, डॉ.नितीन पाईकराव, डॉ.सुधीर कांबळे, दिगंबर मोरे, माजी नगरसेवक वाय.जी.सोनकांबळे, सौ.कमलबाई सोनकांबळे, इंजि.नामदेव मोडक, सौ.अंजनबाई मोडक, डॉ.शितल सोनकांबळे, इंजि.प्रकाश नगारे, ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी, पत्रकार प्रकाश कांबळे, पत्रकार दत्ताहरी धोत्रे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.


आपल्या भाषणात डॉ.अनंत राऊत पुढे म्हणाले की, 1960 नंतर खऱ्या अर्थाने मराठी साहित्य समृध्द झाले. दलित, परिवर्तनवादी साहित्यामुळे मराठी साहित्याला नवा आयाम मिळाला. पेटलेली माणसे हा काव्यसंग्रह समाजाच्या अंतर भावनाचा ठाव घेणारा आहे. कवी उच्चशिक्षीत ऱ्हृदयरोग तज्ज्ञ असले तरी त्यांचे मन व ऱ्हृदय हे अत्यंत हळवे आहे याची प्रचिती अनेक कवितांमधून येते. त्यांनी अत्यंत संवेदनशीलपणे समाजातील प्रत्येक समस्येचा ठाव घेतला आहे. समाजातील विद्रोहाला लागलेला कॅन्सर काढून टाकण्यासाठी क्रांतीकारक होण्याची भूमिका कवितेतून व्यक्त होते. अपेक्षा, मैत्रय, बुध्द, गाडगेबाबा यांच्या विचारांवर लोकांना परिवर्तनाची मुळाक्षरे शिकावी लागणार आहेत.

असा संदेश देखील या कविता संग्रहातून मिळतो. परिवर्तनवादी चळवळीवर आपल्या कवितेतून डॉ.सोनकांबळे यांनी भाष्य केले आहे असे डॉ.राऊत यांनी स्पष्ट केले.


डॉ.सोनकांबळे हे अत्यंत संवेदशील मनाचे असून त्यांनी साकारलेल्या कविता समाजाला दिशादर्शक आहेत. त्याच बरोबर त्या प्रेरणादायी देखील आहेत असे मत प्रभारी अधिष्ठाता डॉ.पी.टी.जमदाडे यांनी व्यक्त केले. यावेळी बोलतांना डॉ.सिध्दार्थ सोनकांबळे यांच्या कार्याचा गौरव करुन डॉ. संग्राम जोंधळे म्हणाले की, विपश्‍यना साधनेमुळे त्यांचे चित्त निर्मळ झाले. त्यामुळे समाजातील समस्या संवेदनशीलपणे त्यांनी समजून घेवून त्यांनी पेटलेली माणसे या कविता संग्रहात मांडल्या आहेत. नुसत्या मांडल्याच नसून माणसे पेटविण्याचे काम देखील त्यांच्या कविता करतात असे त्यांनी स्पष्ट केले.


यावेळी बोलतांना आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम म्हणाले की, आंबेडकरवादी मिशन सत्त्येची प्रमुख स्थाने काबिज करण्यासाठी अधिकाऱ्यांची फौज घडविण्याचे काम आहोरात्र करीत आहे. आता या बरोबरच जगातल्या सर्वोच्च विद्यापीठांमध्ये आंबेडकरवादी विचारांच्या मुला-मुलींची शिक्षण घेणारी एक नवी पिढी निर्माण करण्याचा मानस आम्ही केलेला आहे. जागतिक दर्जाचे शिक्षण घ्यावे व समाजाप्रती आपली कृतज्ञता कायम ठेवावी. ही भावना विद्यार्थ्यांमध्ये जागरुक करण्याचे काम मिशन करीत असल्याचे कदम यांनी सांगितले.


प्रारंभी बोधी फाऊंडेशनच्यावतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.धम्मसंगीनी रमागोरख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अविनाश नाईक यांनी केले तर आभार डॉ.धम्मसंगीनी रमागोरख यांनी मानले.



आंबेडकरवादी सर्वोच्च सामाजिक पुरस्कार प्रदान
देगलूरचे मुळ रहिवाशी असलेले डॉ.सिध्दार्थ सोनकांबळे यांनी वैद्यकीय क्षेत्रात एम.डी.,डी.एन.बी. ही उच्चशिक्षीत पदवी मिळविल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील बौध्द समाजातील ते पहिले सुपर स्पेशालीटी डॉक्टर ठरले. वैद्यकीय सेवे बरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासत सतत कार्यरत राहणारे डॉ.सिध्दार्थ सोनकांबळे यांचा आंबेडकरवादी मिशनच्यावतीने दीपक कदम यांनी आंबेडकरवादी सर्वोच्च सामाजिक पुरस्कार डॉ.सोनकांबळे यांना प्रदान करुन सन्मान केला. आपल्या कविता संग्रहात आंबेडकरवादी मिशनची वाटचाल स्पष्टपणे मांडल्याबद्दल तसेच कविता संग्रहाच्या एक हजार प्रति मिशनला दान दिल्याबद्दल दिपक कदम यांनी डॉ.सिध्दार्थ सोनकांबळे यांचे आभार व्यक्त केले. मिशनच्यावतीने डॉ.सिध्दार्थ सोनकांबळे, त्यांच्या पत्नी डॉ.सौ.शितल सोनकांबळे, वडिल माजी नगरसेवक वाय.जी. सोनकांबळे, आई सौ.कमलाबाई सोनकांबळे यांचा यथोचित कौटुंबिक सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *