नांदेड -समाजाच्या विकासात गुणवंतांचा सिंहाचा वाटा असतो. एकेकाळी वंजारी समाजाला ओळख नव्हती ती लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी करून दिली.डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रामकृष्ण बदने सारखी माणसे ही समाजासाठी भूषण आहेत. अस्यांचा सत्कार हा इतरांना प्रेरणा देणारा असतो.वंजारी समाज हा कष्टाळू आहे, सर्व समाजाच्या विकासासाठी तर आपण प्रयत्न करतोतच. पण ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजासाठीचा कळवळा आपल्या अंतकरणात असायला हवा.समाजावर प्रेम करणे म्हणजे इतर समाजाचा तिरस्कार करणे असे नसून जे समाजात काही कारणांनी रंजले गांजले असतील, अडचणीत असतील अशांना मदत करून पुढे जाण्यास मदत करणे महत्त्वाचे आहे.अस्या गुणवंतांचा सत्कार हा इतरांना प्रेरणा देणारा ठरतो असे प्रतिपादन माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे यांनी नांदेड वंजारी समाजाच्या वतीने आयोजित प्रा. डॉ.रामकृष्ण बदने व अन्य गुणवंतांचा सत्कार प्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना नांदेड येथे केले.
यावेळी प्रमुख सत्कारमूर्ती म्हणुन बोलताना प्रा.डॉ. रामकृष्ण बदने म्हणाले की मला आपल्या विद्यापीठाच्या उत्कृष्ट शिक्षक (ग्रामीण) हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आपण माझा सत्कार केला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. समाजाने केलेला सत्कार म्हणजे आईने केलेल्या सत्कारासारखा आहे.सत्कार हा सद्गुणांचा होत असतो.सत्कारामुळे सत्कारमूर्तीला आचारसंहिता लागू होते. तिचे पालन करावे लागते.मी समाजासाठी सतत प्रयत्न करत राहीन. जीवनात तीन सत्कार महत्त्वाचे असतात. ज्यात मातृभूमीने केलेला सत्कार, कर्मभुमीने केलेला सत्कार व ज्या समाजात जन्मलो त्या समाजाने केला गेलेला सत्कार. मला हे तीन ही सत्कार मिळविण्याचे भाग्य लाभले. यापुढे ही मी चांगलेच काम करण्याचा प्रयत्न करीन.
या वेळी जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीत समावेश झाल्याबद्दल एस.जी.एस. महाविद्यालय नांदेडचे प्रा. डॉ. सतिश हामंद व प्रा.डॉ. रघुनाथ होळंबे यांचा सत्कार करण्यात आला व त्यांनी त्याला उत्तर दिले.
सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी. वालचंद मुंडे,अभियंता खेडकर, विद्यार्थी विकास विभाग स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे प्रा. डॉ.ज्ञानोबा मुंडे यांचीही समयोचित भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपाचे ज्येष्ठ नेते रामराव केंद्रे यांनी करून कार्यक्रम आयोजन पाठीमागची भूमिका विशद केली.सर्वप्रथम राष्ट्रसंत भगवानबाबा व लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रबध्द संचलन रामराव केंद्रे यांनी केले तर आभार संजय केंद्रे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ गणीतज्ञ जनार्धन मुंडे गुरुजी, प्रल्हादराव गीत्ते, रामराव केंद्रे, अशोक गीते व अन्य मान्यवरांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास सेवानिवृत्त उपप्राचार्य डॉ.जी.सी.बदने,प्रा.डॉ.डी.आर.मुंडे,प्रा. डॉ.वणवे,अजित केंद्रे,,व्यंकटेश साठे,केशव मुसळे,हणमंत तिडके,खूशाल कांगणे,,हौसाजी नागरगोजे,जयवंत केंद्रे,मधुकर नागरगोजे, संभाजी गुट्टे,रमेश केंद्रे, या सह समाजातील व्यापारी,नौकरदार ,यूवा बांधव उपस्थित होते.