(दिव्यांग दिनाचे औचित्य साधून कलाशिक्षक दत्तात्रेय एमेकर यांनी त्यांच्या जीवन प्रवास केलेला आहे . ते जन्मताच दिव्यांग नव्हते परंतु एका विशिष्ट आजाराने ते दिव्यांग झाले आहेत तरीपण त्यांनी जगण्याची जिद्द सोडली नाही त्यांचं कार्य हे इतरांना लाजवेल असेच आहे . त्यांचा अल्पसा परिचय वाचकाला व्हावा म्हणून युगसाक्षी परिवाराने केलेली छोटी सा प्रयत्न )
माझा जन्म मुखेड तालुक्यातील पाळा या खेडे गावी आजोबा केशवराव ढगे यांच्या घरी 1972 च्या 7 नोव्हेंबर रोजी सौ.कुसुमबाई गोपाळराव एमेकर माऊलीच्या उदरी झाला.माझे शालेय जीवन हालाखीत झाले.विद्यार्थी दशेत असतांना मला कलेची आवड माझ्या बहाद्दरपुरा नगरीत माझ्या शनिदेव गल्ली माझ्या शेजारी राहणारे कलाध्यापक केशवराव डांगे हे श्री शिवाजी हायस्कूल हतईपुरा येथे कलाध्यापक होते. कलेची आवड असल्यामुळेच त्यांनी शालेय जीवनात कलेची गोडी लावली. आपण कांहीतरी केले पाहिजे असेच वाटायचे.
माझ्या एमेकर परिवारात महालक्ष्मी सजावट अख्या गावात सुंदर असत.त्यावेळी परिवारातील ज्येष्ठ मंडळी सजावट करत असतांना मला कान धरुन त्या सजावट खोलीतुन हाकलून लावले. तेंव्हा लहान सातवी/आठवीत
असेल मी रडत एका कोपर्यात बसुन थोड रडलो…पण दुसर्याच क्षणाला रडू थांबवून निश्चय केला.एक ना एक दिवस मला सजावट कशी बरी आहे का?असे विचारणे भाग पाडेल?असा निश्चय केला.ही माझ्या आयुष्यातली पहिली जिद्द अॅक्टिव्ह झाली.मी दहाव्या वर्गात असतांना मला परीक्षा फिस भरण्याची ऐपत नव्हती.एका पाहुण्याकडे फिस भरण्यास पैसे मागितले.त्यांनी पैसे नाही म्हणटले पण त्या ठिकाणीच एक नातलग महिलेने माझ्या आई-वडीलास पैसे नसतीलतर हाटेलात ठेवा.असा फुकटचा सल्ला दिला.ही माझी पहिलीच जिद्द अॅक्टिव्ह झाली.
माझ्या कलेचा आरंभच गणेशोत्सव, महालक्ष्मी गोरीपुजन,नवरात्र महोत्सव यातून सजावट करणे सुरु ठेवले.माझ्या जीवनातली पहिली सुबक आरास 1991 च्या गणेशोत्सवात पहिल्यांदाच म.बसवेश्वर गणेश मंडळ टावरच्या अग्नेय दिशेला एका दुकानात नारळाच्या शेंड्या पासून श्रीफळाची निर्मिती करुन त्या गणेश विराजमान समोर नेहरु बालोद्यानाची निर्मिती केली.
त्या वेळी सजावट करतांना माझी अन् प्रकाश डोम्पले या जिवलग मित्राची गट्टी जमली.1993 साली गणेशोत्सव व नवरात्र महोत्सव यात भाग घेवून कष्ट केले..पण सत्कार पासून जाणुनबुजुन डावलण्यात आले.येथे माझी व्दितीय जिद्द अॅक्टिव्ह करण्याची संधी मिळाली.त्या काळी भाई दत्तात्रयराव कुरूडे यांनी स्थापन केलेल्या कै. ऊल्हास कुरुडे सार्वजनिक वाचनालयात फक्त 30 रुपये महिन्याला या मानधनावर ग्रंथालयात ग्रंथपाल पदी सेवेत 1988 ते 1994 पर्यंत काम करत पदवीचे शिक्षण पुर्ण केले.
त्या आधी शालेय जीवनात एका वर्षी माझ्या मांडीला मोठा गड्डा आला.त्यावेळी जयक्रांति क्रिकेट टिमचे पैसे जमले त्यातले पैसे मला सर्व मित्रांनी दिले.त्यात मुक्तेश्वर धोंडगे,अनिल कुरुडे,सदाशिव आंबटवाड आदी मित्रांनी पूढाकार घेतला होता.नंतर 1986-87 ला डाॅ.अरुण कुरुडे यांचे कडे मी कंपाऊंडर म्हणुन 80 रुपये महिना नोकरी केली.
त्याकाळी टेलिव्हिजनवर रामायण मालीका सुरु होती.ग्रंथालयात सेवा देत असतांना दररोज वर्तमान पत्र डाॅ.भाई केशवराव धोंडगे साहेब यांच्या घरुन आणावे लागत असे.जवळपास 1994 पर्यंत हे नित्याने सुरु होते.त्या काळात ग्र॔थालय सांभाळून पदवी पर्यंत शिक्षण पुर्ण केले.
16 जुन 1994 साली मला श्री शिवाजी विद्यालय बारुळ या विद्यालयात ग्रंथपालपदी नेमणूक झाली.त्या शाखेत जवळपास 20 वर्ष सेवा करत असतांना विद्यार्थ्यांना सृजनशीलता व वक्तृत्व कलेत पारंगत करत व्यक्तीमत्व विकासाचे शिक्षण दिले.विविध भित्तिपत्रके त्यात क्रांति,मुक्ताई,सावित्री,वेद, तर जिनीयस, शब्दांमृत,आत्मकथन हस्तलिखित अशी अनेक हस्तलिखिते विद्यार्थ्यांच्या साहित्यिक कला गुणांना वाव मिळावा यासाठी भित्तीपत्रके व हस्तलिखिते विविध कार्यक्रमाच्या औचित्याने प्रकाशित केली.
महाराष्ट्रात कधी न झालेला शालेय उपक्रम म्हणजे ज्ञानमाता मातोश्री मुक्ताई धोंडगे यांच्या 2010 साली झालेल्या पुण्यतिथी कार्यक्रमात चक्क विद्यार्थ्यांनी 12 भाषेत चरित्रात्मक विचार एका मराठी शाळेत व्यक्त करुन इतिहास घडविला.
माझ्या बहाद्दरपुरा,ता.कंधार या नगरीत विविध सण-उत्सवाच्या माध्यमातून समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम करतांना विविध आरास,कलापथकाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. 1990 पासून आजतागायत अखंडीत कार्य सुरु आहे.श्रीफळात श्री गणेश विराजमान,
त्यात आळंदी येथील प्रवेशद्वार प्रतिकृती,हुतात्मा स्मारकाची प्रतिकृती,स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त शासकीय लोगो प्रकाशित झाला,त्या लोगोवर विराजमान गणेश,विरपनने राजकुमार ओलीस ठेवले होते ते झांकी रुपाने मांडून आरास,पाचफड्याच्या शेषनागावर गणेश विराजमान, महाकाली भुयारात, क्रांतिटावर भोवती दिड क्विंटलची रांगोळी साकार,अण्णा हजारे यांची व्यक्तिरेखा साकारतांना सत्याग्रहाचा जिवंत देखावा.श्री शिवाजी विद्यालय बारुळ येथे बोधीवृक्षांखालीच माझ्या कवितेचा जन्म 2010 साली झाला.तेंव्हा पासून माझ्या कविमनाचा वाढदिवस 6 सप्टेंबर रोजी साजरा होतो.
अशी कितीतरी लक्षवेधक आरास तयार करुन कलेची छाप गावावर पडली.जागतिक गुराखी साहित्य संमेलन गुराखीगड ता.लोहा येथे जागतिक गुराखी साहित्य संमेलन गुराखीगडचे निर्माते डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या प्रसिद्ध बातम्यांचे प्रदर्शन, कारगील शौर्यगाथा, आजीबाईंचा बटवा,श्रीसंत गुरु नानकदेवजी महाराज हुजूर साहेब गुरुव्दारा,संत नामदेव महाराज मंदिर व कालप्रियनाथ केशवेश्वर मंदिर शांतीघाट बहाद्दरपुराची प्रतिकृतिचे प्रदर्शन, श्री कालप्रियनाथ केशवेश्वर लिंग मंदिराची पाण्यात प्रतिकृतीचे प्रदर्शन, हस्तकलेतून निर्माण कलेल्या वस्तूंचे प्रदर्शन, अलंकारिक गणेशाचे चित्र प्रदर्शन या अशा विविध प्रदर्शनानी गुराखी साहित्य संमेलनाची शोभा वाढवून,संत तुकाराम महाराज, गोरक्षनाथ महाराज, सेवालाल महाराज,शिवाजी महाराज, गाडगे महाराज, उर्लिंगपेद्दी महाराज, संत निवृती महाराज, बसवेश्वर महाराज, म.फुले, जिजाऊ माॅ.साहेब, छ.संभाजी महाराज, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, वीर नगोजी नाईक, संत रोहिदास महाराज यांच्या सहित अनेक जवळपास 30-35 सिमेंट-रांगोळीचे माध्यम वापरुन पुतळे निर्माण केले.आमचे प्रेरणास्त्रोत संयोजक डाॅ.भाई केशवराव धोंडगे साहेब यांच्या संकल्पनेतून योग्य त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केली.
2013 श्री शिवाजी विद्यालय कुरुळा या ज्ञानालयात चार वर्ष सेवा केली.तेथे माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम साहेब यांची जयंती वाचन प्रेरणादिन म्हणून साजरी करण्याची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ईमकारकिर्दित झाली.त्यावेळेस मुख्यमंत्रीचे अभिनंदन करतांना 101 पोस्टकार्ड विद्यार्थ्यांनी लिहून मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य विधानभुवन मुंबई या पत्यावर पाठवणारी पहिली शाळा ठरली.तेथेही भित्तिपत्रके आणि हस्तलिखिते विद्यार्थ्यांनकरवी करुन घेतले.वकृत्व कौशल्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्या कालखंडात “खंदारी वात्रटिका”2000 व “मन्याडी फणका”,100″कंधारी आग्याबोंड ” 500, “शब्दबिंब ” 300 आणि बोलकं शल्य, आत्मकथन, संवाद या सारखे लेखन माझ्या लेखनीतून होते.
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारच्या वतीने मन्याड खोर्यातील स्फूर्तिदायक उपक्रमातून भारतीय शूर सैनिकांना 3333 राख्या व 3333 सदिच्छा पत्रे सोबत 15 महाराखी हा उपक्रम देशपातळीवर गाजला.यंदाचे आठवे वर्ष आहे.कोरोना काळात ही देशभक्तीचा जागर सुरुच राहिला.दरवर्षीच शालेय भगिनींनसाठी शालेय रसद म्हणजे वही,पेन,पेन्सिल, रबर,शाॅपनर आदी साहित्य भेट स्वरुपात येतात.सुंदर अक्षर कार्यशाळेस आभार पोहंचतात. यंदा तर सोळा हजार रुपयाचे आरो पाणी फिल्टर भेट स्वरुपात आली आहे,प्रत्यक्ष जम्मु-काश्मिर येथून ऑन डिवटी भारतीय सैनिक यांनी येवून भेट दिली.
श्री शिवाजी हायस्कूल कंधार येथे 2017 या वर्षी बदली झाली.कंधार येथील हायस्कूल मप्ये मातोश्री मुक्ताई धोंडगे यांची आत्मकथनातून व्याक्ती साकारली.भाषण कौशल्यात बंजारा,वडारी भाषेतून मुक्ताई चरित्र भाषेतून व्यक्त करण्यास मार्गदर्शन केले. दिन साजरा,व्हॅलेन्टाईन दिन प्रत्येक वृक्षांना गुलाबपुष्प देवून सत्कार अनोखा दिवस साजरा केला.तर रक्षाबंधन निमित्त शाळेतील वृक्षांना राख्या बांधुन पर्यावरण रक्षाचे साकडे घालत रक्षाबंधन साजरा करण्या आला.हस्तकलेतून मयुर,फुलदाणी,वाघाचे शिल्प, अनेक काष्ठशिल्प,चित्रे,कल्पक अक्षरालय चित्र प्रदर्शन,
आज पर्यंत” समाजभूषण” “दिव्यांग रत्न””मन्याड भुषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले.श्री शिवाजी हायस्कूल कंधार येथे व्हॅलेन्टाईन दिन साजरा करतांना शाळेतील वृक्षराजांना गुलाब पुष्प देवून साजरा करण्यात आला. तसेच रक्षाबंधन सणाच्या निमित्त शाळेतील वृक्षांना राख्या बांधुन पर्यावरण रक्षणाच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळत रक्षा करण्याची विनंती,कंधार येथील स्मशानभूमीत दिवाळी साजरी करतांना 101 दीप लावून करण्याच उपक्रम करण्यात आला.बोलकं शल्य, आत्मकथन, लेख ,सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार या टोपण नावाने लेखन सुरु आहे.सुत्रसंचलन,हस्तकला,चित्रकला,शिल्पकला,भाषण कला,व्यक्तीमत्व विकास, रांगोळी,लेखन कला,विद्यार्थ्यांत सृजनशीलतेत गोडी निर्माण करणे,सुंदर अक्षर,सामाजिक कार्य, कवि,आत्मकथनकार,शल्यकार,अशा विविध कलेत दिव्यांग पणाचा बाऊ न करता सदा उत्साहाने आनंदीत राहात मस्क्यूलर डिस्ट्राॅपी या जिवघेण्या आजारासोबत जीवन जगतांना कधीही अपंग असल्याची खंत कधी जाणवली नाही.
माझ्या वाटचालीस आई कुसुमबाई व वडील गोपाळराव बंधु संजय व बालाजी भगिनी अनिता पत्नी सौ.संगीता मुलगा दृष्टांत व मुलगी दृष्टी जिवलग मित्र अॅड डाॅ.प्रकाश डोम्पले तर उर्जास्त्रोत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे व कलाप्रेरणास्त्रोत भाई गुरुनाथरावजी कुरुडे, सौ.चंद्रप्रभावतीबाई धोंडगे दत्तात्रयजी कुरुडे,अॅड मुक्तेश्वरारावजी धोंडगे,डाॅ.प्रा.भाई पुरुषोत्तमजी धोंडगे सर्व विरोधक आणि समर्थ यांना उर्जा मानतात