कुरुळा : विठठल चिवडे
सर्वसाधारण जमिनीची सुपीकता डोंगराळ भाग आणि त्यात वरुण राजाची अवकृपा तर कधी अतिकृपा .अनेक संकटाच्या मालिका पेलून कुरुळा भागातील बळीराजा अनेक वर्षांपासून संघर्षात आयुष्य व्यतीत करत आहे.पारंपरिक शेती, ना कुठला शेतीपूरक व्यवसाय ना कुठल्या शेतीपूरकयोजनांची माहिती.कोरडवाहू शेतीवरच प्रपंच असल्याने सिंचन शेती हा शब्द परवलीचा ठरतोय .राजकीय दुर्लक्षापोटी कुरुळा भाग कायम वंचित आहे.कंधार आणि मुखेड च्या दरम्यान धड इकडे ना तिकडे आता कुणाला घालावे साकडे अशी परिस्थिती कुरुळा भागातील नागरिकांची होत आहे.
मुखेड -कंधार विधासभा क्षेत्रात कुरुळा सर्कलच्या मतदानाचा टक्का हा नेहमीच निर्णायक राहिला आहे. ज्याच्या पाठीशी कुरुळा भागातील जनता त्याच्या खांद्यावर विजयी पताका असे चित्र मागील अनेक वर्षांपासून आहे.मात्र अनेकवेळा आश्वासने देऊनही कुरुळा भाग उपेक्षितच.
लिंबोटी माणार प्रकल्पामुळे “उशाला ओला सुकाळ तर कंठात कोरडा दुष्काळ” अशी परिस्थिती आहे
.केवळ कागदी घोडे नाचवले जातात परंतु प्रत्यक्षात मात्र कुठल्याच हालचाली नाहीत.केवळ राजकीय फायद्यापोटी प्रतिपंच वर्षाला पाणीप्रश्नाचा मुद्दा अधोरेखित करायचा आणि निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा तळमळ व्यक्त करायची नेमक्या याच राजकारणाला कुरुळा भागातील जनता भुलते आणि अकार्यक्षम नेतृत्वाच्या गळ्यात विजयी माळ पडते.विजयानंतर लोकप्रतिनिधींना अर्पण केलेला फुलांचा ‘हार’म्हणजे आपली ‘हार’आहे याचाच अनुभव कुरुळावासीय घेत आहेत.मुळात
प्रशासकीय कारभार कंधारचा आणि विधानसभेसाठी मुखेड अशी रचनाच कुरुळा सर्कलच्या विकासालाच खीळ बसवत आहे .अशा प्रतिक्रिया आता जनतेतून उमटत आहेत.मुखेड चे विद्यमान आमदार डॉ.तुषार राठोड हे केवळ स्वतःच्या मुखेड तालुक्यासाठी तर कंधारचे विद्यमान आमदार शामसुंदर शिंदे हे स्वतःच्या कंधार तालुक्यासाठी काम करून पाठ थोपटवून घेतात ,यात वंचित,उपेक्षित राहतो तो कुरुळा भाग जो आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.कुरुळा भागात जलप्रकल्पाची आवश्यकता असून आमदार ,खासदार ,पालकमंत्री आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठपुरावा कुरुळा भागासाठी न्यायदायक ठरतोय का?आगामी काळात हाच खरा कळीचा मुद्दा ठरणार आहे.
आमदार,खासदार पालकमंत्री कुठे आहेत?
नुकतेच नांदेड जिल्ह्यातील ४० जलप्रकल्पाला मान्यता मिळाली विद्यमान पालकमंत्री ना.अशोक चव्हाण यांनी यासाठी पुढाकार घेतला परंतु कुरुळा भाग नांदेड जिल्ह्यात नाही का? आमदार शामसुंदर शिंदे यांनी लोहा-कंधारसाठी पाठपुरावा केला आणि अनेक गावात साठवण तलावाच्या माध्यमातून मृतप्राय बळीराजाला संजीवनी मिळाली.परंतु मुखेडच्या आमदारांनी कुरुळ्यासारख्या पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या भागासाठी पाठपुरावा का केला नाही? निवडून आल्यानंतर खा.चिखलीकर यांनी वहाद येथील सभेत लिंबोटी धरणातील पाण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे वचन दिले होते .त्याचे काय झाले? असे अनेक प्रश्न आता शेतकरी उपस्थित करत आहेत.