नांदेड-लातूरला थेट रेल्वेमार्गाने जोडा ! अशोक चव्हाण यांची महत्त्वपूर्ण मागणी


निम्मा खर्च उचलण्याची राज्याची तयारी

नायगाव, दि. १७ डिसेंबर

मराठवाड्यातील प्रमुख शहरे नांदेड व लातूरला रेल्वे मार्गाने थेट जोडण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

नायगाव येथील नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना त्यांनी ही मागणी मांडली. या नवीन व रेल्वे मार्गाची आवश्यकता विषद करताना ते म्हणाले की, लातूर-नांदेड मार्गावर मोठ्या दररोज मोठ्या प्रमाणात दळणवळण आहे. रस्ते मार्गाने हे अंतर सुमारे १४४ किलोमीटर असून, पूर्णा, परभणी, परळी, लातूर रोड मार्गे रेल्वे मार्गाने हे अंतर २१२ किलोमीटर आहे. या मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना हा प्रवास पूर्ण करण्यासाठी साधारणतः सहा तासांचा कालावधी लागतो. रस्ते वाहतुकीच्या तुलनेत रेल्वे वाहतूक स्वस्त व वेगवान असल्याने नांदेड व लातूर दरम्यान नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प मंजूर करण्याची गरज आहे.

या दोन्ही शहरांना सरळ रेषेत जोडणारा रेल्वे मार्ग टाकल्यास त्याचे अंतर साधारणतः १०० किलोमीटर असेल. त्यामुळे ताशी किमान १०० किलोमीटर वेगाने धावणारी रेल्वे जेमतेम सव्वा तासांत नांदेडहून लातूरला पोहचू शकेल. या रेल्वे मार्गामुळे नांदेड ते पुण्यामधील रेल्वे अंतर कमी होऊन प्रवाशांचा तसेच मालवाहतुकीचा वेळ आणि पैसा वाचू शकेल.

केंद्र सरकारने या प्रकल्पाला मान्यता दिल्यास ५० टक्के खर्च उचलण्याची राज्य शासनाची तयारी आहे. या रेल्वे मार्गामुळे नांदेड, लातूर तसेच परभणी जिल्ह्यातील अर्थकारणाला अधिक गती मिळणार असल्याने या प्रकल्पासाठी सर्व राजकीय पक्षांनी व तसेच केंद्र आणि राज्य सरकारने समन्वयाने काम केले पाहिजे, असेही अशोक चव्हाण पुढे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *