मराठी अभिनेते आशुतोष
भाकरे यांची आत्महत्या
युगसाक्षीLive नांदेड
दूरचित्रवाणीवरील ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतील भूमिकेमुळे परिचित झालेल्या मयुरी देशमुख या नवोदित नायिकेचे पती व चित्रपट कलावंत आशुतोष गोविंद भाकरे यांनी बुधवारी दुपारी नांदेडमधील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मुंबईत स्थायिक झालेले हे कलावंत दाम्पत्य गेल्या दोन महिन्यांपासून नांदेडमध्ये आपल्या घरी वास्तव्यास होते.
आशुतोष यांचे महाविद्यालयीन शिक्षण नांदेडमध्येच झाले. त्यानंतर त्यांनी चित्रपट व नाट्यक्षेत्र निवडून काही भूमिका केल्या. भाकर, इचार ठरला पक्का या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. ते एका नाटकाचे निर्मातेही होते. त्यांचे वडील गोविंद भाकरे हे नांदेडमधील नेत्रविकारतज्ज्ञ आहेत. मयुरी ही बांधकाम खात्यातील सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता प्र.य.देशमुख यांची कन्या असून अलीकडच्या काळात अभिनय, लेखन व दिग्दर्शनाच्या कामातून तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आशुतोष यांनी आत्महत्या केल्याची बाब दुपारनंतर निदर्शनास आली. घरामध्ये सर्वजण उपस्थित असताना आशुतोष यांनी एका खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. सायंकाळपर्यंत त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. खा.हेमंत पाटील यांच्यासह देशमुख-भाकरे परिवाराशी संबंधितांनी वरील घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली.