कंधार तालुक्यात कोरोना दैनंदिन सर्वेक्षणासाठी २१२ पथकाची स्थापना
युगसाक्षी कंधार
करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा कोरोना मुक्त कसे करता येईल या करीता जिल्हा प्रशासन विविध उपाय योजना राबवित असून त्याच अनुषंगाने तालुकास्तरावर कोरोनाविषाणू च्या अनुषंगाने दैनंदिन सर्वेक्षण करण्यासाठी २१२ पथक कंधार तालुक्यात नेमण्यात आले असल्याची माहिती तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार कंधार व लोहा तालुक्याचे उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कंधार तालुक्यात गाव निहाय टीम नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतीबंध कायदा १८९७ लागू करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण तालुक्यात घरोघरी जाऊन नागरिकांना ताप ,सर्दी, घशात खावखव, खोकला ,निमोनिया ,बीपी, मधुमेह यासारखे लक्षणे आहेत काय याचा सर्वे दररोज सकाळी ९ ते १२ या वेळेत करण्यात येणार आहे. जर या सर्वे दरम्यान कोरोना सद्रश्य लक्षणे असलेली व्यक्ती आढळून आल्यास त्या व्यक्तीची स्वतंत्र नोंद ठेवण्यात येणार आहे. व तसेच आपल्या अधिनस्त कर्मचारी त्यांची माहिती गुगल लिंक मध्ये दैनंदिनी माहिती भरणार आहेत.सदरील माहिती संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी व रॅपिड ऍक्शन टेस्ट साठी नियुक्ती करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी यांना कळविण्यात येणार आहे. याकरिता प्राध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका ,आशा वर्कर, ग्रामसेवक, तलाठी व इतर अधिकारी , कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.नियुक्ती केलेले कर्मचारी हे गावनिहाय सर्वेक्षण बरोबर करताहेत काय ह्या तपासणीसाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे. या कामाकरिता महसूल प्रशासनाकडून मोबाईल व्हॅन आरोग्य विभागाला उपलब्ध करून देण्यात आले आहे.यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अव्वल.कारकून पि.आर लकमावाड,उत्तम जोशी,मन्मथ थोटे सह आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.