आशुतोष,
तू खूप घाई केलीस!
उदयोन्मुख सिने कलावंत आशुतोष भाकरे याचे आकस्मिक जाणे खूप धक्कादायक आहे.आयुष्यावर उत्तम भाष्य करणारा आशुतोष आपल्या आयुष्याचा शेवट इतक्या विपरीत पध्दतीने करील असे कोणाला स्वप्नातही वाटले नसावे.
आशुतोषची आई अनुराधा आणि वडील डॉ.गोविंदराव भाकरे हे आमचे जवळचे स्नेही.आडनाव भाकरे असले तरी मुळात ते कदमच.आशुतोष हा त्यांचा मुलगा.त्याने सिनेक्षेत्रात करिअर करायचे ठरविले.त्यादृष्टीने उमेदीने कार्यरत झाला.’भाकर’आणि ‘इच्यार ठरला पक्का’ या मराठी सिनेमात त्याने भूमिका केल्या.दरम्यान मराठीतील ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेची नायिका मयुरी देशमुख हिच्याशी २०१६ मध्ये तो विवाहबद्ध झाला.मयुरीचे मुख्य अभियंता( नि.)असलेले वडील पी.वाय. देशमुख हे काही काळ नांदेडला होते.त्यामुळे नातेसंबंध जुळायला सोपे झाले.डॉ.भाकरे हे वारकरी कुटुंबातील असल्यामुळे साहित्य, संगीत,कला अशा विषयांत त्यांना विशेष रुची.समाजसेवेची मनस्वी आवड.शेतकरी साहित्यिक नारायण शिंदे यांनी यशवंतराव चव्हाण विचार मंचच्या माध्यमातून घेतलेल्या अनेक शिबिरात आमच्या समवेत त्यांनी हजेरी लावली.त्यांच्याकडून आशुतोषच्या अॅक्टिव्हिटिज कळायच्या.
चार-पाच वर्षांपूर्वी आशुतोष आमच्या कडे आला होता.सोबत प्रा.नारायण शिंदे होते.आशुतोषच्या डोक्यात रस्त्यावरचा कचरा वेचणा-या मुलांची थीम होती.त्या कथाबीजावर चित्रपट काढायचे त्याच्या डोक्यात होते.त्याची पटकथा आम्ही लिहावी असा त्याचा आग्रह होता.त्यासाठी शिंदे यांच्या कडे आम्ही पाच-दहा वेळी एकत्र बसून चर्चा केली होती.’ब्लॅंकेट’ हे नाव सुध्दा त्याने मुक्रर केले होते.त्यानंतर खूप दिवस गेले.हा विषय तसाच राहिला.मध्यंतरी या विषयावर सिनेमा सुध्दा आला.
आशुतोषचे लग्न मयुरी देशमुख यांच्याशी झाल्यानंतर आशुतोष नाट्यसृष्टीकडे वळला.मयुरी ही केवळ अभिनेत्रीच नसून उत्तम लेखिका सुध्दा आहे.तिने लिहिलेले ‘डिअर आजो’ हे आजोबा आणि नातीमधले भावबंध उलगडून दाखविणारे नाटक खूप चर्चित ठरले.या नाटकाचा प्रयोग नांदेडच्या कुसुम नाट्यगृहात होता.त्याचे आम्हाला निमंत्रण द्यायला आशुतोष विसरला नाही.आम्ही नाटक पाहायला गेलो तेव्हा वडीलधाऱ्या माणसाला वाकून नमस्कार करायचा असतो हे त्याला सांगावे लागले नाही.मयुरीच्या नाटकाचे नेपथ्य आणि बाकीच्या तांत्रिक बाबींकडे आशुतोष लक्ष देत होता.त्याची सारखी धावपळ चालली होती.
डॉ.भाकरे कुटुंबीय,स्नेहीजन आणि रसिकांनी नाट्यप्रयोग पाहण्यासाठी गर्दी केली होती.’डिअर आजो’ या नाटकाचा प्रयोग उत्तम झाला.आम्ही आशुतोष आणि मुलीला शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर आशुतोष भेटला नाही.
तो सध्या मुंबईत आहे आणि ‘जून- जुलै’ या नाटकाची निर्मिती करतो आहे अशी माहिती मध्यंतरी मिळाली एवढेच.
.. आणि काल अचानक आशुतोषच्या मृत्यूची विपरीत बातमी येऊन धडकली.एका उमद्या, हसतमुख, विनयशील आशुतोषने आपल्या आयुष्याला इतक्या घाईघाईने पूर्णविराम द्यावा,ही गोष्ट मान्य करायला मनाची तयारी नाही.अभावग्रस्त मुलांचं जगणं किती कष्टप्रद असतं आणि त्याला ते किती चिवटपणे सामोरं जातात याची हळूवारपणे उकल करून सांगणारा आशुतोष जगण्याला पाठमोरा होतो,यावर विश्वास बसत नाही.
भाकरे कुटुंबियांवर कोसळलेल्या या भयंकर दु:खात
आम्ही सहभागी आहोत.
#जगदिश कदम ,नांदेड