वॉचमन ते फौजदार थक्क करणारा प्रवास मित्रांच्या मदतीने केले शिक्षण पूर्ण.माळाकोळी येथील अल्पभूधारक शेतकरी दांपत्याचा मुलगा गोपीनाथ किशन केंद्रे यांची यशोगाथा

मित्रांची साथ.. वडिलांचा डोक्यावर हात.. केली परिस्थितीवर मात….

माळाकोळी ; एकनाथ तिडके

  घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती..... आई वडील अल्पभूधारक शेतकरी तथा मजूर.....कोरडवाहू ,दुष्काळी पट्ट्यातील शेती ... अपेक्षीत उत्पन्न कधीच मिळाले नाही,यामुळे इतरांच्या शेतात मजुरी व सालगडी म्हणून काम करत आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी धडपडणाऱ्या अशिक्षित आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करून त्यांच्या कष्टाचे "चीज" करत  माळाकोळी येथील किशन भुजंगराव केंद्रे व शेषाबाई किशन केंद्रे या अल्पभूधारक शेतकरी दांपत्याचा मुलगा गोपीनाथ किशन केंद्रे याने  एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक बनला आहे . प्रसंगी शेतात काम करत तसेच वॉचमनची नोकरी करत गोपीनाथ केंद्रे याने मिळवलेले यश निश्चितच  इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे.



लोकांच्या शेतात सालगडी म्हणून काम करणारे आई वडील आपल्या शिक्षणासाठी धडपड करत असल्याचे लहानपणापासूनच गोपीनाथ ने पाहिले होते .....प्रसंगी वडिलांना शेतात मदत करत त्याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावात पूर्ण केले त्यानंतर मात्र आपण जीवनभर काबाडकष्ट करून शिक्षण देणाऱ्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज व्हावे म्हणून गोपीनाथ केंद्रे याने एम पी एस सी करण्याची भूमिका घेतली व पुणे गाठले .....या ठिकाणी कमवा शिका सारख्या योजनेत काम करत त्याने आपले शिक्षण पूर्ण केले, एमपीएससी मार्फत  अत्यल्प जागा, त्यातील स्पर्धा व परिक्षांना होणारा विलंब यामुळे घराकडून आई-वडील आपल्याला पैसे पुरवू शकत नाहीत याची जाणीव असलेल्या गोपीनाथ ने  मुंबई येथे बेस्ट मध्ये वॉचमन म्हणून नोकरी मिळवली, आणि ही नोकरी करत त्याने एमपीएससी परीक्षेचा अभ्यास पण सुरू ठेवला... 




परंतु नोकरी आणि अभ्यास एकत्रित शक्य  होत नसल्यामुळे त्याने बिन पगारी रजा घेण्याचे ठरवले,  आणि पुन्हा पुणे औरंगाबाद या ठिकाणी येऊन पोलीस उपनिरीक्षक परीक्षेची तयारी केली याकाळात त्याला त्याच्या मित्रांनी पैशाची मदत मोठ्या प्रमाणावर केली. शेवटी नुकत्याच लागलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या निकालात गोपीनाथ केंद्रे यांनी 32 वी रँक व 255 गुण मिळवत पोलीस उपनिरीक्षक बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.

मित्रांची साथ…

सालगडी म्हणून काम केले....शेतात मजुरी केली.... अनेक वेळा उपाशी राहून कष्ट केले ... मुलाने शिकावं असं वाटतं राहायचं ..शेवटी मुलाने अधिकारी बनत आमचं स्वप्न पूर्ण केले आहे. याचा आनंद वाटतो.

    किशन केंद्रे वडील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *