फुलवळ (धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील ढाकू नाईक तांडा येथील शेतकरी गणेश प्रल्हाद राठोड यांनी चार महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती , त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात म्हणून नाम फाउंडेशन च्या वतीने २५ हजार रुपये चा धनादेश केशव घोणसे पाटील यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी शिला गणेश राठोड यांना नुकताच फुलवळ येथे देण्यात आला.
कुटुंबाचा आधारवड गेल्यानंतर त्या कुटुंबियांवर येणारी वाईट वेळ ही कल्पनेच्या बाहेर असते आणि त्यांना कोणत्या ना कोणत्या पद्धतीने मदत करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य असते. मग ती आर्थिक असो का अन्य कोणत्या स्वरूपात असो , पण ती केलीच पाहिजे असा नाम फाउंडेशन चा उपक्रम म्हणजे सर्वांनी आदर्श व अनुकरण घेण्यासारखा नक्कीच आहे.
चार महिन्यांपूर्वी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना हा धनादेश देताना केशव घोणसे पाटील म्हणाले की अशी वाईट वेळ कोणत्याही कुटुंबावर येऊच नये पण दुर्दैवाने तशी वेळ आलीच तर त्या कुटुंबाला सावरण्यासाठी आपल्यासारख्या सर्वच स्तरातील लोकांनी जमेल तशी मदत करत त्यांना त्या परिस्थितीतुन सावरण्यासाठी आधार दिला पाहिजे. याचीच जाणीव ठेवून अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी नाम फाउंडेशन च्या माध्यमातून आजपर्यंत अनेक अश्या कुटुंबांना मदत केली असून नुकतेच नांदेड जिल्ह्यातील जवळपास १२५ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ हजार रुपये चा धनादेश देऊन मदतीचा हात दिला आहे. त्यातीलच हे ढाकूनाईक तांडा येथील हे कुटुंब असल्याचे त्यांनी सांगितले.
नुकतेच फुलवळ येथे धनादेश देतेवेळी त्यांचा मुलगा कृष्णा राठोड , भाजप चे कंधार तालुका अध्यक्ष भगवान राठोड , गुलाब राठोड , विनोद राठोड , फुलवळ पत्रकार संघाचे अध्यक्ष परमेश्वर डांगे , मधुकर डांगे , शादुल शेख , आनंदा पवार , धोंडीबा बोरगावे आदी सर्वजण उपस्थित होते.