ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद एकताटे यांना वकिली क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल वर्ष २०२० चा नांदेड भूषण पुरस्कार

नांदेड ; प्रतिनिधी

सामाजिक चळवळीत काम करत असताना गुन्हे दाखल झालेल्या शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचे न्यायालयात विनामोबदला
खटले चालवून त्यांना निर्दोष सोडविण्यात सिंहाचा वाटा उचलणारे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद एकताटे यांना वकिली क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल वर्ष २०२० चा नांदेड भूषण पुरस्कार १४ व १५ मे रोजी होणाऱ्या नरेंद्र – देवेंद्र महोत्सवात देण्यात येणार असल्याची घोषणा स्वागताध्यक्ष डॉ. सचिन उमरेकर व संयोजक धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी केली आहे
.

पं. दिनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने रोख रु. ५०००, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व महावस्त्र देऊन नांदेड भूषण पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित
करण्यात येणार आहे.

ॲड.एकताटे हे बत्तीस वर्षापासून वकिली व्यवसाय करत असून त्यांनी दोन वेळा नांदेड अभिवक्ता संघात अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली आहे. या शिवाय सतत तीन वेळा अभिवक्ताचे सचिव म्हणून निवडून आले होते. यादरम्यान राष्ट्रीय कायदेविषयक परिसंवादाचे नांदेड येथे दोन वेळेस आयोजन करण्यात आले. २०१६ या वर्षी जिल्हा न्यायाधीश सुधीर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या लोक अदालतीत महाराष्ट्रात उच्चांकी खटल्यांचा निवाडा झाल्यामुळे ॲड.एकताटे यांची अध्यक्षपदाची कारकीर्द गाजली. महाराष्ट्र शासनातर्फे मतीमंद व मूकबधिर विद्यालयात झालेल्या नियुक्ती दरम्यान शासनाकडे अनेक प्रश्नांचा पाठपुरावा करून समाजातील उपेक्षित वर्गाला न्याय मिळवून दिला. नांदेड न्यायालयाला पुरेशी जागा मिळावी यासाठी २०१६ साली तत्कालीन मुख्यमंत्र्याकडे आग्रहाची मागणी करून कवठा भागात सोळा एकर जागा उपलब्ध करून घेतली. अनेक मार्गदर्शक शिबिरांचे आयोजन करून वकिलांना न्यायाधीश पदावर बसवण्याचे मोलाचे कार्य केले. ॲड. एकताटे यांच्या कार्यालयात सहाय्यक वकील म्हणून काम करणाऱ्यांपैकी सहाजण न्यायाधीश, चार जण सरकारी अभियोक्ता व तीन कॉर्पोरेट क्षेत्रात कार्य करीत आहेत. नुकतीच पदवी घेतलेल्या तरुणांना सहाय्यक वकील म्हणून आपल्या कार्यालयात संधी दिल्यामुळेव किली व्यवसायाच्या प्रदीर्घ कार्यकाळात अनेक वकील स्वतःच्या पायावर उभे राहून व्यवसाय करत आहेत.

महाविद्यालयीन जीवनात असताना एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा मध्ये सलग तीन वर्ष मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. विधी महाविद्यालयाच्या क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषवत असताना तीनदा मराठवाडा विभागात जेतेपद मिळवून दिले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशा नुसार नांदेड जिल्ह्यात शिवसेनेची पहिली शाखा उघडली. शिवसेना उपजिल्हाप्रमुख तसेच शिवसेनेचे कायदेशीर सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. ब्राह्मण महासंघातर्फे समाज भूषण या पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. वकिली क्षेत्रात कार्य करत असताना हिंदुत्वाची कास धरून सामाजिक बांधिलकी जपल्यामुळे ॲड. एकताटे यांची नांदेड भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

काही अपरिहार्य कारणामुळे चार वर्षापासून पुरस्काराचे वितरण करण्यात आले नव्हते. आता कोरोनाचे निर्बंध उठल्यामुळे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व भाजप जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्र- देवेंद्र महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. देशातील नामवंत कवींना व हास्य कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी दोन दिवस उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *