कंधारच्या श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीची भाग्यश्री जाधवला एक लाखांची आर्थिक मदत ;भाई धोंडगे यांच्या शतकोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थिनीचा केला बहुमान


कंधार/ प्रतिनिधी


ज्येष्ठ स्वातंत्रसेनानी डॉ. केशवराव धोंडगे शतकोत्सवी वर्षानिमित्त आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू तथा राष्ट्रीय दुहेरी सुवर्ण पदक विजेती भाग्यश्री माधवराव जाधव हिला जागतिक पातळीवरील पॅरा क्रीडा स्पधैच्या पूर्वतयारीसाठी संस्थेच्या वतीने मंगळवार, दि. ११ मे रोजी एक लक्ष रुपयाचा धनादेश देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, महाराष्ट्र भूषण भाई डॉ. केशवराव धोंडगे यांच्या शतकोत्सवी वर्षानिमित्त श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी, कंधारच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून श्री.शिवाजी विधी महाविद्यालयातील कंधार येथील प्रथम वर्गातील विद्यार्थिनी तथा आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू तथा राष्ट्रीय स्पधेतील सुवर्णपदक विजेती कु. भाग्यश्री माधवराव जाधव हिला जागतिक पातळीवरील क्रीडा स्पधैच्या पूर्वतयारीसाठी संस्थेमार्फत एक लक्ष रुपयाचा निधी व पूर्ण स्पोर्टस किट (बॅग शूज ट्रॅक सूट इ.) देण्यात आली.

संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी स्वतः भाग्यश्री च्या घरी जाऊन संस्थेच्या वतीने तिचा यथोचित सन्मान केला. पुढील क्रीडा प्रवासासाठी शुभेच्छा देऊन तुझ्या पाठीशी संस्था भक्कमपणे उभी आहे. तू यशोशिखर कडे वाटचाल करत राहा,अशी भावना व्यक्त केली. यावेळी संस्थेचे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्रसेनानी भाई डॉ. केशवराव धोंडगे , सचिव माजी आमदार गुरुनाथ कुरुडे यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद यांचे आशीर्वाद पाठीशी असतीलच, असे त्यांनी सांगीतले.


श्री. शिवाजी विधी महाविद्यालयात संस्थेच्यावतीने भाग्यश्री जाधव हिचा मागील महिन्यात सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना भाई डॉ.केशवराव धोंडगे यांनी तिचा उल्लेख महाराष्ट्राची हिरकणी असा केला होता. तसेच तिच्या पुढील क्रीडा प्रवासासाठी संस्था सर्वोतोपरी सहकार्य करीन, अशी घोषणा केली होती. त्यानंतर लगोलगच संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी पुढाकार घेऊन ही मदत केल्यामुळे भाग्यश्रीच्या पंखाला बळ मिळाले आहे.


यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.एल. धर्मापुरीकर, डॉ. राहुल वाघमारे , भाग्यश्रीची आई सौ. पुष्पाबाई जाधव, भाऊ गणेश जाधव, रमेश जाधव, भाग्यश्रीचे मार्गदर्शक तथा अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव प्रकाश कांबळे यांच्यासह सर्व कुटुंबीय उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *