पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मे रोजी साधणार आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने लाभधारकांशी राष्ट्रीय संवाद

▪️31 मे रोजी राष्ट्रीय संवादाचे आयोजन
▪️नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे पूर्व तयारी

नांदेड, दि. 24:- विविध विकास योजनांच्या माध्यमातून शासनाने सर्वसामान्यांच्या विकासासाठी कटिबद्धता ठेऊन विविध योजना राबविल्या आहेत. या योजनेत प्रामुख्याने प्रधानमंत्री आवास योजना, किसान सन्मान निधी, उज्जवला योजना, पोषण अभियान, मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन, आणि अमृत, स्वनिधी योजना, वन नेशन वन रेशन कार्ड, गरीब कल्याण अन्न योजना, जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत, मुद्रा योजनांचा समावेश आहे. दुर्गम भागातील लाभार्थ्यांपासून महानगरापर्यंतच्या लाभार्थ्यांपर्यंत या योजनांचा लाभ देण्यात आला आहे. आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या योजनांच्या लाभार्थ्यांशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 31 मे रोजी प्रत्येक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. या संवाद कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आढावा बैठक घेऊन सर्व संबंधित यंत्रणेला निर्देश दिले.

डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या या आढावा बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, भोकरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, देगलूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

या आढावा बैठकीत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हाती घेतलेल्या अमृत सरवर योजना व इतर योजनांचाही आढावा घेण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना विविध लोकोपयोगी व पर्यावरण संतुलनाशी निगडीत असलेल्या योजनांमध्ये लोकांचाही सहभाग अपेक्षित आहे. हा लोकसहभाग घेण्यासमवेत सामाजिक बांधिलकीतून जिल्ह्यातील विविध उद्योगांची यात सहकार्य घेता येईल. शासकीय अधिकाऱ्यांनी केवळ याला नोकरीचा भाग न समजता आपलीही व्यक्तीगत बांधिलकी या नात्याने पुढे सरसावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *