पर्यवेक्षिय अधिका-यांनी परिणामकारक शाळा भेटीतून शिक्षण प्रक्रिया गतिमान करावी. – शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर


लोहा

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनच्या परिस्थितीत पर्यवेक्षिय अधिकारी/ कर्मचारी यांनी सातत्याने परिणामकारक  शाळा भेटींच्या माध्यमातून शिक्षण प्रक्रिया गतिमान करावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री प्रशांत दिग्रसकर यानी केले.


जिल्हा परिषद नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शरद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी श्री प्रशांत दिग्रसकर यांच्या संकल्पनेतून लाॅकडाऊनच्या परिस्थितीत  जिल्हा  परिषदेच्या शाळांतील शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय भरारी पथकाने काल लोहा आणि कंधार तालुक्यातील काही निवडक शाळांना भेटी दिल्या.

शाळा भेटीत शाळास्तरावर सद्यस्थितीत सुरू असलेल्या विविध शैक्षणिक  उपक्रमांचा आढावा घेऊन मौलिक सूचना केल्या.


दुपार सत्रात जि प हायस्कूल, लोहा येथे लोहा आणि कंधार तालुक्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुखांची आढावा बैठक श्री प्रशांत दिग्रसकर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि श्री बी आर कुंडगीर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.


आढावा बैठकीच्या प्रारंभी मिशन शिष्यवृत्ती उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उस्माननगर बिटचे उपक्रमशील शिक्षण विस्तार अधिकारी श्री वसंत मेटकर यांचा सत्कार करण्यात आला. जि प हायस्कूल,

लोहा येथे लोक सहभागातून शाळेची संरक्षण भिंत, स्वच्छतागृह दुरुस्ती, प्रवेशद्वार, रंगरंगोटी, हॅन्डवाॅश स्टेशन निर्मिती, वृक्षारोपण, परसबाग इत्यादी उपक्रम राबविल्याबद्दल मुख्याध्यापिका सौ मंजुळा जाधव, सहशिक्षक श्री राजीव तिडके, शे फारूक सर, लिपिक दत्तात्रय अनंतवार तसेच साईबाबा माध्यमिक विद्यालय, मारतळाचे मुख्याध्यापक श्री एकनाथ मोरे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले.


शिक्षणाधिकारी श्री बी आर कुंडगीर आणि प्रशांत दिग्रसकर यांनी शाळा बंद पण शिक्षण सुरू उपक्रमांतर्गत  शासन परिपत्रकानुसार शाळा स्तरावर शैक्षणिक दिनदर्शिका, दीक्षा अॅप, व्हाटस अॅप, ग्रुप, टिली मिली, फोन काॅल, प्रत्यक्ष विद्यार्थी, पालक संवाद, शिक्षक मित्र उपक्रम या माध्यमांचा शिक्षकांनी नियमित वापर करावा. 

पर्यवेक्षिय अधिकारी/ कर्मचारी यांनी कार्यक्षेत्रात शाळा भेटी वाढवून प्रभावी सनियंत्रण व पर्यवेक्षण करावे.  या प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण प्रक्रिया गतिमान राहील, यासाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के यांनी तर सूत्र संचलन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री काशिनाथ शिरसीकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, गट साधन केंद्र, निवासी वसतिगृह, लोहा तसेच जि प हायस्कूल, लोहा येथील कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *