गणेश चतुर्थीला राज्यात गणेशोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. संबंध जगभरातील लोकांचे जगणेच कोरोनामुळे अस्तव्यस्त झाले असले, तरी देशभरात अनेकांनी आपल्या कुवतीप्रमाणे बाप्पाचे स्वागत केले आहे. त्याला अनेक कलाकारही अपवाद नसतात. सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशी, अवधूत गुप्ते, सुशांत शेलार, संदीप पाठक वगैरे वगैरे अनेकांच्या घरी (भाऊ कदम वगळता) गणपती बाप्पाचे आगमन झाले. कोरोना संकटामुळे अनेकांना डेकोरेशन करण्यासाठी फुले, साहित्य, तोरणे मिळालेली नाहीत. यामुळे काहींनी वेगवेगळ्या कल्पना लढवून त्यांच्या घरी बाप्पाचे स्वागत केले. आपल्याला जमेल तशी आरास करून प्रत्येकाने बाप्पाची मनोभावे पूजा केली. त्याचबरोबर अनेक चित्रपटांचे लेखन करणारे आणि मुळशी पॅटर्नसारखा सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक-निर्माते प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले परंतु ‘पुस्तक बाप्पा’ या संकल्पनेवर आधारित त्यांनी गणपतीची केलेली आरास लोकांना रुचली नाही. त्यामुळे एक नवा वाद निर्माण झाला.
आरास करताना गणपतीच्या दोन्ही बाजूंना आपल्या घरी असलेली पुस्तकांची प्रवीण यांनी सजावट केली होती. तर काही पुस्तके मधोमध रचून पुस्तकांवर बाप्पा ठेवला होता. त्यात त्यांनी सर्वात वर भारतीय संविधान ठेवून त्यावर गणेशाची स्थापना केली. मुळशी पॅटर्न फेम प्रवीण तरडे यांनी घरच्या गणपतीची पुस्तकांचे मनोरे रचत प्रतिष्ठापना केली. इतक्यावरच ते न थांबता ते सोशल मिडियावरही सामायिक केले. त्यांची कल्पना चांगली होती मात्र, गणपतीच्या मूर्तीच्या पाटाखाली म्हणजे पाट ठेवायच्याऐवजी संविधानाची प्रत ठेवल्याने वादाला तोंड फुटले. या पुस्तकांच्या मनोऱ्यांवर विठ्ठल, संत तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज, श्रीकृष्णाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. तरडेंच्या मनामध्ये मध्यभागी संविधान ठेवून मान देण्याची कल्पना असण्याची शक्यता आहे. मात्र, ती नेटकऱ्यांना काही आवडलेली नाही. गणपती ही बुद्धीची देवता असल्याचे मानत असल्यामुळे त्यांनी अशी रचना केली होती. पण त्यातून अनेकांच्या भावना दुखावल्या. भारतीय राज्यघटना ही सर्वात श्रेष्ठ असते, त्यावर गणपतीला ठेवून प्रवीण यांनी अनेक भारतीयांच्या भावना दुखावल्याचा निरोप प्रवीण यांच्यापर्यंत गेला. काही संघटनांचे फोनही त्यांना आले. या प्रकाराबाबत त्यांनी नाराजी नोंदवल्यानंतर प्रवीण यांनी या सगळ्या प्रकाराबद्दल माफी मागत हा फोटो काढून टाकला आणि सजावटीतही बदल केला. एक नवा व्हिडिओ शेअर करून या प्रकारामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांची माफी मागितली. तशा आशयाचा व्हिडिओ प्रवीण तरडे यांनी अनेक प्रसार माध्यमांना, त्याचबरोबर सोशल मीडियावर शेअर केला. तोपर्यंत आधीच्या पोस्टचे स्क्रीनशाॅट व्हायरल झाले होते.
माफीचा एक व्हिडिओ प्रवीण तरडेंनी फेसबुकवर पोस्ट केलाय. त्यात ते म्हणतात, “माझ्या घरी पुस्तक गणपती अशी कॉन्सेप्ट होती. आणि बुद्धीची देवता आणि बुद्धीचं सगळ्यात मोठं प्रतीक अशी माझी भावना होती. परंतु ती किती मोठी चूक आहे, हे माझ्या लक्षात अनेक लोकांनी आणून दिलं. RPI, भीम आर्मी, लातूरची संघटना, पुण्यातल्या अनेक संघटना…मी सर्व माझ्या दलित बांधवांची, ज्यांच्या ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या, त्या सगळ्यांची जाहीर माफी मागतो. माझी चूक मान्य करतो. आणि मी हा केलेला बदल तुमच्या सगळ्यांना दाखवतो.”
कोण आहेत हे प्रवीण तरडे?
अभिनेता, दिग्दर्शक, पटकथाकार अशी मराठी चित्रपट सृष्टीत प्रवीण तरडेंची ओळख आहे. 2018 मध्ये आलेला ‘मुळशी पॅटर्न’ हा त्यांचा गाजलेला चित्रपट होता. या सिनेमाचं लेखन – दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. या सिनेमातली नन्या भाईची भूमिकाही त्यांनी केली होती. देऊळ बंद या सिनेमाचं दिग्दर्शनही तरडेंनी केलं होतं. प्रवीण तरडेंनी कन्यादान, कुंकू, कुटुंब, तुझं माझं जमेना, पिंजरा या मालिकांचं लेखन केलं आहे. याव्यतिरिक्त त्यांनी पितृऋण, रेगे या चित्रपटांची पटकथा आणि संवाद लिहिले होते. त्यांनी कोकणस्थ, देऊळ बंद या चित्रपटाचं सहाय्यक दिग्दर्शन केलं होतं. प्रवीण तरडेंचा आगामी सिनेमा ‘सरसेनापती हंबीरराव’ हा हंबीरराव मोहीतेंच्या आयुष्यावर आधारित आहे.
मात्र, संविधानावर गणपती या प्रकरणामुळे त्यांच्यावर सगळीकडून टीका झाली म्हणजेच सोशल मीडियावर कमालीचे ट्रोल झाले आहेत. एका फेसबुक युजरने तरडेंना केसांची वाढ झाल्याने मेंदूची वाढ खुंटली असेल, अशी खोचक टीका केली आहे. तसेच गणपती बाप्पा प्रवीण तरडेंना सद्बुद्धी दे असे आवाहन केले आहे. देशाच्या संविधानाचा अपमान केल्यावरून तरडे ट्रोल झाले आहेत. तरडेंनी मुद्दामहून असा खोडसाळपणा केला असल्याचे आरोप ठेवून अनेक ठिकाणांहून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तरडेंनी टीका होत असलेली पाहून नंतर ती पुस्तक बाप्पाच्या फोटोची पोस्टच डिलीट केली. मात्र, तोपर्यंत या पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते.संविधानाच्या प्रतीचा अशा प्रकारे वापर केल्याबद्दल प्रवीण तरडेंवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडनेही केली होती.
भारताची राज्यघटना देशासाठी सर्वोच्च असून संविधान धर्मनिरपेक्ष आहे. मात्र दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी भारतीय संविधानावर ‘गणपती’ ची स्थापना केली. हे निषेधार्ह आहे. राज्यघटनेप्रमाणे संविधान व भारत धर्मनिरपेक्ष आहे. धार्मिक कार्यक्रमात राज्यघटना वापरता येत नाही. सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय ग्रंथ अशी मान्यता मिळाल्यानंतरही संविधानाला गणपती बसावयाचा पाट समजून गणपतीला त्यावर विराजमान करण्यासाठी तरडे यांनी भारतीय संविधानाचा वापर केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या असून यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवीण तरडे यांच्यावर सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड सह इतर संघटनांनीही केली.
संविधान हा काही धर्मग्रंथ नाही. संविधानाचा अर्थ कदाचित प्रवीण तरडे यांना माहित नसावा. कदाचित त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रदीर्घ संस्कार असल्यामुळे कदाचित त्यांनी अशा पद्धतीने बदनामी केली असेल. दिल्लीमध्ये भारतीय संविधान जाळणाऱ्या आणि गणपतीखाली ‘पाट’ समजून भारतीय राज्यघटना ठेवणाऱ्या दोघांमध्ये कुठलाही फरक नाही. ही देशद्रोही कृती आहेत. म्हणून लोकशाहीत कायद्याद्वारे प्रवीण तरडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशीही काही जणांची भावना होती. काहींनी तर तरडेंच्या नावे सोशल मीडियावर शिव्यांची लाखोली वाहिली. अनेक गलिच्छ उपमा त्यांना दिल्या गेल्या. त्यांना संविधानद्रोही, देशद्रोही म्हटले. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशीही मागणी काही संघटनांनी केली. तरडेंच्या घरावर मोर्चा काढला असता ते कुटुंबासह पळून गेले अशाही बातम्या आल्या. फोन करुन निषेध नोंदवला. त्यांच्याशी बातचीत केलेल्या ध्वनीमुद्रणांचेही प्रसारण झाले. तरडेंनी जाणीवपूर्वक खोडसाळपणा करुन पुन्हा मुद्दाम जाहीर माफी मागितली असेही म्हटले गेले. संविधान हे सर्वधर्म समभाव मानतं. संविधान कोणत्याही एका धर्माला प्राधान्य देत नाही. प्रवीण तरडे यांनी जाणुनबुजून यांनी भारताच्या संविधानाची प्रत ठेवून गणपती बसवला. या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. फक्त माफी मागून चालणार नाही, महाराष्ट्र सरकारला आम्ही विनंती करतो की त्यांच्यावर कडक कारवाई करावी. अन्यथा आमच्या पक्षातर्फे प्रवीण तरडे यांना आम्ही महाराष्ट्रात फिरु देणार नाही’, असं रिपाइंचे सचिन खरात एका व्हिडिओमध्ये म्हणाले.
मुळात भारतीय संविधानाचा कोणताही अपमान झाला नसल्याचं तरडे समर्थकांनी म्हटलंय. कारण त्यांचा हेतू तसा नव्हता. तरीही लोकांच्या भावनांचा आदर करीत त्यांनी माफी मागितली. संविधान हे सर्वांचेच आहे. सर्व धर्माचे आहे. भारतातील सर्वच धर्माशी संबंधित आहे. संविधानावर गणपती म्हणजे संविधान मूषक आहे किंवा गणपती संविधान चालवतो असा त्याचा अर्थ नाही. पण या प्रकाराची दर्शनी किंमत तीच दिसते. संविधानानेच या देशातील प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिलेले आहे. आपापल्या धर्मातील देव देवतांच्या पूजा, अर्चना, प्रार्थना करण्याचे, भक्तीचा मार्ग, संप्रदाय, धार्मिक संस्कृती जपण्याचे स्वातंत्र्य संविधानाने दिलेले आहे. त्यामुळे ते त्या व्यक्तीशी त्याच्या धर्माशी संबंधित आहे. म्हणून संविधान हे धर्मनिरपेक्ष असले तरी त्यावरील गणपती म्हणजेच धर्म हा संविधानाच्या उरावर बसला आहे असा त्याचा अर्थ घेणे कितपत योग्य आहे याचा विचार बुद्धीवादी लोकांनी करावयास काही हरकत नसावी. आज असे घडले म्हणून उद्या इतर धर्मीय लोकही संविधानाला त्यांच्या धर्माच्या सर्वोच्च प्रतिकापेक्षा सर्वश्रेष्ठ समजतील. तसेच वागतील. नव्हे अगदी तसेच आहे. परंतु तसेच असतांना एव्हढे सगळे करुन प्रवीण तरडे यांनी त्याचा फोटो काढून समाज माध्यमांवर सामायिक केला. इथेच ते चुकले. परंतु माफी मागतांना दलित बांधवांची, ज्यांच्या भावना दुखावल्या त्यांची असा शब्दप्रयोग त्यांनी केला. मग संविधान हे देशाचेच असतांना ते सर्वांनाच का वाईट वाटले नाही? सर्वांनीच त्याचा का निषेध केला नाही? ते फक्त दलितांचेच आहे का? बाबासाहेब आंबेडकर शिल्पकार म्हणून ते केवळ बौद्धांचेच आहे का? ज्यांच्या भावना दुखावल्या त्यांचेच ते आहे का? भारतीय संविधानाचा अशा पद्धतीने संदर्भ जिथे येतो तिथे दोन भिन्न सांस्कृतिक प्रवर्ग एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतात. त्यांच्यात आधीच असलेले वैमनस्य उफाळून येते. समाजात वैचारिक प्रदुषणास सुरुवात होते.
संविधानापेक्षा धर्मच मोठा आहे हे भोवताली घडणाऱ्या अनेक घटनांपासून लक्षात येते. संविधानाचा अपमान झाल्याबरोबर संविधानाचे एकमेव शिल्पकार असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटतात. संविधानापेक्षा गणपती श्रेष्ठ असे चित्र निर्माण होणे म्हणजे हिंदू धर्माशी असलेली नाळ साठ पासष्ट वर्षांपूर्वी कापली गेली असल्याने ते साहजिकच सहन न होणारे आहे. परंतु बौद्ध लोकांतही हिंदूचे सण उत्सव आजही साजरे होतात. अनेक बौद्ध लोक गणपतीची प्रतिष्ठापनाही करतात. उंद्रावळं हा अन्नपदार्थ तयार करुन गणेश चतुर्थी साजरी करतात. गणेशोत्सवात सहभागी होतात. एवढेच नव्हे तर काही गणेश मंडळांचेही ते अध्यक्ष असतात. होळी-दसरा-दिवाळी सगळ्यातच उत्सवाचे साजरेपण असते. अनेक बौद्धांच्या घरात देवीदेवतांच्या प्रतिमा आजही आहेत. नुकतीच घडलेली घटना औरंगाबादेत सिध्दार्थ महाविद्यालयाच्या प्राचार्याच्या घरी गणपती बसवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधाना नुसार प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार आहे, उत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे. मात्र बुद्धिस्ट असलेले सदरील गृहस्थ हे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या सिद्धार्थ कॉलेज मधील आनंद भवन येथे कार्यरत असलेले प्राध्यापक उ. म. म्हस्के आहेत व ते आपल्या घरात गणपती बसवतात.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या सिद्धार्थ कॉलेज मधील आनंद भवन येथे कार्यरत असलेले प्राध्यापक उ. म. म्हस्के हे आपल्या राहत्या घरी गणपती उत्सव साजरा करतात अशी माहिती मुंबईतील काही कार्यकर्त्यांना आज दिनांक २२ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी मिळाली तेव्हा मुंबईतील काही सामाजिक कार्यकर्ते ही बातमी खरी की खोटी ह्याची शहानिशा करण्यासाठी त्यांच्या अंधेरी येथील घरी गेले. व उ.म. म्हस्के सर यांची कार्यकर्त्यांनी भेट घेतली व सदर प्रकरणा बद्दल चर्चा केली असता त्यांची भाषा व त्याची काही वक्तव्य एकूण खरच हे शिक्षक आहेत का हा प्रश्न पडला. त्यांनी कार्यकर्त्यांनाच उलट प्रश्न विचारले, १) बाबासाहेब ह्यानी 22 प्रतिज्ञा दिल्या तर त्यांची सही आहे का ? २)बौद्धांनी गणपती बसवू नये असे बाबासाहेबांनी कधी सांगितले? ३) मी गणपती बसवला तर तुम्हाला काय हरकत आहे ? तुम्ही विचारनारे कोण ? हे प्रश्न ऐकून मुंबईतील कार्यकर्ते त्यांच्याशी वार्तालाप करत असताना ते भयंकर संतापले व त्यांनी महाराष्ट्रातील कोणालाही ह्या विषयावर चर्चा करायची असल्यास त्यांची वेळ घेऊन कधीही सिद्धार्थ कॉलेजमध्ये आनंद भवन येथे चर्चेस येण्याचे निमंत्रण दिले आहे. आता बोला! नांदेडमध्ये सात आठ वर्षापूर्वी एका बौद्ध कुटुंबाने गणपती बसवला होता तो भंते आणि कार्यकर्त्यांनी काढून टाकला. इतकेच नाही तर गौरींचे आगमनही काही बौद्धांच्या घरी होते, याची प्रचिती येत्या दोन दिवसांत घेता येऊ शकेल. काहीच प्रकरणे उघडकीस येतात तेव्हाच संबंधितांची नाचक्की होते. तरडेंच्या बाबतीतही तेच झाले. पुस्तक बाप्पा ही संकल्पना त्यांना अफलातून आहे असे त्यांना वाटले. माॅबची वैचारिक लिंचिंग होईल असे त्यांना वाटले नाही. त्यांना या प्रकरणात पळवाट काढता आली असती, प्रतिवाद करता आला असता पण या हंबिररावांनी लवकरच शरणागती पत्करली. समाजमाध्यमांवर काहीही लिहिण्याचे आयते कोलीत लोकांच्या हाती लागले आहे. मात्र, एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल की जो देश संविधानावर चालतो त्याचा द्रोह जिथे कुठे घडून येत असेल तर तो देशद्रोह समजला जावा, तसा कायदाच करणे आवश्यक आहे.
गंगाधर ढवळे,नांदेड