अशा परिस्थितीत शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्यामुळे शिवसेनेसमोरही पेचप्रसंग उभा राहिला होता .अशा परिस्थितीत बंडखोरांना शिवसेनेत वापस बोलावण्यासाठी आणि पक्षाची पुढची दिशा ठरविण्याच्या अनुषंगाने आज सायंकाळी पाच वाजता शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठक वर्षा बंगल्यावर बोलाविण्यात आली आहे. या बैठकीस आमदारांनी उपस्थित राहणे अनिवार्य असून अत्यंत महत्त्वाच्या कामाचा लेखी पुरावा सादर केल्याशिवाय गैरहजर राहता येणार नाही असेही पक्षाने बजावलेल्या व्हीप मध्ये नमूद करण्यात आले आहे. शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी हा व्हीप बजावला आहे. आमदार बालाजी कल्याणकर यांना बजावण्यात आलेला व्हीप घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर, जिल्हा समन्वयक धोंडू पाटील यांनी आमदार कल्याणकर यांचे निवासस्थानी जाऊन व्हीप देण्याचा प्रयत्न केला .
यावेळी आमदार बालाजी कल्याणकर घरी नसल्याचे लक्षात आले .आमदार बालाजी कल्याणकर यांच्या सौभाग्यवती संध्या बालाजी कल्याणकर यांच्याशी जिल्हाप्रमुख यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून अधिक माहिती विचारली असता आमदार बालाजी कल्याणकर यांची प्रकृती ठीक नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सदर व्हीप आमदार बालाजी कल्याणकर यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन त्यांच्या पुटण्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे आमदार बालाजी कल्याणकर हे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या बैठकीस उपस्थित राहणार का ? का पक्ष त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करेल याकडे आता लक्ष लागले आहे.