लोहा ; दिगांबर वाघमारे
लोहा तालुक्यातील धानोरा म. ग्राम पंचायत अंतर्गत गांधीनगर वस्ती येथील प्राथमिक शाळा विद्यार्थी संख्ये अभावी तांत्रिक अडचणीमुळे मागील चार वर्षांपासून बंद असल्याने वस्तीतील विद्यार्थ्याना पावसाळ्यात नदी पात्रातून, चिखलातून 02 ‘किमी धोकादायक प्रवास करून धानोरा म. शाळेत यावे लागत होते. याबाबत गांधीनगर वस्तीतील ग्रामस्थ, ग्राम पंचायत पदाधिकारी, पत्रकार, वारंवार पाठपुरावा करीत होते. प्रहार संघटना तालुका अध्यक्ष माऊली गीते यांनी याबाबतचे फोटो, व्हिडिओ क्लिप्स मा. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांना पाठवून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
मा. वर्षा ठाकूर मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांनी याबाबतचे गांभीर्य ओळखून तातडीने दखल घेत शिक्षणाधिकारी, गट विकास अधिकारी यांना आवश्यक सूचना दिल्या.

त्यानुसार, आज प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकरी (माध्य), रवींद्र सोनटक्के, गट शिक्षणाधिकारी, पं स लोहा यांनी नदी पात्रातून, चिखलातून 2 किमी पायपीट करून धानोरा म. ते गांधीनगर रस्त्याची पाहणी केली. शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी गांधीनगर वस्तीतील ग्रामस्थांशी चर्चा करून, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय लक्षात घेऊन तेथील बंद असलेल्या प्राथमिक शाळेत शिक्षकांची तातडीने तात्पुरती व्यवस्था करण्याच्या सूचना गट शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या.

या प्रसंगी गट विकास अधिकारी शैलेश वाव्हळे, उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, केंद्र प्रमुख मदन नायके, जि प प्रा शा धानोरा म. चे मुख्याध्यापक अशोक कदम सर, परमेश्वर तिडके सर व अन्य शिक्षकवृंद, सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांची उपस्थिती होती.



