माळाकोळी ; एकनाथ तिडके
माळाकोळी येथे मागील काही दिवसापासून भूगर्भातून आवाज येत असून काही घरांना धक्के जाणवत आहेत त्यामूळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे , या संदर्भाने माळाकोळी ग्रामपंचायत येथे सरपंच चंद्रमणी मस्के यांनी बैठक बोलावून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला यावेळी तलाठी श्री संदीप फड यांनीही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
सद्यस्थितीत सणासूदीचे दिवस असून कोरोनाचा कहर सूरु असताना आता भूगर्भातुन अचानक आवाजासह धक्के जाणवू लागल्याने नागरीक चिंतेत आहेत, दिवसभरात अनेकवेळा असे प्रकार होत आहेत त्यामूळे प्रशासनाने तात्काळ या गोष्टीची दखल घेऊन या प्रकाराची शहानिशा करणे गरजेचे आहे.
माळाकोळी ग्रामपंचायत येथे सरपंच चंद्रमणी मस्के यांनी तातडीने बैठक बोलावून तहसीलदार श्री विठ्ठल परळीकर यांच्याशी संपर्क साधला व भूगर्भातील आवाज व जाणवणारे धक्के संदर्भात माहिती दिली , यावेळी तहसीलदार परळीकर यांनी भूगर्भ शास्त्रज्ञांची टीम माळाकोळी येथे दिनांक 27 ऑगस्ट रोजी येत असल्याची माहिती दिली .
यावेळी तलाठी श्री संदीप फड यांनी व सरपंच चंद्रमणी मस्के यांनी संयुक्त प्रसिद्धीपत्रक काढून ज्यांची घरे कच्ची व मातीचे आहेत अशा नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी वास्तव्य करण्याचे आवाहन केले आहे यासाठी त्यांनी जिल्हा परिषद शाळा व मंगल कार्यालय या ठिकाणी अशा लोकांनी काही दिवस वास्तव्य करावे असे आवाहन केले आहे,
यावेळी बैठकीसाठी सरपंच चंद्रमणी मस्के, तलाठी श्री संदीप फड, यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष माउली गीते, श्यामसिंह बयास, उपसरपंच मनोहर राठोड बालाजी तिडके ,बळी शिंदे सुधाकर राठोड ,विनोद मस्के, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.