भारतातल्या हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील कट्टरतावाद, वैमनस्य जगाला माहित आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंड लक्षात घेतला तर लक्षात येते की भारतावर परकीय मुसलमान राजसत्तांनी आक्रमणच केलेले आहे. सोने की चिडीया असलेल्या देशाला सर्वोतोपरी लुटून भकास करण्याचे काम या काळात मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. हिंदू मुस्लिम धार्मिक वैमनस्याचे बीज यातच पेरले गेलेले आहे. बळजबरीने केलेल्या धर्मांतरणाचा आणि खुलेआम कत्तलींचा इतिहास स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळात अनेक हिंदू मुस्लिम दंगलींनी जिवंत ठेवला. हिंदू मुस्लिम दंगलींनी मन कलुषित झाली. धार्मिक तेढ निर्माण झाली, कायम राहिली. सामाजिक प्रदुषण होत राहिले.
स्वातंत्र्यपूर्व काळात सन १९२० च्या सुमारास हिंदू-मुस्लिम समाजामधील तेढ वाढत चालले होते. १९२० – २३ नंतर भारतातील अनेक शहरांमध्ये सांप्रदायिक दंगली आणि नंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. १९२३ साली अकरा, १९२४ साली अठरा१९२५ साली सोळा तर १९२६ साली पस्तीस हिंदू – मुस्लिम दंगली झाल्या आहेत. ऑगस्ट १९२७ च्या बंगाल, पंजाब, उ.प्रदेश आणि लाहोरच्या दंगली सर्वात जास्त हिंसक होत्या. हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी १९२३ साली काढलेल्या मिरवणूकीचे मशिदीच्या समोरून नेले जाणे आणि मिरवणूकीमध्ये मोठ्या आवाजात वाद्य वाजविले जाणे हे त्यावेळच्या दंगलीचे मुख्य कारण बनले. ह्या दंगलींचा हेडगेवारांवर मोठा परिणाम झाला आणि त्यातूनच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची १९२५ ला स्थापना केली. ह्या दंगलीला उत्तर आणि पूर्वीची मशिदीसमोरुन शांततेत मिरवणूका नेण्याचा संकेत मोडण्यासाठी १९२७ च्या गणेश मिरवणूकीमध्ये हेडगेवारांनी मुद्दाम मोठ्याने ढोल वाजवत, मिरवणूक मशिदी समोरून नेली. ह्या सर्वाचा परिपाक म्हणून सांप्रदायिक ध्रुवीकरणास सुरूवात झाली. ४ सप्टेंबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने हिंदूंनी सालाबादप्रमाणे मिरवणूक काढली होती, ती मिरवणूक ज्यावेळी महाल इलाक्यातील मशिदीसमोर पोहोचली त्यावेळी स्थानिक मुस्लिमांनी ती मिरवणूक तेथुन पुढे नेण्यास मज्जाव केला. मिरवणूकीच्या दिवशीच दुपारच्या वेळी जेव्हा हिंदू लोक आपल्या घरांमध्ये आराम करत होते तेव्हा अनेक मुस्लिम तरुण अल्लाहू अकबरच्या आरोळ्या ठोकत सुरे, चाकू घेऊन झुंडीने हिंदू इलाक्यात दाखल झाले.
हेडगेवार यांच्या घरावर मुस्लिम युवकांनी दगडफेक केली, त्यावेळी हेडगेवार नागपूरात आपल्या घरी नव्हते. रा.स्व.संघाचे कार्यकर्ते ह्या समस्येला तोंड देण्यासाठी लाठ्या घेऊन महाल इलाक्याच्या गल्ल्यांमध्ये आले, ज्यामुळे वातावरण आणिखनच चिघळले. लियाकत अली खान आपल्या पुस्तकात म्हणतात की, अशा हिंसक दंगलीमध्ये वापरली गेलेली हत्यारे आणि दारुगोळा अचानक येत नाही तो आधीच पूर्वनियजनाचा भाग म्हणून गोळा करुन ठेवलेला असतो. वॉशिंगटन पोस्टच्या बातमीनूसार या दोन दिवसाच्या दंगलीमध्ये एकूण २२ जणांनी आपले प्राण गमावले आणि जवळपास १०० जणांना गंभीर जखमा झाल्या होत्या.दोन दिवसानंतर सरकारने शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सैन्याला पाचारण केले. ह्या दंगलीच्या निमित्ताने रा.स्व.संघाच्या एकूण १६ शाखांनी शहरभर आपल्या ़’स्वयंसेवकांची फौज’ हिंदूंच्या रक्षणासाठी खडी केली होती. त्यानंतर महाराष्ट्रात विविध कारणांवरून अनेक हिंदू मुस्लिम दंगली घडून आल्या आहेत
आताही एखाद्या छोट्याशा कारणावरून दंगलीचे पडसाद उमटण्याची भिती आहे. पडसादाचे भयानक दंगलीत रुपांतर होण्याचीही शक्यता असते. यात राष्ट्रीय संपत्तीचे, मानवी जिविताचे नुकसान करणाऱ्या दंगली रौद्र रूप धारण करीत असतात. दोन समाजांना, धर्मांना आपसात लढवून दंगल घडविण्याचे सामर्थ्य इथल्या कुटील षडयंत्रात सापडेल. या षडयंत्रांना या देशात सतत दंगली घडवून आपल्या सत्तेची पोळी भाजून घेण्याचा परवानाच मिळालेला असतो. धार्मिक तुष्टीकरण आणि राजकारण यांचे व्यस्तचलनाचे समीकरण सातत्याने सुरू राहिले. परंतु धार्मिक द्वेषाबरोबरच राजकारण वगळले तरी दोन्ही धर्मांच्या लोकांना एकोपा हवा असतो. प्रेम, समन्वय, शांती, मानवतेचा सुगंध दरवळविणारा लोकांचा समुदाय दोन्ही धर्मात मोठा आहे. या विचारधारेमुळे दोन्ही धर्मात एकतेचे सौंदर्य प्रस्थापित होते. हे फक्त लोकांच्या लक्षात आले पाहिजे.
एकतेच्या सौंदर्यनिर्मितीच्या घटना नेहमीच नैसर्गिकरित्या घडत असतात. निसर्ग आपल्याला नेहमी शिकवत असतो. आपण त्याकडे पहातही नाही. त्यापासून शिकत नाही. एकशे तीस कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात सौंदर्य निर्मिती करणारी लोकसंख्याही अधिक आहे. गेल्या आठवड्यात एक महत्त्वपूर्ण छायाचित्र समाजमाध्यमावर तरळत राहिले. कोरोनाच्या या संकटकाळात देशात हिंदू आणि मुस्लिम यांच्यात परस्परभेदाच्या बातम्या येत असतानाही दोन्ही धर्मियांमधील बंधुत्वाचे नाते सांगणाऱ्या घटनाही देशात घडत आहेत. तसेच देशातील विविध भागांमध्ये हिंदू-मुस्लिमांनी परस्परांना मदत केल्याची अनेक उदहारणं आपण पाहिली आहेत. अशातच आता हिंदू मुलीचं मुस्लिम मामानं कन्यादान केल्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. माणुसकीचा धर्म, लॉकडाऊनमध्ये बंधुभावाचे दर्शन यासारख्या कमेंट करत अनेकजणांनी हा फोटो पोस्ट केला. तर काही नेटकऱ्यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेट्सलाही ऐक्याचं दर्शन करणारा हा फोटो ठेवला होता. माध्यमांनीही तितक्याच तीव्रतेने दखल घेतली आहे.
मामा भांजींच्या या भावनिक फोटोला पाहून अनेकांचे डोळे पाणावले. एक मुस्लिम मामा आपल्या मानलेल्या हिंदू बहिणीच्या मुलींचं कन्यादान कतो. लग्नानंतर सासरी जाताना त्या मुली मामाच्या गळ्यात पडून रडत आहेत. हे पाहून आनेकजन भावनावश झाले आहेत. प्रसिद्ध ब्लॉगर आणि लेखक समीर गायकवाड यांनी या लग्नातील फोटो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की, आपल्या भारताचं हे खरं चित्र आहे. हे अगदी बरोबर आहे. अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील हा प्रसंग आहे. येथील सविता भुसारी या शेतकरी कुटुंबातील असून त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. गावखेड्यात काबाड कष्ट करत सविता भुसारी यांनी दोन्ही मुलींना मोठे केले. सविता यांना भाऊ नसल्यामुळे घरासमोर राहणाऱ्या बाबा पठाण यांना त्यांनी गुरू भाऊ मानले आहे.देशात दोन धर्मात तेढ लावण्याचे उद्योग गेल्या काही वर्षांपासून जास्तच वाढले आहेत मात्र खेडोपाडी अशा बातम्यांचा काहीही फरक पडत नाही किंवा सामाजिक सलोखा आणि एकोपा टिकवून ठेवण्याकडे ग्रामीण भागात कल असतो. यातूनच रक्ताच्या नात्यापेक्षाही मानलेली नातीच अधिक पक्की होतात. मानलेल्या हिंदू बहिणीच्या दोन मुलींच्या पालनपोषणास मदत करणारा तिचा मानलेला भाऊ धर्माने मुस्लिम असला तरी मुलींच्या लग्नात देखील मामा म्हणून धावून आला आणि मामा म्हणून सर्व विधीही पार पाडले. नगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील ही बातमी असून जाती धर्माच्या भिंती झुगारून देत माणुसकी म्हणून बहिणीच्या मदतीला धावलेल्या या मामाचे सर्वत्र कौतुक होत असून बाबाभाई पठाण असे त्यांचे नाव आहे.
बाबा पठाण यांनी देखील जाती-पातीच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म दाखवत हिंदू मुलींचे मामा होऊन कन्यादान केले. एव्हढेचं नव्हे तर विवाहाचा अर्धा खर्च करुन मानलेल्या बहिणीच्या मुलींच्या सुखी संसाराला सुरुवात करुन दिली. भुसारे परिवारातील दोन मुलींच्या लग्नात मामाचे विधी बाबा भाई पठाण यांच्या हस्ते संपन्न झाले. नवऱ्या मुलींची आई दरवर्षी बाबा भाई ना राखी बांधते कारण तिला सख्खा भाऊ नाही. भावाची व मामाची भुमिका बाबा भाई पठाण यांनी बजावली. मानवता, प्रेम आणि विश्वास जिथे एकदिलाने नांदतात तिथे व्यवहारातल्या भौतिक बाबी गौण ठरत जातात, असं समीर गायकवाड यांनी लिहिलंय.
जन्माने हिंदू असलेली ती एका मुस्लिम कुटुंबात वाढली… अवघी सहा महिन्यांची असल्यापासून त्यांनी तिला लळा लागला… खाऊ घालताना, फिरायला नेताना, भेटवस्तू देताना, सण-उत्सव साजरे करताना त्यांच्यामध्ये कधीही धर्म आला नाही… तिच्यामुळे ही कुटुंबे एकरूप झाली… ‘मला दोन आई-वडील आहेत,’ हे ती आता अभिमानाने सांगते. पुण्यातील सलोनी चव्हाणची एक कथा. सलोनीसारखी सामाजिक सलोखा जोडणारी अशी असंख्य उदाहरणे कथांच्या रुपात आता उलगडत आहेत. हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे ‘कथाशतक’ हा उपक्रम हाती घेण्यात आला असून त्या अंतर्गत हिंदू-मुस्लिम सलोख्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या शंभर सत्यकथा प्रकाशित करण्यात येत आहेत. दोन्ही धर्मांमध्ये बंधुत्व आणि सलोख्याचा भाव निर्माण व्हावा, यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यातील पहिली कथा ही सलोनी राजेश चव्हाण हिच्या आयुष्यावर आधारित आहे. सलोनी घोरपडे पेठेतील पीएमसी कॉलनीमध्ये ती राहते. तिच्या घरासमोरच निसार शेख यांचे कुटुंब राहते. निसार शेख हे सरकारी कर्मचारी आहेत. सलोनी सहा महिन्यांची होती, तेव्हा तिने पहिल्यांदा शेख यांच्या घरात प्रवेश केला. पाहता पाहता या चिमुकलीने शेख यांच्या घरातील सर्वांनाच आपलेसे केले. मग ती स्वत:च्या घरी कमी आणि शेख यांच्या घरीच जास्त राहू लागली. निसार आणि मरियम शेख या दाम्पत्याला ती मामू आणि मुमानी, असे संबोधते. गेल्या जवळजवळ वीस वर्षांपासूनचा हा ऋणानुबंध आजही कायम आहेत.
शेख दाम्पत्यानेही सलोनीला मुलगी मानले. घरात कोणताही कार्यक्रम असो, आपल्या पोटच्या मुलांप्रमाणे निसार शेख यांनी सलोनीचीही हौस भागवली. तिला काय हवे, काय नको याची ते सारखी काळजी घेत असतात. दोन्ही कुटुंबांची आपल्या धर्मावर अपार श्रद्धा आहे; पण या नात्यामध्ये धर्म कधीच आडवा आला नाही. इतकेच काय, तर ही मंडळी दिवाळी, रमजान ईद हे सण एकत्र साजरे करतात. ही किमया साधणारी सलोनी लहानाची मोठी झाली आणि आजही दोन्ही कुटुंबांच्या प्रेमात जराही फरक पडलेला नाही. सलोनी म्हणते की, ती लहानपणापासून निसार शेख यांच्या कुटुंबातच वाढले आहे. तिचा धर्म वेगळा असला, तरी त्यांनी तिला मुलीसारखे मानले. कधीही माझ्याबरोबर दुजाभाव केला नाही. आज जवळजवळ वीस वर्षे होत आली, तरीही ते तिचे तितकेच लाड पुरवतात. तिच्या नशीबात दोन आई-वडील आहेत, हे तिचे भाग्य समजते. हिंदू आणि मुस्लिम धर्मामध्ये असलेल्या बंधुत्वाची साक्ष देणारी, अशी असंख्य उदाहरणे आहेत. आपण कोणत्याही धर्माचे असलो, तरी आधी माणूस आहोत, हा भाव प्रकट करणारी ती उदाहरणे आहेत.
हिंदू-मुस्लिम ऐक्याचा नारा देत बामणी ता. खानापूर येथील मुस्लिम समाज गणेशोत्सव साजरा करतो. येथील मुस्लिम समाज एकत्रित येऊन गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून दररोज दोनवेळा पूजा-अर्चा करतो. शिवाय गौरी पूजनासह गणेश विसर्जनापूर्वी महापूजाही घातली जाते.बामणी येथील हिंदू-मुस्लिम एकता गणेश मंडळाचे संस्थापक जहॉँगीर शिकलगार यांनी २००८ ला पुढाकार घेऊन हिंदू-मुस्लिम गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. मुस्लिम समाजातील भाविकच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा करतात. दररोज सकाळी व संध्याकाळी महाआरती, गोड नैवेद्य व दररोज महाप्रसाद असा कार्यक्रम असतो. त्याचबरोबर संगीत खुर्ची, गोणपाट उडी, लिंबू-चमचा अशा विविध स्पर्धाही मुस्लिम समाजातील गणेशभक्त आयोजित करतात. हा गणेशोत्सव तालुक्यात आदर्शवत ठरत आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले जाते. बामणीतील ग्रामस्थही मुस्लिम समाजाच्या सणात मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. महाआरतीत मुस्लिम आणि हिंदू ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होतात.गणेश विसर्जनापूर्वी महापूजा आयोजित केली जाते. त्यात कार्यकर्ते सहभागी होतात.
विविधतेतून एकता असलेला आपला भारत देश. हिंदू मुस्लीम ऐक्याच्या अनेक घटना आणि अनेक प्रसंग आपल्या आजूबाजूला घडताना आपण पाहतो. मग एखादं संकट असो किंवा सणवार, विविधतेने नटलेल्या परंपरेचं दर्शन आपल्याला घडतच असतं. असाच एक प्रसंग गणेश चतुर्थीला उस्मानाबादमधील कळंब इथे घडला. एका चिमुकल्याच्या हट्टापायी एका मुस्लीमधर्मियांच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाले. अस्लम आणि अर्शिया जमादार या दाम्पत्याने आपल्या चिमुकल्याचा हट्ट पुरवला आणि घरात बाप्पाची प्रतिष्ठापना आणि आरतीही झाली.
कोरोनाकाळात कोविडग्रस्त हिंदू प्रेतांवर अंतिम संस्कार करायला कुटुंबातले धजत नव्हते, तेव्हा मुंबईतल्या प्रसिद्ध बडा कब्रस्थान मधले मुसलमान पुढे आले. एक नाही, दोन नाही 300 पेक्षा जास्त हिंदू प्रेतांवर त्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी शेवटचे संस्कार केले. अगदी हिंदू पद्धतीने. गळ्यात तुळशीची माळ घालून, व्यवस्थित तिरडी बांधून, चिता रचून, छिद्र असलेल्या मडक्यातून पाण्याची धार वाहत, प्रदक्षिणा घालत हे अंतीम संस्कार झाले. नंतर पालिकेच्या प्रोटोकॉल नुसार विद्युत वाहिनीवर भडाग्नी दिला. मंत्राग्नी दिला. मोबाईल वरून Whatsapp Video Call लावत सगळे अंतिम संस्कार त्यांच्या कुटुंबियांना दाखवले. अगदी काहींनी विनंती केली तर अस्थी विसर्जनही केलं. ज्यांनी मागितल्या त्यांच्या घरी अस्थी पोचवल्या. त्यासाठी एक पैसाही आकारला नाही. उलट भटजीला दान दक्षिणा दिली. अंतर ठेवून भटजी सूचना देत होता. आणि नमाजी टोपीधारी मुसलमान हिंदू मंत्र बोलत शेवटचा अग्नी देत होते.
कुपर हॉस्पिटल मधील पहिलं हिंदू प्रेत घेऊन टिपिकल मुसलमानी पेहरावातील ते सहा जण ओशिवऱ्याच्या स्मशातभूमीत पहिल्यांदा पोचले तेव्हा, स्मशानातले कर्मचारी घाबरले होते. पण त्यांच्याकडे बाकायदा मृत्यूचं सर्टिफिकेट होतं. हॉस्पिटलचं पत्र होतं आणि कुटुंबियांचा व्हिडीओ मेसेज होता. स्मशानभूमीतले कर्मचारी तयार झाले. पहिल्या दिवशी त्या मुस्लिम कार्यकर्त्यांची नवागतासारखी अडचण जरूर झाली. पण माहिती घेत त्यांनी तो अंतिम संस्कार पार पाडला.
हिंदूंमध्ये सुद्धा एक प्रथा नाही, अनेक प्रथा आहेत. कुटुंबियांनी सांगितलं तसं प्रत्येक प्रथेचं पालन त्यांनी केलं. एका कुटुंबात तर मुलगीच होती. नातेवाईक कोणी यायला तयार नव्हते. इक्बाल ममदानी त्या मुलीला घेऊन बाणगंगेवर गेले. श्रीराम दंडकारण्यात असताना इथे येऊन गेल्याची कथा प्रचलित आहे. त्यांच्या बाणानेच इथे गंगा अवतरली अशी दंतकथा आहे. त्या बाणगंगेवर इक्बाल भाईंनी त्या मुलीच्या वडिलांचं अस्थी विसर्जन विधीवत केलं.
महिन्यापूर्वी उत्तर प्रदेशात कानपूर जवळच्या एका गावात एक हिंदू म्हातारा गेला. तेव्हा त्याची प्रेत यात्रा खांद्यावर घेत आणि हातात अग्नीचं मडक घेत, राम नाम सत्य है चा जप करत मुसलमानांनी त्यांची अंत्ययात्रा काढली. कारण लॉकडाऊनमुळे त्यांचे कोणतेच नातेवाईक येऊ शकत नव्हते. गावात सगळे मुसलमान, एकच घर हिंदूंचं होतं. त्या घरातले सगळे दूर शहरात नोकरीला गेलेले. म्हाताऱ्याला शेजारचे मुसलमानच सांभाळत होते. पण अंतिम संस्कार कसा करायचा? हा प्रश्न होता. नातेवाईकांनी सांगितलं तुम्हीच करा. मुस्लिम तरुण जमले आणि त्यांनी पुढचे सोपस्कार पार पाडले. राम नाम सत्य है, असा त्यांचा ध्वनी त्या व्हिडीओत तुम्ही पाहिलाही असेल. पण राम नाम सत्य है, असा 300 प्रेतांच्या अंतिम संस्कारात तोच प्रतिध्वनी मुंबईत ऐकू येत होता. कारण जवळ असूनही कोरोनाग्रस्त प्रेताला हात कोण लावणार?
पण इक्बाल ममदानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मागे उभे राहिले ते बडा कब्रस्थानचे चेअरमन शोहेब खतीब. अनेकांसाठी तर त्यांनी कब्रस्थानची जागाच उपलब्ध करून दिली. हिंदूंचा अंतिम संस्कार करताना आपला धर्म बाटतो असा विचार सुद्धा त्यांना शिवला नाही. फक्त हिंदूंचीच नाही तर काही पारशी आणि ख्रिस्ती बांधवांच्या प्रेतांचीही त्यांनी त्यांच्या त्यांच्या धर्म संस्कारानुसार विल्हेवाट लावली. पारशी बांधवांचे रीतिरिवाज वेगळे. ख्रिस्ती बांधवांचे रीतिरिवाज वेगळे. पण सगळेच सोपस्कार त्यांच्या त्यांच्या धर्माप्रमाणे खतीब आणि ममदानी यांच्या टीमने पार पाडले.
जळगावला एक शिक्षक कोरोनामुळे गेले. त्यांचे अंतिम संस्कार करायला, खांदा द्यायला कुणीही आलं नाही. सगळे लांबून पाहत होते. त्यांच्या मुलाने आपल्या वडिलांचं प्रेत एकट्याने खांद्यावर नेलं. सरणावर कसं चढवलं असेल ते त्यालाच माहीत. या सर्व प्रसंगाचे यथार्थ वर्णन आ. कपिल पाटील यांनी केलंय. कोरोनाकाळाने जात, धर्म, वंश, परंपरा चालीरीती यांचे काहीच अस्तित्व ठेवले नाही. शेवटी माणूसच माणसासाठी असतो हे हा काळ सांगत आहे. माणुसकी हाच त्याचा धर्म आहे. माणसाने आपल्यातील सर्व विकार काढून टाकावेत. मानवी जीवनाचे अस्तित्व काळापुढे काहीच नाही. मानवता हेच जगण्याचे एकमेव सौंदर्य आहे.
गंगाधर ढवळे ,नांदेड