फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
- कंधार तालुक्यातील फुलवळ सह परिसरात यंदा निसर्गाने अतिवृष्टी केल्यामुळे खरीपाच्या पेरणीपासून ते राशीपर्यंतच्या खर्चाचा हिशोब करता यंदा शेती पुर्णपणे तोट्यातच येणार असाच शेतकऱ्यांतुन अंदाज वर्तविला जात आहे .
शेती मालाला बाजारात म्हणावा तसा भावही मिळत नाही .यंदा कापूस , सोयाबीन च्या लागवडीपासून ते आता काढणीपर्यंतच्या खर्चाचा व सध्या हाती येणाऱ्या उत्पादनाचा विचार करता आणि सध्या वानरांचा रोजचा धुमाकूळ पाहता अशा मरणयातना सोसाव्यात तर किती दिवस ? अशा चिंतेने गहीवरून गेलेला प्रत्येक बळीराजा म्हणतोय काय ही दैना अन नुकसान डोळ्याला पाहवेना…
फुलवळसह परिसरात यंदा झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे खरीपातील मुग , उडीद , कारळ , तीळ , ज्वारी , सोयाबीन , कापूस या सर्व पिकांचे अतोनात नुकसान होऊन उत्पादनात कमालीची घट होणार आहे . परिणामी शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडला आहे . सध्या कापसाची बोंड काही प्रमाणात तग धरून असले तरी सध्या वानरांचा कळप या शिवारात मोठ्या प्रमाणावर दाखल झाला असून ते उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. तर दुसरीकडे सोयाबीनच्या लागवडीपासूनच्या खर्चाचा विचार करता त्याला लागलेल्या शेंगांच्या उत्पादनाचा विचार करता आणि त्याला बाजारात मिळत असलेला भाव पाहून शेतकरी यंदाही अडचणीतच असल्याच्या भावना अनेक शेतकरी बोलून दाखवत आहेत.
-
याबद्दल अनेक शेतकऱ्यांशी चर्चा केली असता अशा केविलवाण्या भावना व्यक्त करत ते म्हणतात की धरणीमाय देते पण निसर्ग कांहीच हाती लागू देईना अन् आश्वासनांची खैरात वाटणारे हे सरकार कांही शेतकऱ्यांना मदत काही वेळेत देईना. तेंव्हा आता कसं जगावं आणि कसं मरावं हाच प्रश्न आम्हा शेतकऱ्यांच्या समोर आहे . कारण पोटाची खळगी कांहीकेल्या भरत नाही . सावकारांच कर्ज कांही फिटत नाही . मग मुल बाळ पोसावी कशी अन् त्यांना शाळा शिकवीत संसाराचा गाडा चालवावा तर कसा . हाच पेच सुटेनासा झाला असून त्यातच कधी निसर्ग हुलकावण्या देतो तर कधी अतिवृष्टी करतो . त्यातच असे वन्यप्राणी मध्येच धुमाकूळ घालत अतोनात नुकसान करतात . त्यामुळेच काय ही दैना अन डोळ्याला पाहवेना अशीच गत निर्माण झाल्याचे दिसून येते.