मराठवाडा मुक्ती संग्राम धगधगता रणसंग्राम

मराठवाड्यात फेरफटका मारला की प्रत्येक जिल्हयाची एका वेगळ्याच धाटनीची मराठी भाषा ऐकायला मिळते. धाटनी वेगळी असेल पण त्या भाषेत रांगडेपणा दिसून येतो. त्याच्या बोलण्यात निडरपणा असतो. बोलण्याची बेधडक वृती दिसून येते.

 औपचारिक भाषा कमी वापरली जाते व अनौपचारिक भाषा येथे सुसाट वेगानं पळते. मराठवाडी भाषा ही इतर मराठी बोलणाऱ्या पेक्षा थोडं निराळी वाटते.

तीस पस्तीस वर्षापूर्वी चार माणसं एकत्र भेटली की विचारायचे ” आरे राम्या तूझं वय काय रं ? ” तो समोरुन उत्तर द्यायचा , ” काय की बा ; पण माझे बा म्हणत्यात की म्या रझाकारापूर्वी दोन वर्षाचा होतो म्हणं ” मग समोरचा लगेच म्हणायचा , ” आरे राम्या तू माज्या पेक्षा लहानच हाईस बग. आरं रझाकारच्या वेळी म्या पंधरा सोळा वर्षाचा होतो . मला चांगलं कळत होतं बग.मला समंद समंद आठवतेय बग.” मराठवाड्यात वय सांगण्याची ही एक पद्धतच रुढ होती. थोडक्यात जन्म मृत्यूची नोंद घेताना रझाकारची आठवण खेड्यातील जुनी माणसं करीत असत.दिवस जात राहिले.ते इतिहास जमा होत राहीले. आधुनिक पिढी जन्मास आली. भूतकाळ विसरले. आपण कसे स्वंतत्र झालो ? त्यासाठी कोणी कोणी जेल भोगले ? कोणी कोणी प्राणाची आहुती दिली? कोणी कोणी संसार त्यागून देशाला वाहून घेतलं हे आजच्या तरुण पिढीला काहीही माहित नाही. त्यांनाच नाही तर मराठवाड्यातील आज साठी ओलांडलेल्या बहुसंख्य लोकांनाही मराठवाड्याचा इतिहास माहित नाही. आजच्या पिढीबदल सांगावयाचे झाले तर बिरबलाच्या म्हणण्याप्रमाणे २७ उने ९ = ०० हे त्यांना कळालं नसेल ; पण भारतातील तरुण पिढी येवढंच विचार करत आहे की आज जो सत्ताधारी पक्ष आहे त्या बाबतीत सांगावयाचे तर ७५ उने ८=०० येवढेच त्यांना कळालेलं आहे ? त्यांना रझाकार काय करत होता ? तो कोण होता ? याचं फारसं देणं घेणं दिसत नाही.

मराठवाड्यात फेरफटका मारला की प्रत्येक जिल्हयाची एका वेगळ्याच धाटनीची मराठी भाषा ऐकायला मिळते. धाटनी वेगळी असेल पण त्या भाषेत रांगडेपणा दिसून येतो. त्याच्या बोलण्यात निडरपणा असतो. बोलण्याची बेधडक वृती दिसून येते.

बहुसंख्य लोकांना आपण गुलामांचे गुलाम होतो हे सुद्धा माहित नाही.भारत स्वतंत्र झाला.आज भारत मातेच्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत.तर मराठवाडा स्वतंत्र होऊन चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण होवून पंच्याहातर वर्षात आपण पदार्पण करित आहोत.

इंग्रजांची निती फोडा झोडा व राज्य करा अशी होती. भारत सोडताना त्यांनी फोडा झोडा या नितिचा भरपूर उपयोग करून घेतला. भारताचे दोन तुकडे केले. हैदराबाद संस्थानाचा समावेश भारतीय संघराज्यात सहजा सहजी झालेला नाही. हे युद्ध तमाम भारतीयांना एक प्रेरणा देणारी घटना आहे. गंमत बघा हा निजामाचा सातवा वशंज किती हराम होता. १९३० सालापासून त्याने इंग्रजांशी संधान बांधलेलं होतं. हैदराबाद राज्याचा इंग्रज प्रतिनिधी सर विल्यम वार्टन यांनी भारताचे दोन तुकडे करण्याचा घाट घातला होता . भारताच्या मधोमध हैदराबाद राज्य निर्माण करावायचे व भारताचे उत्तर भारत व दक्षिण भारत अशा दोन विभागात विभागणी करायची. याचा अर्थ हैदराबाद राज्य म्हणजे आपल्या देशाचं उदर आहे. त्या उदरात हे कॅन्सर सारखा रोग फोेफावला असता.कॅन्सर होण्या अधिच वल्लभभाई पटेल व पं.नेहरू यांनी या कन्सरचं निदान केलं व १७ सप्टेंबर ला जी रोगाची लक्षण दिसत होती ते समुळ उपटण्यात आले. इंग्रजांचं येवढ्यावरच समाधान झालं नाही म्हणून भारतात जी संस्थाने होती तेथील संस्थानिकांना त्यांनी फुस लावून सागितलं की भारतात तुम्ही विलीन होणे किंवा न होणे हे तुम्हा संस्थानिकांच्या इच्छेवर आहे.

भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतात एकून ५६५ संस्थानिक होते. या पैकी विनाअट ५६२ संस्थानिक भारताच्या संघराज्यात सामिल झाले ; पण फक्त तिन संस्थानिक ज्यावर मुस्लीम शासक होते ते म्हणजे जम्मू काश्मिर ( तेथे राजा मात्र हिंदू होता) जुनागड व हैदराबाद. या तीन संस्थानिकांनी भारतात सामिल होण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावेळी हैदराबादचे संस्थानिक होते निजामाचे सातवे वंशज निजाम मिर उस्मान अलिखान.त्याला स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची स्वप्नं पडत होती.हैदराबाद म्हणजे भारताचं हृदयस्थान.भारताचं काळीज.त्याची इच्छा होती पाकिस्ताननं त्याला मदत करावी.तसा तो प्रयत्न ही करत होता.त्यावेळी त्याचा अर्धसैन्य प्रमुख कासिम रझवी जो मरावाड्याचा रहिवाशी होता. लातूर जिल्ह्याचा होता. तो अतिशय क्रुर होता.राक्षशी वृतीचा होता.या कासिम रझवीने रझाकार नावाची एक अर्धसैनिक दल स्थापन केले . व या संघटनेव्दारे त्यांनी मराठवाडी जनतेचा अतोनात छळ केला.

निजाम मीर उस्मान अलीखान येवढा भारत व्देष्टा होता की त्याला कसेही करून भारतात सामिल व्हायचे नव्हते. इंग्लंडच्या संसदेत मार्च १९४७ ला भारत स्वातंत्र करण्याचा कायदा मांडला गेला. त्याचवेळी निजामाने एक चाल खेळली. त्याने हैदराबाद राज्य स्वायत इस्लामी राष्ट्र हे कायम राहील अशी घोषणा केली.हैदराबाद राज्यात त्यावेळी ८७ % हिंदूची संख्या होती. तर केवळ ७% मुस्लीमांची संख्या होती .उर्वरित ६% इतर समाज होता. तरी निजाम हैदराबादला इस्लाम राष्ट्र करण्यास निघाले होते. ते येवढ्यावरच थांबले नाहीत तर हैदराबाद राज्याचा प्रश्न त्यांनी १९४८ ला संयुक्त राष्ट्रसंघाच्या दरबारी नेला होता. तर त्याचा सेनाप्रमुख अल इंद्रिस याला हैदराबाद राज्याला शस्त्रात्राने लेस करण्यासाठी शस्त्र खरेदीसाठी इंग्लंडला रवाना केले होते.

अन्याय ,दडपशाही याचं दुसरं नाव रझाकार.रझाकार हा अरबी शब्द आहे .याचा अर्थ आहे “स्वंयसेवक” हा शब्द उर्दूतही वापरला जातो.आपल्या शेजारच्या बांग्लादेशातही हा शब्द वापरला जातो;पण या शब्दाचा तेथे अर्थ आहे “देशद्रोही.”पाकिस्ताने १९७१ साली रझाकारासारखचं बांग्लादेशात अन्याय केला होता.तेथे पाक सैनिक रझाकारी करत होते. आपल्यासाठी रझाकार हे देशद्रोही होते.

१९४७ पूर्वी हैदराबाद संस्थानात मराठवाड्यातील आजचे आठ जिल्हे,तेलंगाना व कर्नाटकचा काही भाग होता.निजाम हा इंग्रजाचा गुलाम होता.मराठवाडा हा निजामाचा गुलाम होता.म्हणून आपण गुलामाचे ही गुलाम होतो.भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर आपण मात्र गुलामीतच होतो. मराठवाड्यातील जनता रझाकाराच्या अन्यायाने अत्याच्याराने वैतागली होती. त्यातच मराठवाड्यातील स्वातंत्रविरांना हे अन्याय नकोसे झाले होते.त्यांना गुलामगीरीला येथून हद्दपार करावयाचे होते.येथील जनता स्वामी रामानंद तिर्थ, गोविंद भाई श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडी स्वातंत्र्य सेनानींची फळी तयार झाली.यात औरंगाबाद ,बीड , लातूर , हिंगोली जालना , परभणी ,नांदेड व इतर सर्व मराठवाडी जिल्हे अन्याय विरोधात पेटून उठले . यात युवक युवतीही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्याच्या झांशी लक्ष्मीबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडाबाई शेळके (बदनापूर) , विठ्ठलराव काटकर (बीड),हरिचंद्र जाधव (लातूर),जनार्धन होर्टीकर (उस्मानाबाद) ,सूर्यभान पवार , विनायकराव चारठाणकर व विश्वनाथराव कातनेश्वरकर हे परभणीचे यौद्धे होते. नांदेड मधील शामराव बोधनकर , जयवंतराव पाटील हदगाव ,देवराव कवळे , तर हिंगोलीचे बहिर्जी शिंदे यांनी हिरिरीने हैदरबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला. यापैकी काहींनी आपल्या प्राणांची आहुतीही दिली.

नांदेड जिल्हयाचे युवक युवती यात मागे नव्हते. आपल्या युवकांत जोम होता. होश होता; पण त्यांच्याजवळ पैसा नव्हता.सर्व सोंग करता येतील;पण पैशाचं सोंग करता येत नाही आणि हे खरं आहे.नांदेड जिल्हयातील त्यावेळचे युवक एकत्र आले.लढा उभारायचं असेल तर शस्त्रात्र लागतात. त्यासाठी पैसा लागतो.पैसा आणायचा कोठून हा प्रश्न त्यांच्या समोर पडला.त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आठवले.सुरतची लूट आठवली.महाराजांनी ही लूट त्यांच्या कुटुंबाच्या भल्यासाठी केली नव्हती.ती लूट अन्याय विरोधात लढण्यासाठी होती. महाराजाचा आदर्श त्यांच्या समोर होता.त्यांच्या मनात वेगळंच शिजत होतं.त्यासाठी त्यांनी त्यांच्या वरिष्टांशी चर्चा केली.त्याच काळात नांदेड जिल्ह्यातील दत्ताजी उत्तरवार उमरी स्टेशन व गोविंदराव पानसरे अर्धापूर यांची हत्या करण्यात आली. यामुळे मराठवाड्यातील युवक व युवती पेटून उठले. स्वामी रामानंद सारखं नेतृत्व त्यांना भेटले. अनेक मराठवाडी मर्दाना मराठवाड्याच्या मुक्तीसाठी शहीद व्हावं लागलं.

मराठवाड्यावर निजामाची हुकुमशाही होती. हैदराबाद संस्थानांची सिमा होती हदगाव (नांदेड) पैनगंगा नदी. पैनगंगेच्या पलिकडे इंग्रज राजवट होती.ते आता मुक्त होते.आपले नांदेड जिल्यातील युवक स्वातंत्र्य सेनानी नांदेड जिल्हयात निजाम विरोधी कार्य करावयाचे व उमरखेडला आश्रय घ्यायचे. सर्व योजना ते उमरखेडच्या तळावर एकत्र येवून तयार करावयाचे.

स्वातंत्र सेनानींना पैसा हवा होता .त्यासाठी त्यांनी एक योजना अमलांत आणायची ठरवीली.ती योजना अशी होती : बँक लूटून पैसे जमा करणे.यासाठी साहेबरावजी बारडकर , धनाजीभाई पुरोहीत , अनंतराव भालेराव नागनाथराव परांजपे यांनी उमरी येथील स्टेट बॅक ऑफ हैद्राबाद लुटण्याचे ठरविले.हा चोरीचा प्रकार नव्हता. यामागे प्रेरणा होती छत्रपती शिवाजी महाराज यांची .यांनी मुद्दाम बँक लुटायचे म्हणून लुटले नाहीतर स्वातंत्र्य सैनिक यांना लागणारा दारुगोळा यासाठी ते बँक लुटणार होते.यासाठी त्यांनी स्वांतत्र्य सेनानींचे तीन गट केले व वेगवेगळ्या तीन ठिकाणी हल्ला करायचे ठरवले .

पहिला हल्ला उमरी रेल्वे स्टेशन करायचे. रल्वे पटरीचं नासधुस करायचे असे ठरले. दुसरा हल्ला उमरी पोलीस स्टेशन. पोलीस स्टेशनवर हल्ला करायचा व तेथील शस्त्रास्त्रे दारुगोळा लुटायचा व शेवटचा तिसरा हल्ला उमरीच्या बँकवर. असं नियोजन करण्यात आले होते .पहिल्या टीम मध्ये नांदेड जिल्ह्याचे कुंटूरकर होते त्यांनी पहिली मोहीम फत्ते केली. व तसा निरोप दुसऱ्या टीमला कळविला .दुसऱ्या टिममध्ये नागनाथराव परांजपे होते . त्यांच्या टिमने पोलीस स्टेशनवर हल्ला चढवला व तेथील शस्त्रास्त्र ताब्यात घेतली .त्यांनी तशी सूचना बँक लूटणाऱ्या टिमला कळविली. या टीमचे प्रमुख होते पुरोहीत . याच्या मदतीला अनंतराव भालेराव,बापूसाहेब बारडकर होते. पुरोहीत बँकेत थांबून होते. योग्य संधीची वाट पहात होते. सूचना मिळताच त्यांनी बँक लूटली. त्यांनी कॅशियरची हत्या केली. तेथे कोणी रक्कम मोजली नाही. एकूण आठरा कलतानी पोते रक्कमांनी भरले होते. त्या रक्कमांचा हिशोब कोणी विचारला नाही. याचा अर्थ त्या रक्कमेचा कोणी अपहार ही केला नाही . पुढे ऑडीट केल्यानंतर ती रक्कम व अठरा पोत्यात भरलेली रक्कम बरोबर निघाली . अठरा पोत्यातील रक्कम होती रु . बाविस लाख सहासष्ट हजार . येवढी रक्कम उमरखेडच्या सैन्य तळावर नेण्यात आली व निजामाशी दोन हात करण्यासाठी दारू गोळा खरेदी करण्यात आला.
निजामाला जेरीस आणण्यासाठी नांदेड जिल्हयात पाटनूरचा जंगल सत्याग्रह करण्यात आला. त्या जंगलातील मौलवान झाडं तोडण्यात आली. सिंदीची झाडं ही तोडण्यात आली. सिंदी झाडापासून सरकारला पैसा मिळत असे.या ठिकानी निजाम पोलीसांची नाका बंदी जनतेने केली होती. यात मराठवाडी तरुण सहभागी झाले होते.

भारत स्वतंत्र झाला १५ ऑगस्ट १९४७ ला. भारतातील तीन संस्थानिक सोडली तर सर्व देश मोकळा श्वास घेत होतं. मराठवाड्यातील जनता मात्र खितपत पडली होती. त्याचा गळा दाबला जात होता . म्हणून त्यांनी निजाम विरोधात उठाव केला. निजाम जुमानत नव्हता. रझवीची रझाकार संघटना हाहाःकार माजवत फिरत होती. त्याचवेळी भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभ भाई पटेलांनी निजामाला बिनशर्त भारतात सामिल होण्यास सांगितले ;पण निजाम ऐकत नाही असे लक्षात येताच त्यांनी सैन्य कारवाई करण्याचे ठरविले व अंमलांत ही आणले. त्यास आपण “पोलीस अॕक्सन ” म्हणून ओळखतो.

मेजर जनरल जे. एन.चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैनिकाने हैदराबाद संस्थानाला चारी बाजूनं घेरले . हा दिवस होता १३ सप्टेबर १९४८. निजामाचा सेनाप्रमुख जनरल अल इद्रिस व निजाम यांनी १७ सप्टेबर १९४८ रोजी शरणांगती पत्करली. त्यांनी हैद्राबाद संस्थान विनाअट भारतीय संघराज्यात विलीन केले व आपण गुलामीतून कायम मुक्त झालो. आपला मराठवाडी मुलुख मराठवाडा नावाने महाराष्ट्रात विना अट विलीन झाला. भारत स्वंतत्र झाल्यानंतर ही आपण जवळपास तेरा महिने निजामाशी मुकाबला केलोत. तेरा महिने आपण गुलमीतच होतो.त्यात २६४ स्वातंत्र्य सेनानी शहीद झाले. कित्येकांच्या संसाराची राखरांगोळी झाली.

जेव्हा वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते तेव्हा पासून मराठवाडा मुक्ती दिनाची कल्पना पुढे आली ; भाई केशवराव धोंडगे यांनी मराठवाडा मुक्ती दिन साजरा व्हावा म्हणून सारखाआवाज उठविला . स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक उभारावे म्हणून ते आवाज उठवत राहीले.कंधार तालुक्यातील कल्हाळी हे गाव मराठवाडा मुक्तीसाठी बलीदान दिलेले गाव म्हणून ओळखले जाते. भाई केशवराव धोंडगे हे जिल्हाभर फिरून स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबातील व्यक्तीचं ,स्वा. सैनिकांचे सत्कार करत होते.

पण या आनंदाच्या क्षणात फक्त मराठवाडीच भाग घेतात. बाकी महाराष्ट्र यात हिरिरीने भाग घेताना का दिसत नाही ? आम्ही मराठवाडी जनता महाराष्ट्रात विनाअट सामिल झालो. आम्ही स्वतंत्र झालो मग उर्वरित महाराष्ट्र तुम्हांला याचा आनंद झाला नाही का? आपण महाराष्ट्रात आजही मागास जीवन जगत आहोत. हे मागासपण शैक्षणिक आहे , सामाजिक आहे ,आर्थिक आहे ,औद्योगिक आहे. आमची माणसिक गुलामी आणखी संपलेली नाही. येथील घाम गाळणारे अजूनही पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडीला जातात.आपल्या मराठवाडी विशेषतः बीड व नांदेडच्या सुपुत्रांमुळे त्यांच्या कारखाण्याची भरभराट होत आहे.आपली दिवाळी पश्चिम महाराष्ट्रात साजरी होत आहे .

मराठवाड्याला राजकीय नेत्तृत्व करायला भेटलं .आदरणीय शंकररावजी चव्हाण ,निलंगेकर शिवाजीराव पाटील , विलासरावजी देशमुख व अशोकरावजी चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भुसविले ;पण त्यांनाही मराठवाड्याची फारशी प्रगती करता आली नाही. या मागील कारणं अनेक असू शकतात ; पण त्या पैकी एक आहे मराठवाड्यातील नेते मंडळीत एकी नाही. पक्ष कोणता का असे ना पण विकासासाठी ते कधीच एकत्र येत नाहीत. पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांना महत्व देवून येथील नेत्यांचं खच्चीकरण करण्यातच ते स्वतःचं मोठेपणा समजतात. मराठवाड्याच्या विकासासाठी जेव्हा सर्वपक्षीय एकत्र येतील तो मराठवाड्याचा सुदिन ठरेल .

( टिप : स्वा सै . कै .बापूसाहेब बारडकर यांनी जि.प. हायस्कूल हदगाव,नांदेड येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात . सांगितलेली माहिती )

M.R.RATHOD
M.R.RATHOD

 

 

©️राठोड मोतीराम रुपसिंग
विष्णुपूरी नांदेड -६
९९२२६५२४०७ .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *