कंधार ; तालुक्यात जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदत निधीची प्रतीक्षा करीत होते. गुरुवारी दि. १३ ऑक्टोबर रोजी तहसील प्रशासनाने ५५ कोटी ५ लाख ११ हजार २६९ रुपयांचा निधीचा धनादेश संबंधित बँकांकडे जमा केला आहे. त्यामुळे तालुक्यातील ६८ हजार ५८६ अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
तालुक्यात यंदा ६८ हजार ९९ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती. मात्र पेरणीनंतर तालुक्यातील ७ महसूली मंडळांमध्ये जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे ४० हजार ५१० हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. त्यामुळे ७६ हजार ४५९ शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून प्रशासनाला सुचना केल्या. उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मंडलिक यांच्या आदेशानुसार तहसीलदार व्यंकटेश मुंढे यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले. या नुकसानीचे १२३ गावांसह वाडी, तांड्यावर महसूल, पंचायत व तालुका कृषी विभागाने संयुक्त पंचनामे केले.
या नुकसान भरपाईसाठी तहसील प्रशासनाने राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती. दि. २१ सप्टेंबर रोजी तहसील प्रशासनाला ५५ कोटी १२ लाख ६० हजार रुपयांचा मदत निधी प्राप्त झाला. तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांच्या एसडीआरएफ च्या दराने १६ कोटी ५२ लाख ६६ हजार व वाढीव दराने राज्य शासन निधीतून ३८ कोटी ५९ लाख ९४ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना हा निधी कधी मिळेल? याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले होते. त्यानुषंगाने तहसील प्रशासनाने
गावनिहाय याद्या तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार व्यंकटेश मुंढे, नायब तहसीलदार संतोष कामठेकर, महसूल सहायक अंकुश हिवाळे, महसूल सहायक राम पांचाळ, महसूल सहायक रागिणी कंधारे आदींसह तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांनी परिश्रम घेतले. गुरुवारी दि. १३ ऑक्टोबर रोजी तहसील प्रशासनाने ५५ कोटी ५ लाख ११ हजार २६९ रुपयांचा निधीचा धनादेश संबंधित बँकांकडे जमा केला आहे. त्यामुळे तालुक्यातील ६८ हजार ५८६ अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. मात्र तालुक्यातील हिप्परगा शहा या एका गावाला निधी कमी पडला आहे. तहसील प्रशासनाने निधीची मागणी केली आहे. निधी उपलब्ध झाला की शेतकऱ्यांना लवकरच वितरित केला जाणार आहे. अशी माहिती तहसील प्रशासनाकडून सांगण्यात आली.
कंधार तालुक्यासाठी ५५ कोटी १२ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. अनुदानाची रक्कम संबंधित बँकांकडे जमा केली आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल. अनुदानाच्या रक्कमेमधून कर्जाची कोणतीही रक्कम बँकेने वसूल करु नये, यासाठी संबंधित बँकांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत