पानभोसीच्या ऊसतोड मजूर परिवार व ईमानवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी घेतली भेट

नांदेड दि. 19 :- लोहा तालुक्यातील धावरी येथे वीज कोसळून ठार झालेल्या पानभोसी येथील ऊसतोड मजुराच्या परिवाराची आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासमवेत उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, कंधारचे तहसिलदार मुंढे व इतर अधिकारी उपस्थित होते. कंधार तालुक्यातील पानभोसीचे माधव पिराजी डुबुकवाड हे धावरी येथे ऊसतोडीसाठी गेले होते. त्यांच्यासमवेत असलेले पोचीराम गायकवाड, त्यांची मुलगी रुपाली हे दोघे जागीच ठार झाले होते. माधव डुबूकवाड यांची मुलगी पुजा गंभीररित्या भाजली असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

डुबुकवाड यांच्या परिवारातील सदस्यांशी जिल्हाधिकारी अभिजित राऊत प्रत्यक्ष भेटून धीर दिला. शासकिय नियमाप्रमाणे जी मदत आहे ती तात्काळ देण्याची प्रक्रिया सुरू असून इतरही जी काही मदत करता येईल ती आम्ही देऊ, असे त्यांनी सांगितले. स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेसाठी मयताच्या कुटुंबाला मदत देण्याच्यादृष्टिने तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी कृषी विभागाला दिल्या.

 

पानभोसी येथील मृत परिवाराच्या सांत्वनानंतर त्यांनी ईमानवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला. कै. संभाजी विठ्ठल जिंके यांच्या वारस कविता संभाजी जिंके यांना शासकीय योजनेचा लाभ पोहचविण्यात आला असून संजय गांधी योजनेचाही लाभ त्यांना सुरू करण्यात आलेला आहे. इतर शासकीय शासकिय योजनाही देऊन उभारी कार्यक्रमाअंतर्गत योग्य ती मदत केली जाईल, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिंके परिवारातील सदस्यांना सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *