नांदेड : युवा सेनेचे सहसचिव तथा सरपंच संघटनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष माधव पावडे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नांदेड जिल्हा प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे नांदेड जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
नांदेड जिल्ह्यातील युवकांमधील एक आश्वासक चेहरा म्हणून माधव पावडे यांची ओळख आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालत असताना शिवसेनेची ध्येयधोरणे तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी युवा सेनेच्या माध्यमातून माधव पावडे यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठ्या वाडी बुद्रुक ग्रामपंचायतच्या विकासासाठीही त्यांनी अमूल्य असे योगदान दिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची पेरणी शहरी आणि ग्रामीण भागात तितक्याच ताकतीने करण्यासाठी दिलेल्या योगदानाची पावती म्हणून त्यांची यापूर्वी युवा सेना जिल्हाप्रमुख आणि त्यानंतर युवा सेनेच्या सहसचिव पदी निवड करण्यात आली होती. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाकलेली प्रत्येक जबाबदारी तितक्याच प्रामाणिकपणे पार पाडत पक्ष वाढीसाठी केलेल्या कार्याची पावती म्हणून आता त्यांच्यावर नांदेड जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे . माधव पावडे यांच्या या निवडीमुळे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मोठ्या प्रमाणात उभारी मिळणार असून नांदेड उत्तर विधानसभा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या आणि पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सच्चा शिवसेनेचाच बालेकिल्ला राहील असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला जात आहे. जिल्हा प्रमुख पदी निवड झाल्या बदल माधव पावडे यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, शिवसैनिकांनी अभिनंदन केले आहे.
नांदेड उत्तर जिल्हाप्रमुख पदी निवड केल्याबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ,युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे , युवा सेना सचिव वरूण सरदेसाई , शिवसेना सचिव सुरज चव्हाण, नांदेड जिल्ह्याचे संपर्कप्रमुख मार्गदर्शक बबनराव थोरात , हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार सुभाषराव वानखेडे व नांदेड जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ पदाधिकारी यांचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख माधव पावडे यांनी आभार मानले आहेत.