होमगार्ड यांनी नवीन इतिहास घडवावा – अपर पोलीस अधीक्षक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक अबिनाश कुमार यांनी व्यक्त केली अपेक्षा.

नांदेड दि.- जिल्ह्यातील होमगार्ड यांची आजपर्यंतची कामगिरी कौतुकास्पद असली तरी त्यांनी आगामी काळात शिस्त व निष्ठापूर्वक अत्यंत तत्परतापूर्वक काम करून नवा इतिहास घडवावा अशी अपेक्षा अपर पोलीस अधीक्षक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक अविनाश कुमार यांनी सोमवारी येथे बोलताना व्यक्त केली.

होमगार्ड संघटनेचा 76 व्या वर्धापन दिनानिमित्त या सप्ताहात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्यानंतर सोमवारी होमगार्ड जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या कवायत मैदानावर झालेल्या समारंभात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रशासिक अधिकारी भगवान शेटे,केंद्र नायक अरुण परिहार,सामग्री प्रबंधक सुभेदार राम पिंजरकर, नांदेडचे समादेशक अधिकारी प्रकाश कांबळे,भोकरचे समादेशक अधिकारी राजू श्रीरामवार,कंधारचे समादेशक अधिकारी बालाजी डफडे, देगलूरचे समादेशक अधिकारी अशोक पैलावार यांची प्रमुख उपस्थिती होती.

आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, अनेक जणांना वेगवेगळ्या स्वरूपात नोकरीच्या संधी मिळतात. परंतु खाकी वर्दी अंगात घालण्याची संधी मोजक्याच लोकांना मिळते. खाकी वर्दी अंगात घालण्याचे अहोभाग्य तुम्हाला प्राप्त झाले आहे ही अतिशय अभिमानाची बाब आहे. त्यामुळे सर्वांनी शिस्तीचे कठोर पालन करून कर्तव्याप्रती सदैव निष्ठा बाळगली पाहिजे.

नांदेड जिल्ह्यातील होमगार्ड यांची आजपर्यंतची कामगिरी कौतुकास्पद आहे. पण आता यावरच थांबून चालणार नाही, अपेक्षा निश्चितच वाढलेल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात देखील अधिक उत्तमरित्या आपली जबाबदारी सर्वांनी पार पाडली पाहिजे व आपल्या जिल्ह्याचा नवीन इतिहास सर्वांनी निर्माण केला पाहिजे, अशी अपेक्षा अबिनाश कुमार यांनी व्यक्त करून प्रत्येक होमगार्ड यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करीन असे आश्वासन देखील त्यांनी दिले.

प्रारंभी होमगार्ड संघटनेचे संस्थापक माजी पंतप्रधान स्व. मोरारजीभाई देसाई यांच्या प्रतिमेस सर्व मान्यवरांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन सामुग्री प्रबंधक सुभेदार राम पिंजरकर यांनी केले.

जिल्हा समादेशक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे जिल्हा कार्यालय व प्रशिक्षण केंद्र येथे पहिल्यांदाच आगमन झाल्याबद्दल पलटन नायक बलबीरसिंघ चरणसिंघ यांच्या नेतृत्वाखालील पुरुष होमगार्ड यांनी त्यांना सशस्त्र मानवंदना दिली. तसेच जिल्हा व पथक कार्यालयांच्या वतीने अबिनाश कुमार यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

होमगार्ड संघटनेतून सेवानिवृत्त झालेले केंद्र नायक राम स्वामी जेंकूट,रत्नाकर सुंकेवार,आर.एस. मुदीराज,जी.एस. जोंधळे, अशोक कटाळे, बुलढाणा येथील प्रतिष्ठित नागरिक कृष्णा साळोख यांचा सत्कार अरुण परिहार व राम पिंजरकर यांनी केला.
मयत होमगार्ड स्व. कुणाल वाघमारे यांच्या स्मरणार्थ त्यांचे मोठे बंधू काँग्रेसचे माजी नगरसेवक दयानंद वाघमारे यांनी त्यांच्या स्वेच्छा निधीतून
होमगार्ड प्रशिक्षण केंद्र कवायत मैदानावर पाच सिंमेट बाक उपलब्ध करून दिले. त्या बद्दल त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन जिल्हा समादेशक अबिनाश कुमार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश कांबळे यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात होमगार्ड संघटनेच्या संपुर्ण वाटचालीचा आढावा सादर केला. यावेळी प्रशासिक अधिकारी भगवान शेटे, केंद्र नायक अरुण परिहार यांची समयोचित भाषणे झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पलटन नायक बळवंत अटकोरे यांनी केले तर अपस्थितीचे आभार सामुग्री प्रबंधक सुभेदार राम पिंजरकर यानी मानले. सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंशकालिन लिपिक बी.जी. शेख, पलटन नायक आर.बी. क्षीरसागर, रवि जेंकुट, शेख गफारो द्दीन, सरदार लड्ड सिंघ कारपेंटर, गुरू प्रसाद चलिंद्ररवार, रहीम पटेल, रसूल खान उर्फ बाबा, गौतम लांडगे, प्रशांत जोंधळे, भारत खंदारे, पृथ्वीराज खंदारे, श्रीमती तारा ठाकूर दीपा चौधरी, राधिका वाघमारे, लता कांबळे यांच्या सह अनेकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी घेतले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *