नांदेड ; कुंटूर जि. नांदेड
येथील पू. साने गुरुजी संस्कारमाला सार्वजनिक वाचनालय व बहुद्देशिय प्रतिष्ठानच्या साने गुरूजींची धडपडणारी मुले कुंटूर या युवा चळवळीच्या वतीने गेल्या बाविस वर्षापासून सामाजिक व वाड्मय पुरस्कार दिले जातात. यावर्षीचे हे पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.
या वर्षीचे साने गुरुजी सेवा सन्मान – २०२२ हे पुरस्कार राज्यस्तरावर अंबड येथील शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब थेटे, जिल्हास्तरावर नांदेड येथील शिक्षणतज्ञ प्राचार्या रेवती गव्हाणे यांना तर गावस्तरावर सेवावृत्ती मनोहर मामा सूर्यवंशी यांना जाहीर करण्यात आले आहेत. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथभेट, शालपुष्पहार असे आहे.
सन २०२२ चा कै. इंदूमती देशमुख कुंटूरकर स्मृती वाड्मय पुरस्कार कोल्हापूर येथील लेखक आप्पासाहेब खोत यांच्या काळीज विकल्याची गोष्ट या कथासंग्रहाला तर कै. शंकरराव पाटील कदम स्मृती वाड्मय पुरस्कार अमरावती येथील गझलकार नितीन भट यांच्या उन्हात घर माझे या कवितासंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे.
सदर पुरस्काराचे स्वरूप रोख पाच हजार रू. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथभेट, शाल पुष्पहार असे आहे. हे पुरस्कार दि. २२ जानेवारी २०२३ रोजी कुंटूर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात सन्मान पूर्वक वितरीत केले जाणार आहेत.
सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे संयोजन समितीच्या वतीने अभिनंदन..
(बातमीदार –
शिवाजी माधवराव आडकीने
(संयोजक, पुरस्कार समिती)